आज नवरात्राच्या नवमीचा कुळाचार होता.जया, विजया दोघी जावा स्वयंपाक करत होत्या.भाजी झाली, चटणी,कोशिंबीर झाली.तोपर्यंत पुरणाची डाळ पण शिजली.
पुरणाची डाळ काढून जयाने वरणभात लावला.पुरण जाळीतून डाळ काढायला विजयाने घेतलं.
जया म्हणाली मी तोपर्यंत तळण करते.
तिने तळण्यासाठी तेलाची कढई गॅसवर ठेवली.तेल तापे पर्यंत पुरणपोळीसाठी मैदा आणि कणिक चाळून घेतली.
डाव्या हातात पाणी आणि उजव्या हाताने कणिक भिजवत असताना तिच्या नाकावर एक माशी बसली. पाणी खाली ठेवून त्या माशीला हाकलताना तिचा हात तापलेल्या तेलाच्या त्या
झा-याला लागला.धाडदिशी तेल उसळलं आणि तिच्या हातावर पडलं.
आई,…गं जया ओरडली.त्याच वेळी स्वयंपाक घराच्या खिडकीत एक पक्षी येऊन बसला आणि सारखा जया कडेच बघत होता,तोंडाने चुकचुक असा आवाज करत होता.
विजयाने डाळीचं भांडं बाजुला ठेवत विचारलं का गं काय झालं.अगं बघ ना तापलेले तेल उडालं.तीचा हात हातात घेऊन विजयाने पाण्याच्या धारेखाली धरला.त्याच वेळी खिडकीत येऊन बसलेला पक्षी विजयाला ही दिसला. ती म्हणाली,बघ तो पक्षी कसा आपुलकीच्या नजरेने बघतोय.जसं काही तुझं दु:ख त्यालाही कळतंय.पूर्व जन्मीचा तुझा कुणीतरी असावा.
अगं हो ना हल्ली रोज स्वयंपाक करताना हा माझी सोबत करतो.
बरा बाई तुझा सखा.
विजयाने तिच्या हातावर बरनॉल लावलं आणि म्हणाली आता ब-यापैकी स्वयंपाक झालाय तू जरा आराम कर पुढचं मी बघते.
उजव्या हाताने जमेल तेव्हढी मदत करून जयाने आणि विजयाने नैवेद्य आणि जेवणे आटोपली.सगळी आवर सावर झाली. दुपारचा दीड वाजला होता. आपापल्या बेडरूममध्ये आराम करायला दोघी निघून गेल्या.
जयाच्या हाताला जळजळ होत असताना गादीवर पडूनही तिला झोप येत नव्हती.तिला विजयाचं वाक्य *तुझा पूर्वजन्मीचा सखा* डोक्यात घाव घालतंय असंच काहीसं वाटत होतं.लग्न झाल्याला पाच वर्षे झाली. एक मुलगी झाली.मध्यंतरीत हे सगळं विसरायला झालं होतं.
आज पुन्हा एकदा ती लग्नाआधीच्या आठवणीत पोहोचली.
जया उंचपुरी धिप्पाड होती बॉब केलेले केस,सरळ पोपटाच्या चोचेसारख नाक,तारूण्यातला तेजतर्रार चेहरा, त्यातच नवनव्या फॅशनेबल कपड्यांमध्ये ती कॉलेजमध्ये वावरायची.कधी मॅक्सी ,मिनी स्कर्ट तर कधी बेलबॉटम पँट वर कमरेपाशी रूळणारा टॉप घालणारी अख्ख्या कॉलेजमध्ये ती एकटीच होती. दिसायलाही सुंदर असल्याने मुलांमधे आणि काही लेक्चररला पण ती आवडते असे त्यांच्या जवळीक साधणा-या नजरे मुळे ते तिला जाणवत असे.
असाच एकदा रसायन शास्त्राचा तास होता.जया मनापासून सर सांगतात ते ऐकत होती.मधून मधून काही टिप्स पण वहीत लिहून घेत होती.क्लासरूमच्या दरवाजा जवळच असलेल्या बेंचवर ती आणि तिची सखी बसल्या होत्या. दरवाजा बाहेरून कुणाची तरी हालचाल तिला न्याहाळत असलेली जाणवली.तिच्या लक्षात आलं तसं तिने बाहेर वळून पाहिलं तर जग्या बाहेर खुर्ची टाकून तिला बघत बसला होता.
