#माझ्यातलीमी
#लघुकथालेखनटास्क (१९/१/२०२६)
#सख्खेशेजारी
वाक्य: खूप गरज असल्यावर निःस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही महाग असते
“आई हे काय होऊन बसलं हो. हे गेले आणि ह्या सर्वनाशी, दुष्ट कोरोना मुळे आलोक आणि समर आमची दोन मुलं परदेशात वास्तव्यास असल्यामुळे येऊ शकली नाही. शेवटचे दर्शन व्हिडिओ कॉल वर झालं.”
“सुमेधा काय करणार! अगं काही घरांमध्ये तर बाप लेक, नवरा बायको एकमेकांना न पाहता एकत्रित कुठेतरी दहन केले गेले. आता तू आणि मी एकमेकींना आधार. आपली काळजी घेत जगायचं.”
ज्या दिवशी दोघींच्यात हा संवाद झाला त्याच रात्री आईना रात्री पाणी प्यायला उठल्या तेव्हा अटॅक आला. सुमेधाचे नेहमीचे डॉक्टर वयोमानामुळे ह्या काळात क्लिनिक मध्ये येत नव्हते. तिने कसेबसे आईना झोपवलं आणि मध्यरात्री शेजारच्या दिलीप राणेंची बेल वाजवली. ते क्षणार्धात आले. त्यांनी त्यांच्या डॉक्टरना फोन लावला. तेही लगबगीने आले. त्यांनी आयसीयू असलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितलं. दिलीपनी पुढचा मागचा विचार न करता सुमेधाला धीर देत पुढच्या साऱ्या गोष्टी म्हणजे ॲम्ब्युलन्स, ॲडमिशन, औषधं आणि सगळ्यासाठी त्यावेळी पैसेही त्यांनीच भरले.
सुमेधाची भीतीने गाळण उडाली होती. महिन्याभरापूर्वीच पतीचे निधन. आता ह्या क्षणी आईना काय झालं तर आपण काय करणार. ती हॉस्पिटल मध्ये आयसीयू बाहेर केविलवाणी उभी होती. दिलीप तिला सारखे धीर देत होते. बाजूलाच खचाखच भरलेलाा कोरोना पेशंट्सचा वॉर्ड. मध्येच नर्स येऊन मोठ्याने तिच्या सासूबाईचे नाव घेऊन “मालती का रिलेटिव्ह” आवाज देत होती. काळजात चर्र होत होतं. असं दोनतीन वेळा झाल्यावर डॉक्टरानी सांगितले की आता त्यांना धोका नाही. तेव्हा कुठे सुमेधाच्या जीवात जीव आला. हे पाच सहा तास दिलीप सतत तिच्या बरोबर होते. सुमेधाला जाणवलं खूप गरज असल्यावर निःस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही महाग असते. ती दिलीपला म्हणाली,
“दादा आज तुम्ही नसता तर मी अशा अपरात्री काय केलं असतं. शेजारी कोणत्याही नातेवाईकापेक्षा खूप जवळचा असतो म्हणतात ते खरंय.”
©️®️ सीमा गंगाधरे
शब्दसंख्या: २५७
