सत्याचा विजय

inbound3531385374255881802.jpg


#दीर्घकथामालिका
#सत्याचाविजय
(सत्यघटनेवर आधारित काल्पनिक कथा)

भाग १

राजाराम आपल्या शेतातील डोलणाऱ्या पीकांकडे समाधानाने पाहत होता. त्याच्याबरोबर न्याहरी घेऊन आलेली ‌त्याची बायको रुक्मिणी सुध्दा होती.

“रुक्मिणी यंदा पीक खूप चांगलं आलं आहे. बक्कळ पैसा मिळेल असं वाटतंय खरं!”

“अहो पीक चांगलं आलं तरी आपल्यासारख्या शेतासाठी एवढं कष्ट घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाताला काय जास्त पैसा लागत नाही.”

“तुझं म्हणणं अगदी खरं आहे. जे मिळेल त्यात आपण खुश राहायचं. ‌ सहा एकर शेती आहे आपली. ज्वारी, भुईमूग, हरभरा सगळी पीकं आपण काढतो. त्याच्या बळावरच शेतापासून जवळच एक टुमदार घर सुद्धा बांधलं आपण.”

“मी पण आहे त्यात समाधानी आहे. जास्त पैशाची हाव आपल्या दोघांपैकी कोणालाच नाही.”

“आता आपला रमेश आणि नरेश पण माझ्या हाताशी येतील. दोघांचं पण दहावीपर्यंत शिक्षण झालंय. अभ्यासात त्यांना गती नाहीच. म्हणून
अधूनमधून त्यांना शेतात घेऊन येतो. बघू आता परमेश्वराच्या मनात असेल तेच होईल.”

राजाराम आणि रुक्मिणीचा बोरगावात सुखाने संसार चालला होता. राजारामला रमेश आणि नरेश ही दोन मुलं होती. आपली मुलं आपल्या हाताशी येतील अशी त्याचीअपेक्षा होती. दोन्ही मुलांना मात्र छानछोकीची आवड होती. गावातली त्यांच्यापेक्षा वयाने मोठी असलेली तीन-चार मुलं शेतीचा नाद सोडून मुंबई शहरात गेली होती. ती कधीतरी सुट्टीसाठी गावाकडे फिरकत होती. ती मुलं गावात आली की नरेश आणि रमेशचे डोळे दिपून जायचे. ती मुलं अगदी हिरो सारखी गावात फिरायची. त्यांचा रुबाब काही औरच असायचा. रंगीबेरंगी शर्ट पॅन्ट, पायात चकाचक पॉलिश केलेले बूट, डोळ्यावर गॉगल, केसांचे कोंबडे अशा थाटात इथे तिथे ती मुलं फिरत असायची. एकदा असंच त्यांच्या गावातला नितीन तिथे आला असताना रमेश आणि नरेश त्याला भेटले.

“काय रे तिथे मुंबईला खूप मजा असते का? ‌ घरचं कोणी नाही तर तुमची आबाळ नाही का होत तिथे.”

“अरे रम्या मुंबईसारखी मजा कुठेच नाही. मस्त आठवडाभर नोकरी करायची रविवारी फिरायचं. सिनेमा बघायचा. खूप धमाल असते. घरच्यांची कटकट नाही.”

“राहण्याचा, खाण्याचा खर्च जाऊन मजा करायला एवढे पैसे मिळतात का तिथे?”

“अरे राहायला तिकडे जास्त पैसे लागत नाहीत. स्वतंत्र खोली घेऊन कोणीच राहत नाही. आपल्याच गावातले आम्ही चार जण भाड्याने एकाच खोलीत राहतो आणि जेवणासाठी खानावळ आहे. थोडाफार पैसा पाठवायचा घरी बाकीचा आपल्यालाच ऐष करायला. बस कसलंच टेन्शन नाही, काही नाही. तुम्हाला यायचं आहे का मुंबईला मी तुमची सोय करतो, नोकरीला पण लावतो. इथे शेतीमध्ये दिवसभर राबराब राबलं तरी आपल्या हातात असा कितीसा पैसा मिळतो.”