तिने खूप रागाने त्याच्याकडे पाहिले.हाताची मूठ आवळून ती डेस्क वर आपटली.आवाज झाल्यावर सगळ्यांनी तिच्याकडे पाहिले.ज्यांना बाहेरचं दृष्य दिसत होतं त्यांना ते कळलं.सर म्हणाले काय झालं,जया म्हणाली सर मच्छर खूप त्रास देतायत.ठीक आहे दरवाजा लावून घ्या म्हणून सर पुढे शिकवायला लागले.
दरवाजा बंद केला म्हणून जग्याला खूप राग आला. त्याने त्याची गाडी बसला फॉलो करायला मित्राला सांगितले आणि कॉलेजमधून परत जाताना त्याने बसमधे तिच्याच बाजूला बसून प्रवास केला आणि म्हणत होता सांग मी तुला काही त्रास देतो का? मला तू आणि तूच खूप आवडते मी काय करू. मला तर असंही वाटतं की परमेश्वराने तुला माझ्या साठीच बनवलंय ज्यू.आय लव्ह यू जयू.आय लव्ह यू ..
तू पण सांग ना मी तुला आवडतो ना.जया एक शब्दही न बोलता मनाची सहनशीलता जपत नुसती बसून होती.
तू पण सांग ना मी तुला आवडतो ना.जया एक शब्दही न बोलता मनाची सहनशीलता जपत नुसती बसून होती.
जग्याच्या घरी मोठमोठ्या मिल होत्या.त्याच्या आजोबांनी ह्या कॉलेजसाठी खूप फंड उपलब्ध करून दिला होता.कॉलेजच्या परीक्षा पास होणं त्याच्यासाठी गरजेचं नव्हतं..दहा पिढ्या बसून खातील इतका पैसा त्यांच्याकडे होता.रोज नवनव्या गाड्या घेऊन तो कॉलेजला यायचा.
जग्या बद्दल ही माहिती ऐकल्यावर जयाला
प्रश्न पडला की याची तक्रार तरी कुठे करावी ना.
जग्याची बहीण पण कॉलेजमध्ये शिकत होती,तिला आपण हे सगळं सांगू म्हणून कुण्या मैत्रिणीने जयाला सांगितले.जयाने तिलाही सांगून पाहिले पण फार काही उपयोग झाला नाही.
एक दिवस जोरदार भांडणाचा आवाज आला सगळ्या वर्गातून सगळे प्रोफेसर आणि त्यांच्या मागे मुले पण बाहेर आले.बघतात तर काय स्कूटर स्टँडवरचा वॉचमन जग्याला म्हणत होता,सर तुमची बाईक आत स्टँडमध्ये ठेवा बाहेर नको आणि तो काही केल्या ऐकत नव्हता. सर आता प्रिन्सिपॉल सर येतील आणि मला वॉचमन म्हणून रागावतील. वॉचमन नवा होता ,त्याला हे माहीत नव्हतं की जग्याने कुठेही गाडी ठेवली तरी काहीही बोलायचं नाही.जग्या त्याला म्हणाला तू नवीन आहेस का? जास्तीचं बोलू नकोस माझं मी पाहून घेईन .
रोज सकाळी कॉलेजमध्ये येताना जाताना जयाच्या बस सोबत आपली गाडी चालवत जाणं,नावापुरत्याच दोन वह्या हातात घेऊन जयाच्या क्लासरूम समोर बसणं हा त्याचा दिनक्रम वर्षभर चालूच होता.
आता मे महिना आला होता.
सगळ्या मुलांना परीक्षेच्या नेमक्या तारखा कळल्या.वर्षभर चकाट्या पिटणा-यांचे धाबे दणाणले.सगळ्या रोजच्या कॉलेजच्या वेळेत सिरीयसली अभ्यास करू लागल्या. जया आणि तिच्या चार मैत्रिणींनी रोज एका ठिकाणी जमून अभ्यास करण्याचा टाईम टेबल ठरवला. सगळ्यांचे पेपर्स छान गेले.परीक्षा संपल्यावर त्या सगळ्यांनी सिनेमा बघायचा किंवा कुठेतरी भटकायला जायचं असले प्लॅनिंग केले होते. सिनेमा पहायला जाण्याचं ठरत होतं,तेव्हा जया म्हणाली,फार रात्री उशिराचा सिनेमा नको गं दुपारचा शो बघू,नाहीतर आई रागावते.
