#माझ्यातलीमी
#विकएंडटास्क(६/३/२६)
#महिलादिनविशेष
#कथालेखन
@everyone
#माझ्यातलीखरीमी
शीर्षक– “शोध: माझ्यातली खरी मी”
“अहो, आज महिला दिन आहे.एका स्त्री संघटना कडून माझा सत्कार आहे, तुम्हालाही आमंत्रण आहे”.
“अरे व्वा खूप छान, खरंच मला तुझा अभिमान आहे.अगं आता माझ्या हातून छान पैकी आलं टाकून चहा करतो आणि सकाळी सकाळी तुझा पहिला सन्मान माझ्या हस्ते करतो”.
माधवीताई आणि मधुकर राव यांचा हा संवाद ..माधवीताईंना असा आयता चहा घ्यायला खूप छान वाटलं ,पण चहाचे घोट घेता घेता भूतकाळाचे प्रसंग चित्र त्यांना आठवायला लागले .
माधवीताई शिक्षणात जात्याच हुशार , इंजिनियर झाल्या , लगेच नोकरी मिळवली, मुलगी सेट झाली म्हणून लगीन घाई सुरू झाली ..
लग्न झालं ते एकत्र कुटुंबात ..माहेरी इंजिनियरिंग अभ्यास आणि मग लगेच नोकरी त्यामुळे किचन कामात त्यांनी जास्त लक्षच घातलं नव्हतं त्यांना एकदम एकत्र कुटुंबात सर्वांचा स्वयंपाक .. खूप थकून जायच्या त्या ..माहेरच्या सुरक्षित कवचातून बाहेर आल्यानंतर सासरी जणू सगळ्या कामांना,नवी नाती ,नवी माणसं ह्यांना सामोरं जाण्याचं त्यांना जणू आपोआप बळ मिळालं होत ..
काही वर्ष गेलीत मुलाचा जन्म झाला ..आई होणे नसे सोपे..जबाबदाऱ्या वाढल्या ..झेपत नसेल तर नोकरी सोड , सासू सासऱ्यांची ऑर्डर पण काही झालं तरी नोकरी सोडायची नाही ही वडिलांची शिकवण ..त्यामुळे घरात भांडणही झाली पण माधवी ताई स्वतंत्र विचारांच्या होत्या त्यांनी नोकरी सोडली नाही , तारेवरची कसरत होत होती , घड्याळ एक वेळ थकत असेल पण त्यांची काम काही थांबत नव्हती ..जेव्हा अचानक 2 वर्षे मधुकर रावांचा जॉब गेला तेव्हा पूर्ण घर माधवीताई ह्यांच्या पगारावर चालत होतं तेव्हा कुठे घरात त्यांची किंमत कळली .. त्यात दीराच लग्न, नणदेच बाळंतपण अशा जबाबदाऱ्या ही निभावल्या ..
*नारी तूच अष्टभुजा*
*तूच सरस्वती धनी*
*कुटुंबाची सर्वेसर्वा*
*नव्या युगाची जननी*
खरोखरच माधवी ताई सारख्याच अनेक महिलांना जणू अष्टभुजा असतात..
तरीही तिच्या वाट्याला बऱ्याच वेळा उपेक्षाच येते. सर्व बाबतीत तिला गृहित धरले जाते.
तिची स्वतःची जडणघडण बालपणापासूनच कुटुंबाची सेवेकरी अशीच होते. आई,आजी यांना तिने याच रुपात पाहिलेले असते.
आता ती सुशिक्षित आहे. पायावर उभी आहे. स्वावलंबनाचं समाधान मिळवतेय. पण त्याबरोबरच घरी दारी जबाबदा-या ओढवून घेतल्या आहेत. ख-या अर्थाने अष्टभुजा होऊन काम चालू असतं. बहुलक्षी, चौफेर नजर ठेवत एकवेळी अनेक कामाचा उरक पाडत असते.
*खरंच तिचं बाईपण भारी*
काळ बदलत गेला तशी स्रीची मानसिकता परिस्थितीनुरूप बदलत गेली. *न स्री रत्नसमं रत्नम्* अशी संस्कृत ग्रंथातली तिची ओळख आहे.
नंतरच्या पुरुषप्रधान संस्कृतीत,
मनुस्मृतीत *न स्री स्वातंत्र्यं अर्हति* अशी तिची ओळख झाली.
तर सावित्रीच्या लेकींनी उच्च शिक्षित होऊन, *स्री स्वयं स्वातंत्र्यं अर्हति* अशी स्वतःची ओळख सर्व क्षेत्रात उंच भरारी घेत निर्माण केली.
