***** संसारसार*****( समीक्षा)
पुस्तकाचे शीर्षक’ संसारसार ‘हे असून त्याच्या लेखिका प्रज्ञा. ग.केळकर या आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन दीपक आलूरकर यांनी केले असून त्यांनी त्यांच्या मनोगतात ‘ संसारसार’ या कथासंग्रहात संसारातील प्रश्नांचा वेध घेणाऱ्या तत्त्वज्ञानाची मांडणी लेखिकेने कशी रंजक पद्धतीने मांडली हे दाखवून दिले आहे.
‘ संसारसार ‘या कथासंग्रहात संसाराचे सार सांगणाऱ्या तत्त्वकथा आपणांसमोर मांडल्या आहेत. या पुस्तकाची मुख्य कल्पना यातून मिळणारे जे बोध आहेत त्यात शिरून आपण सगळ्यांना ‘हवे असणारे मोठे सुख ‘मिळावे हीच लेखिकेची इच्छा आहे. या कथासंग्रहामध्ये लेखिका जेव्हा स्वतःपुरती विचार करते त्यावेळेस त्यात संकुचित पणाचा भास होतो व सगळ्यांचा विचार ज्यावेळेस करते त्यावेळेस त्यात सुदृढता व संपन्नता दिसायला मिळते.
त्यांचा हा जो कथासंग्रह आहे तो ८४ कथांचा संग्रह आहे. त्यातील भाषा सहज सोपी व ओघवती आहे. प्रत्येक कथेत जर शिरले तर त्यात असणाऱ्या समस्या,मानसिक ताण-तणाव यातून बाहेर पडण्यासाठी योग्य दिशा कशी प्राप्त होते हे दाखवून दिलेले आहे. प्रत्येक कथा तुम्ही जर वाचत गेले तर या कथा तुम्हाला निश्चितच भावतील. या कथा जर एकाग्रतेने वाचल्या तर तुम्हाला यात तुमच्या कुटुंबात तसेच आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब निश्चितच बघायला मिळेल व उत्तराची दिशाही मिळेल.
एखादीच कथा अशी आहे की ती थोडी लांबल्यासारखी वाटते. बाकी सगळ्या कथा ह्या त्यातून बोध घेण्यासारख्याच कथा आहेत.
हा कथासंग्रह वाचून यातून एकच निष्कर्ष निघतो की ‘ वसुधैव कुटुम्बकम्’ हा भारताचा जो मूलमंत्र आहे, अवैध विश्व माझे कुटुंब आहे ही विशाल भावना जागृत ठेवण्यासाठी मला माझे कुटुंब अगोदर सुखी व समाधानी करावे लागेल ही भावना समोर ठेवून ‘ संसारसार ‘ हा तत्वज्ञान कथासंग्रह निश्चितच वाचावा. आपले आयुष्य सुखकर करण्यासाठी या कथासंग्रहातील तत्त्व कथांचा निश्चितच हातभार लागेल.
धन्यवाद देते मी प्रज्ञाताईंना की त्यांनी इतका सुंदर तत्त्वज्ञान कथासंग्रह वाचण्यासाठी आमच्या समोर आणला. जीवन हे खूप सुंदर आहे. नक्कीच यातून आम्ही बोध घेण्याचा निश्चितच प्रयत्न करू.
……… अंजली आमलेकर…… २८/६/२५
्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््