प्रिया म्हणाली तुझा तो मजनू येईल ना सोबत करायला.
जयाला खूप राग आला, ए, काहीही काय बोलतेस गं.माझा मजनू म्हणायला मी काय स्वीकारलंय का त्याला?
हो अगं हे जबरदस्तीचं अतिक्रमण आहे. मनाली म्हणाली,सगळ्यांनी तिची री ओढली.
दुसरे वर्ष सुरू होताच दोन दिवस झाले तरी जया कॉलेजला आलेली नव्हती.जग्याला चैनच पडत नव्हती. त्याला वाटले हीचे वडील इरिगेशनचे इंजिनिअर आहेत त्यांची बदली वगैरे झाली की काय.जग्याने तिच्याकडील कामवाल्या बायकां कडे चौकशी सुरू केली.ही फॅमिली कुठे गेलीय,कधी येणार आहे? दोन तीन कामवाल्यांनी माहिती दिली नाही.
एका कामवाली ने सांगितले की ते लोक लग्नाला गेलेत,आठवडाभरानी येतील,तेव्हा कुठे त्याने चौकशी थांबवली.
आठवडाभरानी जया कॉलेजमध्ये आली.तिला पाहून झाल्यावर जग्या खूप खुश दिसत होता. काहीतरी गुणगुणतच गाडी चालवत होता.
प्रियाच्या बाबांचं प्रमोशन झाले,पार्टी तो बनती है यार म्हणून सगळ्या मैत्रिणी नी कॉलेज कॅन्टीनमध्ये काहीतरी खायला मिठा खाण्याचं ठरवलं. स्पेशल रूममधे या सगळ्या जणी बसल्या होत्या यांची आपली मस्करी ,कोणत्या तरी सरांची नक्कल वगैरे चालू होतं. बाहेर तीन चार मुले ब-याच मोठ्या आवाजात बोलत होते.
अरे तो जग्या आणि त्याचं ते प्रेम या विषयावर बोलणं सुरु होतं.मला काय वाटतं की ती जया याला काहीच रिस्पॉन्स देत नाही हा उगाचच हेलपाटे घालत बसतो. दुसरा म्हणाला नाही अरे तो म्हणतो,शंभर वेळा जर मी तिला आय लव्ह यू म्हणालो तर एक दिवस ती ही म्हणेल आय लव्ह यू. तिसरा म्हणाला
बापरे केवढी प्रचंड आशा बाळगतो नं हा आणि केवढा हा पेशन्स,मी तर सोडून दिलं असतं रे,काय जन्मभर वाट पहायची का एखाद्या मुलीची.
मुले तर खाऊन झाल्यावर निघून गेली.जया मात्र खूप अस्वस्थ होती.बापरे माझं अस्तित्वच धोक्यात आहे. ह्या विचाराने तीला रात्रभर झोप आली नाही.सारखी विचार करत होती,कुणावर तरी जबरदस्तीने प्रेम लादण्याचाच प्रकार आहे हा.आतापर्यत मी ह्याच्या खोड्यांकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा अर्थ हा असा समजतोय.आता चूप बसून चालणार नाही.काहीतरी करायलाच हवं.
दुसरे दिवशी कॉलेजमध्ये बसमधून येताना तिने त्याला खिडकीतून बाहेर बाईक चालवताना पाहिले. नेहमीप्रमाणे बसमधून उतरल्यावर समोरच तो उभा होता.
तिने त्याला थेट प्रश्न विचारला तू हे असं का करतोस?
प्रथम तर ती आपल्याशी बोलतेय म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकली या आविर्भावात तो म्हणाला,म्हणजे काय ?काय करतोय मी,मला प्रश्नच समजला नाही.
तू असा रोज आमच्या बस सोबतच गाडी चालवत का येतोस?
माझीही पण कॉलेजची वेळ तीच तर असते ना.मग गाडी चालवत यायला नको का?
आजूबाजूला जमलेले सगळे मित्र होsss करून हसायला लागले.जयाला खूप लाजिरवाणे झाले.तिच्या मैत्रिणी त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही,असे म्हणून तिला हात धरून वर्गात घेऊन आल्या.
संध्याकाळी तर अशी हूल उठली होती,आज जया त्याच्याशी बोलली म्हणे,फालतुच नखरे करतात या मुली, म्हणून सगळे मुलं तिला चिडवत होते,शेवटी मान्य केलंच ना.
