…सुखाच्या आनंदासाठी दुःखाची पायरी..

…….. सुखाच्या आनंदासाठी दुःखाची पायरी……
सुबोध आणि स्वातीने कुलदेवी वणीची सप्तशृंगी देवीला जायचे ठरविले. मुलगी श्रेयसी, जवळ आलेली तिची परीक्षा व अचानक आलेल आजारपण. नवस बोलून चुकले. कुलदैवतेचे दर्शन घेणारच आणि तेही नवरात्रातच. प्रचंड गर्दी. आरक्षण मिळाले नाही. दोघांनीही मनी ठरवले जशी जागा मिळेल तसा प्रवास करू. सात तासाचा तर प्रवास आहे.
निघण्याचा दिवस निघाला. बस मध्ये चढण्यास यतकिंचीतही जागा नव्हती. गर्दीचा महासागर. त्यांना कसेबसे बस मध्ये चढायला मिळाले. उभं राहायला जागा तर मिळाली पण शेवटपर्यंत एकही प्रवासी हलला नाही. हलला जरी तरी दुसरा प्रवासी पटकन जागा घ्यायचा. शेवटचे १५ मिनिटे जागा मिळाली. त्यातच थकलेल्या मनाला हायसे वाटले.
फक्त एक एक कप चहा पिऊन घाटातला रस्ता गाडीने पार केला. सुखमय जीवन जगण्याचा “फुल ना फुलाची पाकळी” तेवढ्याच आनंदात समाधान मानले. कारण पुढचा दुर्गम प्रवास शेवटास न्यायचा होता. चढण ही पूर्णतः उभी. नंतर असंख्य पायऱ्या, रणरणते ऊन, पायात चपला नाहीत, पायांना बसणारे चटके, चढताना अंगावर येणाऱ्या पायऱ्या व फुटलेला घाम टिपत मनाला विचार चाटून गेला पण एकाक क्षणात मुलीचे आजारपण डोळ्यासमोर आले. हताश मनाला बाजूला सारून जिद्दीने व मनापासून दर्शन घेतले. नवस बोलल्याप्रमाणे देवीला नऊवारी वस्त्र,खणा नारळाने ओटी व गुप्तदान केले. हुश्य करून मोकळा समाधानाचा श्वास घेतला.
प्रचंड गर्दी असल्यामुळे परतीचा प्रवास सुद्धा उभ्यानेच झाला. देवी आमची परीक्षा बघत होती की काय! प्रवासात असतांना सुबोधच्या आईचा फोन आला….
अरे मुलांनो… आपली श्रेयसी ठणठणीत बरी झाली. आई,अग मी अजून घरी पोहोचलो नाही,तिला देवीचा अंगारा व प्रसाद मिळाला नाही तरी ती एकदम ठणठणीत बरी.
हो रे राजा, तुम्ही मला फोनवरून सांगितलं तुम्ही केलेला खडतर प्रवास व त्यातून मनापासून घेतलेले दर्शन देवीपर्यंत पोहोचले व साक्षात देवीनेच तिचा अंगारा व प्रसाद आपल्या श्रेयसी पर्यंत पोहोचवला असेल. मी सुद्धा अनभिज्ञ आहे रे.
घरी पोहोचल्यावर दोघांनी श्रेयसिला कडकडून मिठी मारली व हिला सुद्धा पुढल्या वेळेस तुझ्या दर्शनाला आणेन असा नवस केला. ती परीक्षा देऊन गुणवत्ता यादीत आली.
आयुष्य जगतांना झटके आणि चटके सहन करून आनंदाच्या शोधासाठी दुःखाच्या पायऱ्या चढाव्या लागतात हे हृदयी घर करून ठेवावे. मग दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा जाणीवपूर्वक घेतलेले जे दुःख असतं किंवा खडतर आयुष्य असतं तोच चिरकालीन सुखाचा ठेवा असू शकतो ना!………
….. शब्द संख्या..३२६….
……… अंजली आमलेकर…… ४/८/२५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!