श्रावण मन भावन साजन

inbound3924031019590768077.jpg

#माझ्यातलीमी
#मनभावनश्रावण
#वीकेंडटास्क
#दीर्घकथा

**श्रावण मन भावन साजन*

आज रीना चा इंटरव्ह्यू आहे म्हणून तीची खूप धावपळ चालू होती .. त्यात तिचा मोठा भाऊ रोहित मात्र अजून ही झोपला होता ..रीना ची काम करता करता बडबड चालू होती …अरे दादा ऊठ ना रे लवकर ,माझा आज इंटरव्ह्यू आहे मला लवकर बाहेर जायचं आहे , तुझं दरवर्षीच आहे ,गटारी झाली की दुसऱ्या दिवशी सुट्टी घ्यायची आणि लोळत पडायचं ..आता आज पासून श्रावण लागला ,अजिबात चालणार नाही हा मला नॉनव्हेज ही आणि ड्रिंक ही .. रोहित झोपेतच तिला म्हणाला , अगं दर श्रावणात पाळतो ना सर्व मग ह्या श्रावणात नाही का पाळणार ? आता लेक्चर द्यायला सुरुवात नको करू हा , श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा वगैरे वगैरे , त्यापेक्षा जा इंटरव्ह्यू ला..

अरे दादा ,श्रावण म्हणजे फक्त सणांचा राजा नाही तर श्रावण महिना म्हणजे ऊन पावसाचा खेळ , हिरवा शालू परिधान केलेली भूमी , सदाबहार प्रसन्न करणारा निसर्ग , पावसात आनंदाने नाचणारा मोर …

हो हो पुरे पुरे ,तुला उशीर होतो आहे ना जा बर आता ,
तुला खूप खूप शुभेच्छा.. आणि हो यशस्वी होऊन ये आणि येताना त्या श्रावणातल्या मोरासारखं नाचत ये …

रीना इंटरव्ह्यू ला जाण्याच्या आधी महादेवाच्या मंदिरात गेली , प्रार्थना केली , महादेवा, मी सगळे श्रावणी सोमवार रुद्राभिषेक, दुग्धाभिषेक करेन पण माझं आज सिलेक्शन होऊ दे ..

रीना बस ची वाट बघत होती , इंटरव्ह्यू ला उशीर होत होता , ओला, उबेर दोन्ही बघितलं रिक्षा ला दोनशे च्या वर दाखवत होते .. नकोच त्यापेक्षा बस ची वाट बघू .. रीना साठी मुंबई नवीनच होत , शिक्षण झाल्यावर दादाच्या पाठोपाठ ती ही मुंबईला आली , आई वडील दोघेही गावाला , वडील शेतकरी ..परिस्थिती तशी यथातथा च पण दादाला नोकरी लागल्यावर जरा बरे दिवस आलेले , पण कशाला दादाचा पैसा जास्त खर्च करा म्हणून तिने बस ने जायचं ठरवलं ..तितक्यात एक खचाखच भरलेली बस आली ,पण गर्दी इतकी होती की रीना चढण्याच्या आधीच बस सुटली ,रीना तशीच बस च्या मागे ओ थांबा , ओ थांबा ओरडत धावत सुटली ..

तितक्यात एक कार अक्षरशः तिला धडक देता देता थांबली ..कार मधून एक तरुण उतरला , आणि रीना वर ओरडलाच , रीना सॉरी म्हणाली आणि म्हणाली खूप उशीर झाला आहे , इंटरव्ह्यू ला जायचं आहे म्हणून असा वेडेपणा झाला माझ्याकडून .. त्याने तिला त्याच्या कार मधे बसायला सांगितलं , रीना ला एक क्षण कळेना काय करावं, पण इतक्या रहदारीच्या रोड वर ते पण दिवसा उजेडी जाऊ, तसही काही पर्याय नाही असा विचार करून ती त्याच्या कार मधे बसली ..

कार मध्ये बसल्यावर ,त्याने तिला कुठे इंटरव्ह्यू ला जायचं आहे , कुठल्या पोस्ट साठी इंटरव्ह्यू ला जायचं आहे हे विचारलं ..त्याच नाव राजेश होत , त्याने जवळ जवळ चाळीस मिनिटाच्या प्रवासात इतके प्रश्न विचारले की उतरताना ती त्याला म्हणाली ही की खूप खूप आभारी आहे , लिफ्ट दिली म्हणून आणि इंटरव्ह्यू ची छान तयारी करून घेतली म्हणून ..

इंटरव्ह्यू साठी जेव्हा ती केबिन मध्ये गेली तेव्हा बघते तर राजेश..त्याने सांगितलं की इंटरव्ह्यू तर कार मधेच झाला घेऊन , आणि तुमच आमच्या ऑर्गनायझेशन मधे स्वागत आहे .. पगार , कामाच स्वरूप वगैरे बद्दल मॅनेजर तुम्हाला सगळ सांगतील ..