होठो पे ना थी मगर दिल मे हां थी.असल्या घाणेरड्या कमेंट ऐकाव्या लागल्या.
तिला इतका राग आला होता वाटलं, खरं काय घडलं ते तर यांना सांगावं, एक काठी घ्यावी आणि झोडून काढावं सगळ्यांना पण मुलींना नेहमीच सहनशीलता धारण करावी लागते अन्यथा मुलं भयंकर वचपा काढतात.आपण अनेक कथा कादंब-यातून वाचतो ऐकतो ना.
जयाने वर्गात बसण्याची जागा बदलली.आता त्याला ती बाहेर दरवाजा समोर उभं राहून दिसत नव्हती.त्याने वर्गात मागच्या बेंचवर येऊन बसायला सुरूवात केली. तास संपल्यावर मात्र तो आय लव्ह यू जयू असे मोठ्याने म्हणून बाहेर पडला आणि सगळे मुलं खूप जोरात हसले.मॅडमनी पण ते ऐकलं आणि त्याच्याकडे पाहिलं.तिने बायोच्या मॅडमला सगळी हकीकत सांगितली,तर त्या म्हणाल्या दुर्लक्ष कर, एवढंच सांगू शकते.
घरी आल्यावर तिने टी व्ही ऑन केला. रिमोटने चॅनल सर्च करताना कुठल्याशा चॅनेलवरील एक मुलगी बोलत होती,
* खरं प्रेम हे शालीन कुलीन असतं ते चारचौघात मोठ्याने सांगण्याची गोष्टच नाही. हे हृदयीचे भाव ते हृदयी उतरवणारं प्रेम खरं असतं. प्रेम म्हणजे त्याग,प्रेम म्हणजे सेवा, प्रेमाची जाणीव होते ज्या हृदयाला त्याला हृदयस्थ ईश्वर सापडतो. प्रेम ही हृदयातली एक सुगंधी कुप्पी असते.त्या सुगंधाची जाणीव आयुष्यभर घेता येते.
फटदिशी टीव्ही बंद करून ती कपडे बदलायला रूममधे निघून गेली.
कपडे बदलून जरा आराम करायला बेडवर टेकली.
तिच्या मनात विचार आला मला हे कसलं प्रेम मिळालंय रोज उठून फजिती,सगळे मुलं हसतात,हल्ली तर जवळच्या असणा-या मैत्रिणी पण कमेंट करायला लागल्या आहेत.
जयाच्या आईने संक्रांतीचं हळदीकुंकू ठेवलं असतं.नाराज झालेल्या मनाला कसाबसा साज चढवून,साडी वगैरे नेसून, जया तयार होते. दोन चार जणी येऊन गेल्यावर ती आत जाऊन बसते. पुन्हा कुणीतरी चारपाच बायका येतात, जया नाही दिसत म्हणून विचारतात.जयाची आई म्हणते,अहो आहे ना
अगं जया जरा बाहेर येतेस का आईच्या आवाजाने जया बाहेर येते.
अगं बाई किती सुंदर दिसते ना जया,जयाला उगाच लाजल्यासारखं वाटतं.
दुसरी म्हणते वयात आल्या की मुली साडीत खूप छान दिसतात. तिसरी म्हणते आली आता लग्नाला.जयाची आई हसते. एक जण मधेच डोकं काढून म्हणते पण तुम्हाला काही चपला झिजवायची गरज नाही.कॉलेजमधला तो कुणीतरी तिच्यावर खुप प्रेम करतो म्हणे.जयाच्या आईचा चेहरा खर्रकन उतरला. हळदकुंकू घेऊन बायका निघून गेल्या .जया त्या दिवशी विचाराने इतकी थकली होती की ती न जेवताच झोपून गेली.
अर्ध्या रात्री जाग आली,तिचा नेहमीचाच विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हता.जरासं पाणी पिऊन ती पुन्हा लोळत पडली.
आता या मुलाला मी खरं प्रेम काय असतं ते शिकविणार,त्यात माझा बळी गेला तरी चालेल,असं मनोमन ठरवून ती स्वतः मनाशीच हसते.घरात ती एकटीच असते शिवाय घरातून जाती धर्माचं असं कुठलंही बंधन तिच्यावर नसतं.