“अरे आमचे बाबा मुंबईला पाठवणार नाहीत.”
“अरे बाबांना विचारायचंच नाही फक्त सांगायचं आम्ही मुंबईला चाललोय. तुमचं त्यांना ऐकावंच लागेल.”

झालं! नरेश आणि रमेश मुंबईची स्वप्न पाहू लागले. त्यांच्या आई-बाबांनी त्यांना नाना परीने समजावलं पण त्यांनी अजिबात ऐकलं नाही. राजारामच्या चुलत्याने सुद्धा त्यांना खूप समजावलं पण एक नाही आणि दोन नाही. एका भल्या सकाळी दोघेही बाबांकडून थोडेफार पैसे घेऊन मुंबईला निघून गेले.

राजाराम आणि रुक्मिणीला खूपच वाईट वाटलं. आपली शेती एवढी आहे. खरं तर दोघांनाही मुंबईला जायची काहीच गरज नव्हती. दिवसभर शेतात काम करून राजासारखे दोघे इथे राहिले असते. पण कसचं काय. या वयातील मुलांना कोणी भुलवलं की त्यांना भुलायला वेळ लागत नाही. रमेश नरेशच्या बाबतीत तेच झालं. नितीनने त्यांना बोलल्याप्रमाणे दोघांनाही नोकरीला लावलं खरं. सहा महिने झाल्यावर दोघेही आई-बाबांना भेटायला आले. ते घरी आले तेव्हा त्यांचं रुपडं पार बदलून गेलं होतं. बाकीच्या मुलांसारखं हिरो बनूनच घरी आले होते. खरं तर ते वेगळ्याच इराद्याने आले होते आणि तो नक्कीच चांगला नव्हता.

(रमेश आणि नरेशचा इरादा काय होता पाहूया पुढील भागात)

क्रमशः

भाग २

राजारामला वाटलं आपली मुलं खरंच खूप सुखात दिसतायेत. निघायच्या चार-पाच दिवस आधी रमेश राजारामला म्हणाला,

“आई बाबा चला तुम्ही पण मुंबईत. आपण सगळे एकत्र राहूया. भाड्याने मोठे घर घेऊन राहूया. तुम्हाला पण आवडेल तिकडे. आता शेतीत काय राम राहिला नाही.”

“मुंबईला! वेड लागलं का तुम्हाला! इथे ही शेती कोण करणार!”

“बाबा शेती, घर सगळं विका आणि मुंबईत चला आपल्या चौघांना राहाण्या एवढं घर आपण तिथे घेऊया.”

“नाही रे बाबा. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी शेती विकणार नाही. काळी आई मला माझ्या आई सारखीच आहे. आईला विकायचं मला जन्मात जमणार नाही. मी वाट बघेन तुम्हाला कधीतरी उपरती होईल आणि तुम्ही गावाकडे फिरकाल आणि शेती कराल.”

“अहो बाबा एकदा मुंबईकडे गेलेला माणूस गावाकडे राहायला पुन्हा परतून कधीच येत नाही.”

असेच दिवस जात होते. मुलांनी राजारामचा अपेक्षाभंग केला असला तरी त्याला रुक्मिणीची खूप चांगली साथ मिळत होती. दोघं मिळून शेतात राबत होते. त्यांच्या हाताशी त्यांनी पाच-सहा विश्वासू माणसं ठेवली होती. घरी आल्यावर मात्र त्यांना खूपच अस्वस्थ वाटायचं. घरात मुलं नाहीत हे शल्य त्यांना कायम बोचत असायचं. यामुळेच ते मनाने खचले होते. वयापेक्षा जास्त म्हातारे दिसू लागले होते. हळूहळू त्यांना शेतात राबणं कठीण होऊ लागलं. ते दोघे जाऊन तिथे नुसतीच देखरेख करू लागले. शेतात काम करणारी माणसं पण त्यांना फसवू लागली. राजारामने मुलं त्यांना भेटायला आली असताना पुन्हा एकदा सांगून पाहिलं. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर अजून एक आघात केला. नरेश म्हणाला,

“आम्ही दोघांनी आता लग्न करायचं ठरवलं आहे. मुंबईतच आमचं लग्न होईल. लग्नासाठी तुम्हाला तिथे नेणं शक्य नाही. शेवटचं‌ एकदा सांगतो सगळं विकून‌ मुंबईला चला.”

