सुपीक विचार

inbound6904500006842943371.jpg

#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क (२८/१०/२५)
#सुपीकविचार

*** सुपीक विचार ***

धाप लागली, तोल गेला, मोनिका खाली कोसळली,रडायला लागली. कुणीतरी तिला खांद्याला धरून उचललं. रात्रीची वेळ,अंधार,विजेचा गडगडाट, पाऊस.मोनिकाला ती स्त्री म्हणाली, “चल माझ्यासोबत.”

त्या स्त्रीने तिला मोहिनी घातली होती. मोनिका तिच्यासोबत गेली तिच्या घरी. आत गेल्यावर ती अचंबित झाली कारण तिच्याच वयाच्या १०,१२ मुली तिच्याकडे बघत होत्या .
त्या मुलीही तिच्याप्रमाणेच काळया, सावळ्या होत्या. आपल्यासारख्या अनेक मुली बघून मोनिका थोडी भांबवलीच. माझ्या वर्गात मी एकटीच कुरूप आहे, मला कुणी मैत्रिणी नाही, साऱ्या माझी टिंगल टवाळी करतात, मी कितीही चांगलं चित्र काढलं, नृत्य केलं, भाषण दिलं, वर्गात पहिली आले तरीही कुणाला माझं कौतुक नसतं, म्हणून मी पळून जात होते.पण या सगळ्या तर माझ्यासारख्याच आहेत तरीही इतक्या आनंदी दिसत आहेत.” मोनिकाने एकदाचं आपल्या मनातली सल सांगितली.

त्या स्त्रीने तिला जवळ घेतलं, “कोण म्हणतं की तू कुरूप आहेस?तुझ्यात किती चांगले गुण आहेत. तू वर्गात पहिली येतेस, इतर स्पर्धेतही जिंकतेस, मग फक्त दिसण्याचं एवढ का धरून ठेवतेस? दिसण्याच्या सुंदरतेने नाही तर मनाच्या आणि विचारांच्या सुंदरतेने सारं जग जिंकता येतं. तुझ्या मनातील हा न्यूनगंड काढून टाक, आपल्या गुणांवर, विचारांवर लक्ष केंद्रित कर.खूप आनंदी रहा .”

मोनिकाने त्या स्त्रीला विचारलं पण तुम्ही कोण? ती स्त्री म्हणाली मी धरती माता , तुझा रंग माझ्या मातीसारखा आहे आणि विचारही माझ्या मातीसारखे सुपीक ,दुसऱ्यांना बुद्धीचे अन्न देणारे.

“मोनिका, उठ.! आज तुझी वकृत्व स्पर्धा आहे ना. रात्रभर तयारी करत होतीस ना. उशीर होईल शाळेत जायला.” आईच्या आवाजाने मोनिका उठली. तिच्या मनातील धाकधुक संपली होती.धरतीमातेचे बोल तिच्या कानात वाजत होते ,”सुपीक विचार “. तिच्या दिसण्यामुळे तिच्यातील आत्मविश्वासाची कमतरता त्या स्वप्नाने भरून निघाली. धरतीमातेने तिला सुंदरतेच खरं सार सांगितलं “सुपीक विचार ” ..

©️®️ मनिषा चंद्रिकापुरे (२७/१०/२५)

error: Content is protected !!