#माझ्यातलीमी
#दिर्घकथामालिका
#दीर्घकथाटास्क
#स्वप्नीलकळ्या🥀
# शापित_शिल्प
#भाग१. :—
श्रीशीलाची कहाणी आजपासून जवळपास ७८वर्षांपूर्वी म्हणजे १९४७ साली सुरू झालेली. श्रीशीलाने जन्म घेतला तोच आजूबाजूच्या परिसरात नावाजलेल्या पाटील घराण्यांत .घरी चांगली दिडशे एकर शेती,गाई-म्हशी, भरपूर दूधदूभते.शेतात काम करण्यासाठी खास डंगरे बैल. शेतीच्या ठिकाणी छोट्या खेड्यांत चौसोपी वाडा. गांवाचे पाटील असल्याने मानमरातब. एवढं सगळे होते पण श्रीशीला जन्माला आली तेच मुळी सोबतीला दुर्देव घेऊनच.
तीन मुलींच्या पाठीवर आता नक्कीच मुलगा होईल या गोष्टीकडे पाटील आणि पाटलीणबाईंचे डोळे लागले होते. गर्भलिंग चाचणी करण्याचा तो काळ नव्हता. यावेळी पाटलीणबाईंना जरा जास्तच कडक डोहाळे लागले होते. कित्येक दिवस पाणी ही पोटात रहायचे नाही,सतत उलट्यांचा त्रास.केव्हा एकदा नऊ महिने संपून बाळंत होते असे झाले होते.
शेवटी एकदाची बाळंतपणाची वेळ आली. नगरपालिकेच्या दवाखान्यात भरती झाल्यावर बऱ्याच त्रासानंतर एक सुंदर सुदृढ बाळ जन्माला आले. पण….शेवटी पुन्हा मुलगीच झाली होती. महत्वाचे म्हणजे ती मुलगी जन्माला आल्यावर रडलीच नाही.डाॅक्टरांनी अथक प्रयत्न केल्यावर बऱ्याच वेळानी रडली पण तिच्या रडण्याचा आवाज काहीतरी निराळाच येत होता. पण जीवंत राहिली हे ही नसे थोडके!
आईला मुलगा असो की मुलगी प्रेमाचे भरते येतेच. घरचे व पाटील साहेब थोडावेळ नाराज झाले पण इतक्या गोंडस सुंदर बाळाला बघून सगळ्यांची नाराजी दुसऱ्या क्षणी दूर झाली. पण त्या बाळाला जेव्हा पाटलीण बाईंनी अंगावर दूध पाजायला घेतले तेव्हा त्या बाळाचे दुर्दैव त्यांच्या निर्दशनास आले. बाळ व्यवस्थितरित्या दूधच पिऊ शकत नव्हते. बाळाच्या नाकातून दूध बाहेर यायला लागले. काहीच कळेनासे झाले. इतकी गोड, सुंदर मुलगी पण तिच्या नशिबाने तिच्या पुढे काय वाढून ठेवले होते! पाटलीण बाईंच्या डोळ्यांतून अश्रुधारा बंद होण्याचे चिन्ह दिसेना.काय करावे,कसे करावे काही मार्गच सुचेना.
तसा तो काळ फार विकसित झालेला नव्हता की एखाद्या व्यंगाचे निदान झाले की त्यावर लगेच काही उपाय करता येतील. त्यामुळे आहे ती परिस्थिती होती तशीच स्विकारण्या खेरीज इलाज नव्हता.दूध पितांना मुलीचा जीव घाबराघुबरा व्हायचा ,
दम कोंडला जायचा.नाकातून दूध किंवा पाणी बाहेर यायचे.पण तसेच दिवस ढकलणे चालू होते.
शेवटी जिल्ह्याच्या ठिकाणी एका प्रसिद्ध डॉक्टरांकडे तिला घेऊन गेले. तपासणीअंती त्या डॉक्टरांना दिसून आले की तिला दोन पडजीभा आहेत. वरती टाळूच्या भागांत एक बारीकसे छिद्र आहे. डॉ.नी सांगितले की एक पडजीभ काढून टाकता येईल.थोडी मोठी झाल्यानंतर तिचे घशाचे ऑपरेशन करायचे असे ठरले. दिसामासी तिची वाढ व्यवस्थित होत होती.