आता आजपासून मी या मुलाशी गोड बोलणार. कॉलेजचं तिसरं वर्ष असतं.
सकाळी कॉलेजमध्ये गेल्यावर ती त्याला हाय म्हणते.कसा आहेस जगन्नाथ विचारते.
तो इकडे तिकडे पाहतो कारण त्याला जगन्नाथ ह्या नावाने कोणीच हाक मारत नसतं.
ती म्हणते मी,मीच म्हणाले जगन्नाथ
जग्याला त्याच्या अंगावर तर फुले पडल्याचा भास झाला.ब-याच वेळाने तो म्हणतो मी ठीक आहे पण माझं जगन्नाथ हे नाव तुला कसं कळलं.
अरे जगन्नाथ आपल्या हजेरी पुस्तकात तर आपलं नाव पूर्ण असतं ना,तेच मी वाचलं.
अरे हो खरंच मी तर विसरलो होतो.
पण आज तू स्वतः होऊन माझ्याशी बोललीस काय मन पालट बिलट झालं की काय.
हो तूच तर म्हणतोस ना आय लव्ह यू जयू.
मग लव्ह म्हणजे काय ते तुझ्याकडूनच समजून घ्यायचं ठलविलंय.
काय गं काहीही विचारतेस,लहानसा मुलगा ही याचा अर्थ सांगेल.
विचार बरं ह्या तुझ्या मित्राला.
ए सांग रे आय लव्ह यू जयू म्हणजे काय?
म्हणजे …म्हणजे… हा जग्या तुझ्यावर प्रेम करतो.
अरे हो, पण प्रेम करणं म्हणजे काय?
ते सिनेमात दाखवतात तसं.
अच्छा, म्हणजे आधी रोमान्स मग लग्न.
हो हो तेच ते इति जग्या.
अरे हो, पण तू मारवाडी मी कुणबी तुझ्या घरचे लोकं मला स्विकारतील का?याचा विचार केलास का?
खरं तर नाही पण आपण वेगळे घर बांधून राहू.
आणि शिक्षणाशिवाय तू असा काय उद्योग करणार की ज्याने आपला संसार उत्तम होईल.
माझ्या नावावर खूप पैसा आहे.
वाटलेच मला तू हेच उत्तर देशील.
बरं तुझ्या घरी कोणकोण असतं.
आमच्या घरात जवळपास वीस लोकं राहतात.
अरे पण तू प्रेम करायचं सोडून,हे काय विचारते आहेस.
तुझ्यावर प्रेम करण्यासाठी तुझी माहिती तर घ्यायला हवी ना.
ओ.के .
आता बघ मी माझ्याबद्दल सांगते,
माझ्या घरात फक्त मी आणि माझे आईबाबा एवढेच तीन लोकं राहतो.
मला किमान बी.ए.बी एड झाल्याशिवाय लग्न करायचं नाही.तसेच मला शिक्षिकेची नोकरी करायला खूप आवडते.
तुमच्या घरी तर बायका नोकरी करत नाहीत,मग कसं जमेल आपलं.कर कर विचार कर.
इतक्यात बेल वाजली आणि जया पिरीयडला निघण्यासाठी उठली पण जाताना सांगून गेली परवा ऑफ पिरीयड आहे तेव्हा पुन्हा बोलू.
आता मी तुझ्याशी खूप मन मोकळं बोलणार असं ठरवलं आहे.
जग्या बसल्या जागी बसून होता.तो थोडा खुश थोडा विचारी दिसत होता.
जयाला पण आज खूप मन मोकळं वाटत होतं.ती मनाशीच म्हणाली देवाने आपल्याला संभाषण करण्याची कला दिली आहे ना,मग रोज भिती,फजिती यात जगण्यापेक्षा हे बरं झालं आणि रात्रभर शांत झोप लागली.
आता ते जयाला ऑफ पिरीयड असला की कॉलेजमध्ये असलेल्या हिरवळीवरील बेंचवर बसून आपलं लहानपण, नातेवाईक,आवडणा-या वस्तू, सिनेमा नाटक या विषयी बोलायचे.दोघंही खूप खुश असायचे.
एक दिवस जया म्हणाली तू रोज आय लव्ह यू म्हणायचास आणि माझ्यावर काय काय बेतलं ते माहीत आहे का?
नाही नाही!!
