# माझ्यातली मी #
….. वीक एंड टास्क….. (१७/१/२६)
…… मी तुला न पाहिले, तू मला न पाहिले…… या ओळीवरून कथा….
•••••••••• सामान्यांचे जीवन ••••••••••••
मीनाक्षीला लहानपणापासूनच म्हणजे आठ वर्षापासून पुस्तके वाचण्याची आवड होती. चांदोबा, चंपक, तेनालीराम, अकबर बिरबल, इसापनीती या आणि अशा बऱ्याच पुस्तकांची तिच्याजवळ पोतडी भरून होती. आई-वडिलांना कधीच तिला अभ्यासाविषयी टोकावे लागत नव्हते. ती चोखपणे आपला अभ्यास व आपली आवड जपत होती.
जशी ती मोठी होत गेली तसतशी तिची पुस्तके वाचण्याची आवड वयानुरूप बदलत गेली. एक होता कार्व्हर, महाश्वेता, मृत्युन्जय, व्यक्ती आणि वल्ली, श्रीमान योगी तसेच हिंदीतला व्योमकेश बक्षी यांच्या रहस्य कथा या आणि अशा बऱ्याच पुस्तकांचा तिने अभ्यास केला. अभ्यास करता करताच तिच्यात लेखनाची आवड निर्माण झाली. घरी तर पुस्तकालय झालंच होतं पण स्वतःच्या लेखणीने स्वतःचा एक तरी कथासंग्रह आपला प्रसिद्ध व्हावा हीच मनोमन इच्छा. तिचं ते स्वप्नही साकार झालं. स्वप्नमय रंगीत स्वप्ने, अंधारातून प्रकाशाकडे असे बरेच कथासंग्रह प्रसिद्ध झाले. नंतर तिचा लिखाणाचा ओघ कादंबऱ्यांकडे वळला व तोही तिचा प्रयोग यशस्वी झाला. काही रहस्यमय कादंबऱ्या, सामाजिक व ऐतिहासिक कादंबऱ्या. त्यातील उलगडलेले रहस्य रात्रीचे, गल्लीतील लोक शहाणे, सावलीतले ऊन पावसाळे इ. आणि अशा बऱ्याच कादंबऱ्यांमुळे ती लेखिका म्हणून प्रसिद्ध झाली.
वाचनाची आवड असलेले रसिक खूप असतात. अगदी ध्येयवेडे वाचक म्हटले तरी चालेल. त्यातलाच संकेत देऊळकर हा पुस्तक वेडा होताच. जशी तिची पुस्तके त्याच्या नजरेत आली तसा तो ती झपाटल्यासारखा वाचत होता. जणू काही तो तिच्या पुस्तकाचा फॅनच झाला. पुस्तक वाचनाच्या ओढीने तो तिच्याकडे आकर्षित झाला. तो थेट वास्तवातच जणू काही गेला. तिची पुस्तके वाचताना सारखा तिचा चेहरा त्याच्या समोर यायचा. लेखक व लेखिकांचे फोटो व फोन नंबर पुस्तकावर असतातच. तो पुस्तकांच्या माध्यमातून तिच्या प्रेमातच पडला.
…. मी तुला न पाहिले, तू मला न पाहिले…. हे वाक्य समोर ठेवून त्याने फोन द्वारे तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नही हा दिवसेंदिवस यशस्वीही झाला व न बघता, न पाहता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. तिच्या एकेका पुस्तकाच्या वाचनातून मिळणाऱ्या आनंदाच्या सरी या त्यांना चिंब भिजवीत गेल्या. सकाळी उठल्या उठल्या फोन व रात्री झोपताना सुद्धा फोन ही अशी दिनचर्या सुरू झाली.
मग अचानक एक दिवस प्रत्यक्ष भेटीचा घाट घातला. ती मुंबईत व तो पुण्यात. अंतर फारसे नव्हते. एक ठराविक ठिकाण बघून खोपोली येथे भेटण्याचे ठरले. दिवस, वेळ, तारीख निश्चित झाली. अन अचानक जायच्या दोन दिवस आधी त्याला बातमी कळली की त्याला दोन वर्षासाठी कंपनीच्या कामानिमित्त अमेरिकेला जायचे आहे व ताबडतोब कामावर रुजूही व्हायचे आहे . त्याने फोन करून तिला ही बातमी सांगितली. काय करावे काही कळेना पण कामापुढे काही हाती इलाज उरला नाही. त्याला अमेरिकेला जाणेच होते.
शेवटी whatsapp वर चॅटिंग करून दोघांनी आपली प्रतिक्रिया वदविली.
आपण दोघांनीही ‘ मी तुला न पाहिले, तू मला न पाहिले ‘ असे टाईप करून आपण दोघेही एकमेकांच्या आयुष्यात येणार होतो पण नियतीने आपली ही प्रेम कहाणी अधुरी ठेवली. आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत आपण स्वप्न बघू व जर नशिबात असेल तर एकमेकांच्या आधाराचा आसरा बनवण्याचा जरूर प्रयत्न करू.
………… अंजली आमलेकर…………