रिनाला खूप खूप आनंद झाला , घरी जाण्याच्या आधी महादेवाच्या मंदिरात गेली , श्रावण महिन्याचा पहिला दिवस आज तिला पावला होता .. रोहितला ही तिने सगळी स्टोरी सांगितली .. सांगता सांगता हे सांगायला ही विसरली नाही की अरे दादा राजेश दिसायला ही एकदम हँडसम आहे .. रोहित ने त्यावर तिला कामावरच लक्ष दे म्हणून दटावल ही..

अशा प्रकारे तिचा नवीन जॉब सुरू झाला ,बऱ्याच वेळा राजेश तिला लिफ्ट द्यायचा .. राजेश तिचा बॉस होता ,
त्यांच्या कामाच्या बाबतीत जरी खूप कडक होता तरी त्याच्या कडून तिला खूप शिकायला ही मिळत होत ..एकमेकांच्या पर्सनल आयुष्या बद्दल मात्र ते दोघेही एकमेकांशी बोलले नव्हते ..

नागपंचमीला तिला आईची ,तिच्या घरची खूप आठवण येत होती ..आई नेहमी सांगायची की नागपंचमी हा एक असा सण आहे ज्याचा संबंध आपल्या पर्यावरणाशी जोडला गेलेला आहे. या दिवशी घरोघरी नागाची अथवा आपल्या परिसरात असेल तर नागाच्या वारूळाची पूजा केली जाते. नागदेवतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते. कालिया नागाचा पराभव करून यमुना डोहाच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्यादिवसापासून नागपूजा करण्यात येते .रीना ला आईच हे सगळं बोलणं आठवत होत ..
आई घरी किती छान पूजा करायची , मग आईच्या हातचं खीर , कानोल अहाहा किती मस्त .. त्यादिवशी दुपारी ,राजेशला अचानक मीटिंगसाठी बाहेर जायचं होत , तेव्हा त्याने त्याचा डबा तिला दिला आणि सांगितलं की माझा डबा सगळे जण मिळून संपवा नाहीतर आई ओरडेल ,मीटिंग नंतर तिथेच लंच आहे ..दुपारी बघते तर त्याच्या डब्यात खीर कानोल तिला कसला आनंद झाला आणि अजून तिला एका गोष्टीचा आनंद झाला की बॉस ने म्हटलं आई ओरडेल म्हणजे कदाचित राजेशच लग्न नसेल झालं .. तिला राजेश आवडायला लागलेला ..

रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी रविवार होता , ती आणि रोहितदादा मॉल मध्ये खरेदी साठी आले होते ..रक्षाबंधन हा श्रावणातला रीना चा सगळ्यात आवडता सण .. रीना चा दादा तिचा फक्त भाऊ नव्हता तर तिचा खूप चांगला मित्र ही होता ..आणि ती खूप लाडकी तिच्या दादाची .. दादाला तिच्या हाताचा नारळी भात आवडायचा आणि तोच करायचा बेत तिने केला होता ..रक्षाबंधन तर बहिण भावाच्या प्रेमाचा सोहळा जो उद्या साजरा करायचा म्हणून ती भावाकडून छान ड्रेस घेण्यासाठी त्याला घेऊन मॉल मधे आलेली .. तितक्यात तीच लक्ष बॉस कडे गेले ,त्यांच्या कडे वर एक छोटस बाळ होत ..त्या रात्री विचार करून करून तिला आपोआप रडायला येत होत .. आणि तिने त्याच्या बद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवायची ठरवलं..

आणि ,आणि कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी ,राजेश ने सगळ्यांना त्याच्या घरी येण्यासाठी आमंत्रण दिलं ,त्याच्या मुलाचा दुसरा वाढदिवस ,त्याच्या मुलाचा जन्म कृष्ण जन्माष्टमी ला झाला म्हणून तिथीप्रमाणे त्याच दिवशी त्याच्या घरी त्याचा वाढदिवस आणि कृष्ण जन्मोत्सव दोन्ही साजरे करतात ..

रीनाला वाटलं की आज जाऊ त्याच्याघरी पण उद्या नोकरीचा राजीनामा देऊन टाकायचा कारण ती त्याच्या खूप प्रेमात पडलेली आणि तो एका मुलाचा बाप आहे म्हणजे ते शक्य नाही ..