अरे सगळे मुलं माझ्यावर हसायचे आणि म्हणायचे की तू मला पागल करून सोडशील.लेक्चरर स्टाफ पण मला टाळायचा. हल्ली तर मैत्रिणी पण मला तू माझा मजनू आहेस म्हणून चिडवतात.तसेच शेजारी सर्व लोकं मी काहीतरी वाह्यात मुलगी आहे अशा दृष्टीकोनातून बघायचे.माझ्या नातेवाईकांनी तर बाबांना माझं लग्न लवकर करून टाक असला सल्ला दिला होता.आत्याने तर तिच्या नात्यातल्या मुलांची माहिती पण पाठविली होती.
मला सतत अपमानाला सामोरं जावं लागायचं.मला तर बी.एस सी. बी एड होऊन मुलांना शिकवायचे होते.
मग मी ठरविलं तुझ्याशी ह्या सगळ्याच विषयावर बोलायचं.तुझ्या आय लव्ह यू म्हणण्याने माझ्यावर काय काय बेतलं होतं.आता सांग ह्या सगळ्याची तुला अजिबातच कल्पना नसेल ना.
हो गं जयू खरंच मला ह्याची अजिबातच कल्पना नव्हती.मी हे काय करून ठेवलं आहे मला माफ कर जयू माफ कर ग जयू.
इथपासून जग्याने “आय लव्ह यू जयू” असे म्हणणे सोडले आणि तो जयाशी अत्यंत शालीनतेने बोलायला लागला.
कॉलेजमधलं तिसरं वर्ष इतक्या लवकर कसं संरलं ते दोघांनाही कळलं नाही.
आता माझी परीक्षा जवळ आलीये,मला अभ्यास करायचाय आणि मी फक्त पेपरलाच बाहेर पडेन,तेव्हा आपण आता परीक्षा झाल्यानंतर बोलू म्हणत दोघांनीही निरोप घेतला.
जग्याला पण कशी काय कोण जाणे एक प्रकारची मनःशांती मिळाली होती.तो आता वडिलांच्या कारभारात लक्ष घालत होता.आई वडिलांकडून चांगल्या कामाबद्दल शाबासकी पण मिळवत होता.
प्रचंड प्रमाणात पैसा असणा-या व्यापा-यांची आपसात खूप दुश्मनी असते.ते सगळे एकमेकांचं नुकसान करण्यास टपलेले असतात.एक प्रकारची जेलसी असते.
जग्याच्या घरच्या भावाचे, काकाचे, पुतण्यांचे सगळ्यांचे आपापले वेगळे व्यवसाय होते.जग्याने मात्र बाबांना आराम देण्यासाठी त्यांचा चार चाकी वाहनाच्या व्यवसायात लक्ष घालायचं ठरवलं होतं.
त्याच्या काकांचा फोन आला “अरे जगू बेटा दुकान से लौटते समय जरा इधर से आना.मेरी गाडी मे कुछ बिघाड था,ब्रेक नहीं लगता था तो वो ड्रायव्हर गराज मे लेके गया है,कल सुबह मिलेगी गाडी.बोल रहा था.
तो हो म्हणाला .
रात्री साडे आठला दुकान बंद करून तो सोन्या चांदीच्या दुकानाबाहेर येऊन थांबला.त्याने काकांना फोन करून सांगितले आणि तो हेडफोन लावून गाणे ऐकत बसून राहीला.प्रत्येक गाण्यातली नायिका त्याला त्याच्या जयूची आठवण करून देत होती.आपल्या प्रेमाची सफलता त्याच्या हृदयाला प्रसन्नता देत होती.
काका सगळी कॅश एका बॅगेत भरून घेऊन आले.ती बॅग मागच्या सीटवर ठेवून ते जग्याच्या बाजुला बसले.रात्रीचे साडे दहा झाले असतील.गाडी घराकडे निघाली.घराकडे जाताना रस्त्यात शुकशुकाट होता. काका काही बाही ऐकवत होते ह्याचं लक्षच नव्हतं.
अचानक एक बाईक समोर आली. त्यावरून तीन जण उतरले जग्याने करकचून ब्रेक लावले.