पण एक गोष्ट लक्षांत आली की ती सामान्य मुलांप्रमाणे बोलू शकत नव्हती.कानाने ऐकू येत असल्याने तिला बाकी सगळी समज व्यवस्थित होती.पण तिने बोलायचा प्रयत्न केला की काही तरी वेगळाच “गेंगाणा “आवाज यायचा.
तिचा बिचारीचा काहीच अपराध नसताना हे सगळे दु:ख तिला भोगावे लागत होते. कोणी काही प्रश्न विचारले की ती तिच्या परीने हळूहळू उत्तर द्यायचा प्रयत्न करायची.ती सुद्धा कांही समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असे. सुरूवातीला काही कळत नसले तरी हळूहळू तिची भाषा घरच्यांना समजायला लागली होती.
बघता बघता ती चार पाच वर्षांची झाली. आता तर ती खूपच गोड दिसायला लागली होती.कुरळ्या केसांच्या खांद्यावर रूळणाऱ्या लाल रिबिनीनी बांधलेल्या दोन घट्ट वेण्या,गोरापान वर्ण , लालचुटूक रेखीव ओठ, सुंदर हरिणीसारखे टपोरे डोळे, चाफेकळी नाक जणू एखादे शिल्प!
पण ते एक *शापित शिल्प* होते .
ती हळूहळू शेजारपाजारच्या मुलामुलींबरोबर खेळायला लागली.
लहान वय असल्याने फार प्रश्न निर्माण झाला नव्हता पण आता शाळेत पाठवायची वेळ आली होती .आईवडिलांना काळजी वाटणे स्वाभाविक होते. शाळेत न घालता नुसते घरात बसवून ठेवणेही योग्य नव्हते. शीलालाही आता बऱ्यापैकी समज आल्यामुळे सगळ्यांपेक्षा आपण काहीतरी वेगळं बोलतो ह्याची जाणीव व्हायला लागली.
काहीवेळा तिचे बोलणे समजत नसल्याने शेजारपाजारची मुलंमुली तिला खेळायला घेत नसत.मग शीलाला खूप वाईट वाटायचे. घरी येऊन उशीत तोंड खुपसून बिचारी रडायची.मग आईच तिची खूप समजूत घालायची.
“आता शीलाचे ऑपरेशन झाले की मग शीला सगळ्यांसारखी छान बोलायला लागणार,”असे म्हटले की लगेच शीला खुदकन हसायची.तिच्या गालावर पडणाऱ्या खळीमुळे ती अधिकच गोड दिसायची.आईचे डोळे सुद्धा अश्रुंनी डबडबून जायचे.या पोरीच्या नशिबात दैवाने काय मांडून ठेवले आहे काय माहित ह्या विचाराने पाटलीणबाईंचा जीव कासाविस होत असे.त्या प्रेमाने तिला जवळ घेऊन घट्ट हृदयाशी पकडून ठेवीत.माझ्या पोटी शापीत सौंदर्य जन्माला आले आहे असे त्यांना नेहमीच वाटत असे.
#भाग२:—-
इतक्या सगळ्या मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात तिच्यासोबत
खेळणारा आनंद तिचा खास मित्र बनला होता.तो कधीही हिला चिडवायचा नाही उलटे तिच्या सोबत सतत खेळायचा. आनंद शीलापेक्षा जवळपास तीनचार वर्षांनी मोठा होता व अगदी मनापासून हिच्या सोबत खेळायचा.
त्याची आई सांगायची, घरात तो सारखा शीला- शीला करीत असतो व कधी कधी तर तिचे नांव ही आपल्या हातावर लिहितो. त्याला शीला फारच आवडते व तो सतत तिची नेहमी आठवण काढत असतो.
शीलाला आता शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. शिक्षकांना ही तिचे बोलणे समजत नसे.पण गावच्या पाटलांची मुलगी म्हणून तिच्याकडे ते व्यवस्थित लक्ष देत असत. बाकीचे मुलंमुली तिचे बोलणं समजत नसल्याने व बोलणे वेगळेच असल्याने “गेंगाणी-गेंगाणी” म्हणून चिडवित किंवा ” ए मुकी, ए मुकी” अशी हाक मारीत असत.