हे ऐकून राजाराम आणि रुक्मिणीला खूप मोठा धक्का बसला. मुलं असं वागू शकतील असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. खूप निराश होऊन राजाराम म्हणाला,

“अरे आपल्या मुलांचं लग्न आपल्या डोळ्यांनी पाहता येऊ नये यासारखं दुर्दैव ते काय. तुम्ही पाया पडायला पण नाही आला तरी आम्ही रागावणार नाही. आम्ही काही तुमच्या बरोबर येणार नाही.”

राजाराम आणि रुक्मिणीला आता आपण कशासाठी जगायचं हेच कळेना. अशातच राजारामचा एक मित्र, सदा एका व्यापाऱ्याला घेऊन एका सकाळी राजारामच्या घरी आला आणि म्हणाला,

“अरे राजा तुझी दोन्ही मुलं इथं राहत नाहीत. शेतीमध्ये लक्ष देत नाहीत. तू राखलेली माणसेच आता शेती करताहेत. तुला योग्य मोबदला देत नाहीत.”

“काय करणार बाबा, आहे हे असं आहे. बरं हे पाहुणे कोण म्हणायचे!”

“अरे हे एक व्यापारी आहेत शांतीभाई. ते आता आपल्या गावामध्ये शेतजमिनी विकत घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करणार आहेत. तुझी भेट घालायला घेऊन आलो.”

“नमस्कार शेटजी.” रुक्मिणीने सर्वांसाठी चहा आणला आणि ती तिथेच थांबली. सदा पुढे बोलू लागला,

“हे बघ राजा आता तुझी शेती तू करू शकत नाही तुला योग्य मोबदला मिळत नाही तर तुझी शेती तू या शेटजींना विकून का टाकत नाहीस. चांगले एकरी दीड लाख रुपये देणार आहेत.”

“काय म्हणतोस दीड लाख रुपये. तू पण देणार आहेस का शेठजीना तुझी शेती.”

“अरे माझी फक्त दोन एकर शेती आहे आणि माझा एक मुलगा आहे तो माझ्याबरोबर शेतात काम करतो. शेठजी माझ्याकडेच आले होते. मीच त्यांना तुझ्याबद्दल सांगितलं.”

राजाराम शेठजींकडे पाहत म्हणाला,

” मी तुम्हाला दोन दिवसांनी कळवतो.”

(काय असेल राजाराम चा निर्णय पाहूया पुढील भागात)

क्रमशः

भाग ३

राजाराम विचारात पडलेला पाहून सदा त्याला म्हणाला,

“हे बघ राजा विचार करण्यात जास्त वेळ घालवू नकोस. तुझ्या भागातल्या सगळ्या शेतजमिनी शेठजीनी विकत घेतल्या आहेत. त्यांना शेठजीनी नगद पैसे दिले आहेत.”

राजारामने आणि रुक्मिणीने विचार विनिमय केला. नाहीतरी मुलांना शेतीमध्ये रस नाहीये. सहा एकर शेताचे दीड लाखा प्रमाणे एकूण नऊ लाख रुपये मिळतील. ते जर आपण बँकेत ठेवले तर त्याच्यावर आपल्याला थोडंफार व्याज मिळेल. ओसरीवर आपलं किराणा मालाचं छोटे दुकान आहेच. राजाराम रुक्मिणीला म्हणाला,

“आता आपल्याला दगदग सहन होत नाही. काय करायचं विकायची का शेती शेठजी ना!”

“ही आपली काळी आई विकून टाकणं खरंतर योग्य वाटत नाही. आता आपल्याला शेतात काम करणं जमत नाही तर आपण सारासार विचार करून विकून टाकूया. मुलं थोडे पैसे पाठवतात आणि हे व्याज. थोडे किराणा दुकानाचे. आपल्या दोघांना असं कितीसे पैसे लागणार आहेत.”