बाईकवाला शिव्या देत जग्या पाशी आला आणि त्याला बाहेर खेचले.दुस-याने मागच्या सीटवरची कॅशची बॅग उचलली.हे जग्याच्या लक्षात आले त्याने त्याची कॉलर पकडली.ए क्या कर रहा है बे म्हणत त्याने त्याला मागच्या दारापर्यंत खेचत नेले.तोपर्यत काकाने त्या दुस-याला पकडलं होतं.हे दोघं विरोध करतायत हे लक्षात आल्यावर तिस-याने त्याच्यावर गोळ्या झाडल्या.कॅशची बॅग घेऊन ते निघून गेले.काकाला हाताला एक गोळी लागली होती आणि जग्याला छातीवर पोटावर तीन गोळ्या लागल्या होत्या.तो तेथेच कोसळला.काकाने एका हाताने स्वतःच्या खिशातून मोबाईल काढून घरी फोन केला.थोड्या वेळाने घरच्या दोन गाड्यात बसून सगळे आले.त्यांनी मग जग्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं.
डॉक्टर म्हणाले खूप रक्तस्त्राव झाला आहे.येथे येण्यास खूप वेळ लागला का?आमचे प्रयत्न सुरू आहेत.रक्त तयार ठेवा.
घरातल्या सगळ्यांनी भराभर रक्तपेढीला आणि रक्तदात्यांना फोन केले. सगळ्या सुविधा पटापट मिळाल्याने पहाटेच पाच वाजता जग्या शुद्धीवर आला.
त्याची आई त्याच्याजवळ बसून होती जग्या शुद्धीवर आल्यावर तिला खूप आनंद झाला तिने सगळ्यांना बोलावले.डॉक्टरही म्हणाले आमच्या प्रयत्नांना यश आले.सगळेच जरा निवांत झाले काही जण घरी जाऊन झोपले.आई आणि भाऊ मात्र तिथेच झोपले.
सकाळी सात वाजता ,झाडू लावणा-या बाईने,नर्सला आवाज दिला आणि म्हणाली सिस्टर हा पेशंट बघा.
नर्स म्हणाली, बापरे डॉक्टरांना बोलावलं पाहिजे.
डॉक्टर आले आणि हात हातात घेऊन म्हणाले.सगळंच संपलंय.
नर्सने त्याच्या आईला उठवले आणि सांगितले डॉक्टर बोलवत आहेत.आईने भावाला उठवले आणि दोघे डॉक्टर काय म्हणतात ते ऐकायला गेले.
डॉक्टर म्हणाले ,तुमचा पेशंट पहाटे पाच ते सातच्या
दरम्यान हृदय विकाराने गेला. आम्ही आता काही करू शकत नाही .
आई तर रडायलाच लागली.भावाने घरी फोन करून सगळ्यांना बोलावलं.
जयाचा काल शेवटचा पेपर झाला आणि ती निवांत झोपली होती. तिला पहाटेच स्वप्न दिसलं.
“जगन्नाथ तिला म्हणत होता मला माफ कर जयू मी तुला खूप त्रास दिला पण खूप प्रेमही केलंय.ह्या जन्मात जरी मी तुला स्विकारू शकलो नाही तरी माझा आत्मा कायम तुझ्याभोवतीच राहून तुझ्या सुखाची कामना करेल.”
जया ने खाडकन डोळे उघडले.पहाते तर काय ती घरातच आपल्या बेडवर बसून होती.पहाटेचं स्वप्न खरं असतं असं म्हणतात पण हे काही खरं नसेलही असा विचार करून ती पुन्हा झोपली.
थोड्या वेळाने मनाली चा फोन आला.तिचे बाबा प्रेस मधे असल्याने त्यांच्या फोनवर मेसेज आला होता.
“अगं जया तो जग्या आहे ना त्याचा रात्री अपघातात मृत्यू झाला.”
ए काहीही काय ऐकवते गं सकाळी सकाळी.
नाही अगं खरंच सांगते.
जयाच्या हृदयात एक असह्य कळ आली.डोळ्यात पाणी आले.काहीही सुचत नव्हते.दिवसभर ती एखाद्या यंत्रासारखी वावरत होती.सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही अशी अवस्था झाली होती.
स्वत:च्या मनाची अस्वस्थता वाचताना ती म्हणाली,मी मला स्वतःला या सगळ्या पासून अलिप्त आहे असं समजत होते पण नकळत गुंतले होते.
जयाच्या बाबांचं प्रमोशन झाले.ते सगळेच बाहेरगावी निघून गेले.
हळूहळू जया सगळं विसरून गेली.तिने बी एस सी बी एड केलं.