माधवी ताईंनी ही त्यांच्या क्षेत्रात चांगली प्रगती केली .
मुलगी, बहीण , पत्नी, सून,वहिनी ,आई ही सर्व नाती अगदी आदर्श पद्धतीने निभावली .. पण
पण ह्या सगळ्यात त्या स्वतःसाठी ,त्यांच्या आनंदासाठी ,त्यांच्या छंदासाठी जगायला पूर्ण विसरून गेल्या..
त्यांच्या मुलाने स्वतःचा व्यवसाय करायचा ठरवला, त्याला मदतीची गरज होती तर त्याच्या आनंदासाठी क्षणात इतक्या वर्षांची नोकरी त्यांनी सोडून दिली आणि वयाच्या पन्नाशी नंतर नोकरी सोडून व्यवसायात उडी घेतली ते ही यशस्वी उद्योजिका होण्याचं स्वप्न उराशी बाळगून .
पण एक दिवस उजाडलाच जेव्हा त्यांच्या एका मैत्रिणी मुळे त्यांनी एका स्त्री संघटना मध्ये प्रवेश केला.. तिथे इतर सख्यांमुळे त्यांना त्यांच्या मधले अनेक शोध लागले ,त्या छान लिहू शकतात , कथा , कविता लिहायचा छंद लागला त्यांना .. स्वतःच लिहिलेल्या कविता म्हणताना त्यांना कळले की त्यांनी ठरवलं तर त्या छान गाऊ ही शकतात .. स्वतःचाच शोध घेताना चक्क वयाच्या पन्नाशी नंतर एका लग्नात त्यांनी स्टेज वर छान डान्स ही केला ..बापरे ,त्यांच्यामधील ती त्यांना कळायलाच पन्नास वर्षे जावी लागलीत ..
“अग माधवी ,मी कधीपासून तुला विचारतो आहे तुझ्या सत्काराला तू काय बोलणार आहेस ? ” मधुकर रावांच्या बोलण्याने त्या भानावर आल्या ..
“मी ना एक छानशी मी लिहिलेली कविता म्हणणार आहे .तुम्हाला म्हणून दाखवते .”
पायाला जणू भिंगरी
सततचे पळणे
कामाच्या चक्रव्यूहात
सदा व्यस्त असणे
किती अडखळले
सतत धडपडले
कामाच्या रहाटगाडग्यात
अडकूनच राहिले
स्पर्धात्मक युगात
निर्मिले स्व अस्तित्व
धकाधकीच्या जीवनात
हरवले मनशांती, स्वत्व
मनात सुप्त आशा
विकासाची नशा
सततचा ताणतणाव
तन मनाची दुर्दशा
अंतर्मनातली साद
ठेव हृदयावर हात
थांबव स्वतःला
नको अजून घात
शोधू कुठे शोधू कुठे
कोणी बघितलं का ?
हरवल मी मलाच
मी मला गवसेल का ?
घेतला आता ध्यास
मोकळा दीर्घ श्वास
माझ्यातल्या मी स
शोध मोहीम खास
कशी वाटली माझी कविता , मी प्रत्येक महिलेला आव्हान करणार आहे ,” शोध : माझ्यातली खरी मी ” .
पण मी हे ही आवर्जून सांगणार आहे की ,” आताच्या आधुनिक, इंटरनेट पाश्चिमात्य प्रभाव असलेल्या युगात
*भारतीय स्री अतिरिक्त स्वतंत्र होतेय* असं म्हणण्याची वेळ आली आहे. तिची मानसिकता कधी कधी टोकाला गेलेली दिसते. सतत तडजोडीला तयार असलेली ती स्वतः चा नको तेवढा विचार करताना स्वतःचंच नुकसान करताना दिसतेय. करिअरच्या मागे लागताना वय वाढत जाते मग लग्न नको या विचारापर्यंत पोचताना काही प्रमाणात दिसतेय. किंवा स्वतःच्या हट्टापायी सुसंवाद न ठेवता संसार मोडण्याकडे वळतेय.
असं करून कसं चालेल.
सृजनशीलता बहाल केलेली ही नारीशक्ती आहे. तिच्या मानसिकतेला समाजाने सन्मानित केले पाहिजे तसे तिनेही न्याय दिला
पाहिजे. ”
मधुकरराव त्यांच्या प्रतिभासपन्न पत्नी कडे बघून अभिमानाने बोलले ,
“*खोल खोल तुझ्या मनाचे आगर*
*थिटा तव महानतेसमोर सागर*”
🖊️ *सौ स्वाती येवले*
*ठाणे*

