#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा (२३/६/२५)
#संदेश
वारीमध्ये यमुना आणि शंकर ह्या अलौकिक जोडप्याला अनेक लोक ओळखत होते. गेली पस्तीस वर्ष कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून ते वारीमध्ये सामील व्हायचे. विठ्ठलाचे निस्सिम भक्त असलेल्या त्यांना वारी म्हणजे भक्तिमय वातावरणाने भारलेले एक प्रेरणास्रोत वाटायचे. समर्पणाचे प्रतीक असलेली तुळस दरवर्षी त्यांच्या डोक्यावर असायची. दिवसेंदिवस वारीमध्ये तरुणांचा सहभाग वाढत असलेला दिसत होता. यमुना आणि शंकर ह्यांनी ह्या संधीचा फायदा घ्यायचा ठरवलं. ते जास्त शिकलेले नव्हते परंतु ते पर्यावरणाचे महत्त्व जाणत होते. ह्यावर्षी त्यांनी वारीमध्ये ठीकठिकाणी पर्यावरणाचे महत्त्व सांगणारी छोटीशी नाटुकली सादर केली. त्यांच्या ह्या संदेशयुक्त सादरीकरणामुळे वारकऱ्यांच्या मनात भक्तीबरोबर पर्यावरण सुद्धा तितकेच महत्वाचे आहे ह्याबद्दल जागरूकता निर्माण झाली.
©️®️सीमा गंगाधरे