एका माध्यमिक शाळेत तिला शिक्षक म्हणून नेमणूक मिळाली.
दोनच वर्षांनी तिचं लग्न नात्यातल्या सचिन पाटील या मुलाशी ठरलं.सचिन सोबत त्याची विधवा आई आणि एक भाऊ राहत होता.त्यांचा रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय होता आणि जयाची नोकरी सगळं छान जमून आलं होतं.
संसारात ती छान रमली होती.मनःशांती सह जगत होती.लहान दीराचं लग्न झाले.तिलाही एक छानशी मुलगी झाली.सगळं पाटील कुटुंब सुखात वावरत होते.
लग्नाला पाच वर्षे झाली होती.
एके दिवशी सकाळी पोळ्या करताना हा पक्षी स्वयंपाकघराच्या खिडकीत येऊन बसला.
जरा वेगळाच दिसायचा निळसर रंगाचा आणि बाकदार चोच.सुर्र सुर्र असा शिटीसारखा आवाज करायचा. जयाने दोन तीन वेळा लाटणं उगारून त्याला हाकलले पण तो जातच नव्हता. दोन दोन तास तो एकाच जागेवर बसून रहायचा.फार काही त्रास देत नसल्याने,जयाने त्याची दखल घेतली नाही.
आज विजयाने त्या पक्षाला
*तुझा कुणीतरी पूर्वजन्मीचा सखा*
म्हटल्यावर जयाला अचानक जगन्नाथ ची आणि त्या पहाटेच्या स्वप्नाची आठवण झाली. गेले सात वर्ष हा पक्षी कुठे असेल बरं.तिला आठवलं तिची आजी सांगायची, मृत्यू झाल्यावर, आत्म्याला मुंगी,माशी,गाय, बैल,कुत्रा,अशा पशु योनीत जन्म घ्यावा लागतो. तसलेच जन्म जगून झाल्यावर हा पक्षी म्हणून जन्मला असेल.स्वत:च्या विचारात हसून ती कामाला लागली.
जयाची मुलगी आता मोठी झाली होती.तिला शाळेत सोडून जया घरी आली.तो पक्षी दाराजवळ नातेवाईक असल्यासारखा वाट पहात बसून होता.
कधी कधी तिला त्याची दया यायची पण एका पक्षाशी काय बोलणार ना?.खायला काही दिले तर तो त्याला तोंड पण लावत नसे.
रोजच्या स्वयंपाकात पक्षाची सोबत ह्याची जयाला आता सवय झाली होती.
मध्यंतरी सासुबाई वय वर्ष ऐंशी वृद्धापकाळामुळे स्वर्गवासी झाल्या.
जयाची मुलगी आणि विजयाचा मुलगा दोघांचेही लग्न झाले होते.
जयाची सेवानिवृत्ती जवळ आली होती.त्यातच कोविडची साथ आली.लॉकडाऊन मुळे जयाची शाळा,नव-याचं दुकान सगळं ठप्प झालेलं होतं.
कामवाल्या बाया येण्याचं बंद झालं होतं.किराणा भाजी ऑनलाईन मागवणं सुरू होतं
ऑनलाईन आलेल्या भाज्या फळे धुवून घ्यायचे आणि वापरायचे.एवढी काळजी घेत असताना जयाला घशात खवखव जाणवू लागली.फॅमिली डॉक्टर म्हणाले कोविड टेस्ट करून घ्या पण आज पासून यांना १४ दिवस वेगळ्या रूममधे ठेवा.
कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी खूप औषधे लिहून दिली आणि घरातच वेगळे राहायला सांगितले.
जयाच्या रूम बाहेर जेवण,पाणी ठेवलेलं असायचं आणि विजया आवाज देऊन निघून जायची.कुणाशी बोलणं नाही की भेटणं नाही पण पक्षी मात्र खिडकीबाहेर सतत बसून असायचा.चोच हलवून आवाज करीत तो तिला काहीतरी सांगतोय हे तिला कळायचं.
चार पाच दिवसांनंतर जयाची तब्येत खूप बिघडली.डॉक्टर तर घरी येत नसत.दवाखान्यात ॲडमिट करेपर्यंत तिचा श्वास थांबला होता आणि पक्ष्यानेही खिडकीत प्राण सोडला होता.
©® स्वाती संजय देशपांडे नागपूर


छान चित्र संगीता