त्यादिवशी संध्याकाळी ऑफिस मधले सगळे त्याच्या घरी गेले , त्याची बायको कुठे दिसते का ते ती बघत होती पण कुठेच दिसेना .. घरातली सर्व काम तो आणि त्याची आई करत होते .. हिंमत करून तिने त्याच्या आईला हळूच विचारलं की बाळाची आई कुठे आहे ? तेव्हा त्याच्या आई कडून कळलं की बाळ आठ महिन्याचा होता तेव्हाच त्याच्या आईचा एका अपघातात अंत झाला .. रिनाला खूप वाईट वाटलं , ती त्यादिवशी त्याच्या मुला बरोबर खूप खेळली ,रमली .. आणि तिने मनाशी निर्धार केला की आता हा बाळकृष्ण तिचा .. श्रीकृष्ण पाळणा सजवल्यावर राजेश च्या आईने छान पाळणा गायला ..रीना मात्र मनात हेच गुणगुणत होती ,देवकी नसे मी बाळा भाग्य यशोदेचे ठाई ..

दुसऱ्या दिवशी दहीहंडी च्या दिवशी छान बाळकृष्णाचा ड्रेस घेऊन रीना त्याच्या घरी गेली ,आणि बाळाचे खूप फोटो काढले .. त्या संध्याकाळी ही तिने त्याच्या मुलाबरोबर खूप छान वेळ घालवला .. राजेश च्या आईने तिला त्याच्या बायकोचा फोटो दाखवला , लग्नानंतर च्या पहिल्या मंगळागौर चा फोटो होता तिचा ,खूप हौशी होती ती ,
तिने छान मंगळागौरीची पूजा मांडून, पूजा, आरती करून हे व्रत केले होते . संध्याकाळी हळदीकूंकवाचा कार्यक्रम झाल्यानंतर विविध मंगळागौरीचे खेळ, फुगड्या खेळून रात्र जागविली होती..
पण नियतीने तिला मध्येच संसारातून उठवलं ..राजेशच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं , जो पर्यंत मी आहे तो पर्यंत मी सांभाळेल पण पुढे काय , लेकरू बिन आईच कसं वाढेल ..

रीना जेव्हा शक्य होईल तेव्हा त्याच्या घरी ऑफिस सुटल्यावर जायला लागली , मला लहान मूल आवडतात ,मला आवडत त्याच्याबरोबर खेळायला ,वेळ घालवायला ,नाहीतरी घरी जाऊन काय करणार असं सांगून ती त्याच्या घरी यायला लागली ..संध्याकाळ झाली की रीना ला बाळाची ओढ लागायची , तिच्यातली ममता त्याला घेतल की जागी व्हायची .. बाळ राजेशच प्रतिबिंब होत आणि राजेश वर तीच खूप प्रेम होत ..राजेश आणि राजेश च्या आईला ही तिचं येणं आवडायला लागलं .. पण राजेशला तिला लग्नासाठी विचारायला संकोच वाटत होता ..रिना च्या हे लक्षात आलं की शेवटी पुढाकार तिलाच घ्यावा लागेल ..

रीना ने दादाला सांगितलं की मला राजेश शी लग्न करायचं आहे ,तू त्याला भेटला तर तुला ही तो आवडेल आणि तुला तो आवडला तर तू सरळ त्याला विचार की माझ्या बहिणीशी लग्न करशील का ? रोहितचा रीना वर ,तिच्या पसंती वर विश्वास होता ..एकदिवस तो रीना बरोबर राजेश च्या घरी गेला आणि त्याने राजेश ला लग्नाबद्दल विचारलं ..राजेश आणि राजेश च्या आईला तर रीना आवडतच होती ..आता प्रश्न होता तो फक्त तिच्या आईवडिलांचा .. पण पुढच सगळं प्लॅनिंग रोहित ने केलं ..

गावाला बैल पोळा चा मोठा सण साजरा केला जातो .. त्यादिवशी रोहित ,रीना ,राजेश ,राजेश ची आई आणि बाळ सगळे गावाला गेले ..रोहित ने मित्र म्हणून राजेश ची ओळख करून दिली ..राजेश ने पहिल्यांदा असा बैल पोळा चा उत्सव बघितला ,रीना चे बाबा सांगत होते शेतकऱ्याचा उजवा हात आणि जिवाभावाचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाची ह्या दिवशी पूजा करण्यात येते , त्यांना छान सजवून , शेतीच्या कामात विश्रांती दिली जाते ..छान गोडधोड जेवण झालं.. आणि त्यानंतर सगळ्यांनी रिनाच्या आई वडिलांना विश्वासात घेऊन लग्नासाठी परवानगी मिळवली ..

रीना खुश होऊन , बाळाची पापी घेऊन तीच आवडतं गाण गुणगुणायला लागली …श्रावणमासी हर्ष मानसी , हिरवळ दाटे चोहीकडे …

सौ स्वाती येवले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!