दोन दिवसांनी राजारामने आपला निर्णय शेठजींना कळवला. शेटजी आले त्यांनी रीतसर कागदपत्र केली राजारामला नऊ लाख नगद दिले. इतके पैसे एकत्र पाहून राजारामचे डोळे आनंदाने चकाकले. रुक्मिणी पण खुश झाली. त्यावेळी शेतजमिनीला एवढा भाव मिळत नव्हता म्हणून त्यांना खूपच आनंद झाला. आलेले पैसे त्यांनी बँकेत ठेवले. दोघेही आयुष्याचे निवांत क्षण जगू लागले. शेठजीने आजूबाजूच्या जेवढ्या शेतजमिनी विकत मिळतील तेवढ्या घेतल्या.

काही दिवसांनी भल्या सकाळी राजारामचा मित्र सदा धावतच त्याच्या घरी आला.

“अरे राजा घात झाला. माझ्यामुळे तुझं खूप नुकसान झालं.”

“अरे पण असं झालं तरी काय नीट स्पष्ट सांग.”

“अरे आता आपल्या गावात एमआयडीसी होणार आहे. ज्यांची शेतजमीन एमआयडीसी खाली जाणार त्यांना एकरी पंधरा लाख रुपये देणार आहेत. त्या शेटजींना आधीच सर्व कळलं होतं म्हणूनच त्यांनी येऊन आपली शेतजमीन घेतली. त्यांनी आपल्या तोंडाला पानं पुसली. मी तुझं खूप मोठं नुकसान केलं मला माफ कर राजा.”

हे ऐकून राजारामला चक्कर आली तो खालीच कोसळला. रुक्मिणी आणि सदाने त्याला सावरले. राजाराम रडत रडत बोलू लागला,

“रुक्मिणी मुलांसाठी आपण टुमदार घर बांधलं. त्यांच्याकडून अपेक्षा ठेवली. त्यांनी आपली फसगत केली. आता नियतीने सुद्धा आपली फसगत केली गं. या नियतीने श्रीमंतांना आणखीन श्रीमंत करण्याचा ठेका घेतलाय का. खरंतर मी शपथ घेतली होती माझ्या काळ्या आईला मी कधीच विकणार नाही. मी माझ्या आईची फसगत केली. पैशाच्या मोहापायी मी माझ्या काळ्या आईला विकलं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. त्याचंच फळ म्हणून नशिबाने माझी फसगत केली.”

राजाराम आपल्या नशिबाला दोष देत असतानाच पुन्हा काही दिवसांनी सदा धावत धावत आला,

“अरे सदा सत्याचा, आयुष्यभर तू केलेल्या कष्टांचा विजय झाला आहे. शेठजीनी लबाडी करून आपल्या गावातील खूप शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या. आपल्या गावचे सरपंच आणि पाटील यांच्या लक्षात शेठजींची लबाडी आली आणि ते एमआयडीसीच्या मोठ्या अधिकाऱ्यांना भेटले. त्यांनी आता निर्णय घेतला आहे की सहा महिने आधी ज्यांच्या नावावर शेतजमिनी होत्या त्यांनाच हा पैसा मिळणार आहे. ती कागदपत्रं एका अर्थी फसवूनच केली गेली होती. कष्टकरी शेतकऱ्यांना आता योग्य न्याय मिळणार आहे. तुझ्या नशिबाला आता सुखद कलाटणी मिळाली आहे. आता पश्चाताप करायची पाळी शेठजींवर आली आहे.”

हे ऐकून राजाराम आणि रूक्मिणीने अक्षरशः देवासमोर लोटांगण घातलं. आयुष्यभराचे त्यांचे कष्ट वाया गेले नव्हते. त्याचा फळ त्यांना आता मिळणार होतं. दोघांच्याही मनात आलं:

“ही काळी आई, धनधान्य देई
जोडते मनांची नाती
आमची माती आमची माणसे ”

©️®️ सीमा गंगाधरे

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!