त्यामुळे सुरूवातीला तिला खूप रडायला येत असे. कालांतराने तिने ह्या गोष्टीची संवय करून घेतली. दरम्यान एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षांत आली की शीलाची वाचा जरी परमेश्वराने काढून घेतली होती तरी बुद्धिमत्ता मात्र भरभरून दिली होती.वर्गात लिहायला शिकवलेले शीलाला चटकन समजत असे व सहज सुंदर अक्षरांत ती लिहून काढीत असे.मग शिक्षक तिला शाबासकी द्यायचे व तिला खुद्कन हसायला यायचे. तिची कळी एकदम खुलायची.पुन्हा कोणी चिडवले की हिरमुसली होऊन चेहरा रडवेला व्हायचा.पण ते तेवढ्यापुरतेच असायचे.
श्रीशीला जवळपास दहा वर्षांची झाल्यावर, एक दिवस पाटील तिला जिल्ह्याच्या ठिकाणी घशाच्या डॉक्टरांकडे घेऊन गेले.तेथे तिच्या घशाची तपासणी झाली आणि आठ दिवसांनी तिचे ऑपरेशन करायचे ठरले.
सगळ्यांच्याच मनावर ताण आला होता कारण त्याकाळी इतक्या काही सुखसुविधा उपलब्ध नव्हत्या. शिवाय ऑपरेशन यशस्वी होऊन शीला निट बोलायला लागेपर्यंत काळजीच होती.
तिची जास्तीची पडजीभ काढून टाकण्यात आली. ऑपरेशन तर यशस्वी झाले पण तिचे दुर्देव मात्र आडवे आले . तिच्या घशाचे टाके
काढण्यापूर्वीच तिला खूप खोकला झाला.सारखा सारखा खोकला आल्यामुळे टाक्यांवर ताणआला.
ऑपरेशन यशस्वी होऊनही काही दिवसांनी बोलण्याचा प्रयत्न असफलच ठरला.फक्त आवाजात थोडासा फरक पडला होता पण स्पष्टपणे काही बोललेले समजत नव्हते.दुर्देव दुसरे काय!
डॉक्टर म्हणाले की,एखादे वर्ष जाऊ द्या,आपण पुन्हा प्रयत्न करू. त्यामुळे शांत बसण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. शीला आता जास्तच एकलकोंडी व्हायला लागली .आपल्याच बाबतीत असे कां घडले असावे ह्याचे तिला मनातून खूप दुःख वाटत होते.पाटलीणबाईंना तिचे दु:ख बघवत नसे.”इतक्या सुंदर मुलीच्या नशिबी परमेश्वरा, तूं हे काय लिहून ठेवले आहेस?” असा प्रश्न त्या देवाला सतत विचारीत असत.आता पुढच्या वेळी तरी परमेश्वरा चांगले यश मिळू दे ,अशी देवाकडे सतत आळवणी करीत होत्या.
एक वर्षानंतर पुन्हा ऑपरेशन झाले.यावेळी तर शीला आणखीच दुर्दैवी ठरली! तिला पुन्हा खोकला झाला व ऑपरेशन दुसऱ्यांदा ही असफल ठरले. आता मात्र कळून चुकले की तिच्या नशिबाची तिला साथ नव्हती. नशिब रुसले होते तिच्यावर.नशिबापुढे कोणाचेच कांही चालत नाही हे म्हणतात तेअगदी खरं आहे. यापुढील सगळे आयुष्य तिला आता नीट न बोलताच काढावे लागणार होते.
शीला हुषार असल्याने उत्तम रितीने मॅट्रिक पास झाली. वयात आल्यामुळे ती आता अतिशय सुंदर दिसायला लागली होती.पण लग्न करताना नुसते सुंदर असून काहीच उपयोग नव्हता. तिचे बोलणे तिच्यासाठी जणू शापच ठरला होता. त्यांच्या घरी अठरा वर्षे वय झाले की मुलींचे लग्न करण्याची पद्धत होती.त्यामुळे पाटील आणि पाटलीणबाईंना तिच्या लग्नाची खूपच काळजी वाटायला लागली होती.एखादा गरीब घरचा मुलगा बघून त्याला थोडीफार शेतजमिन भेट देवून त्याच्यासोबत लग्न लावून द्यावे असे पाटलांचा मनात होते.पण असा मुलगा काही कोठे सापडेना. तिला किती दिवस घरात बसून ठेवायचे हा प्रश्नच होता!
वास्तविक त्यांच्या घराण्यांत मुलींना फारसे शिकवतच नव्हते. शीलाचे लग्न जमणे फार कठीण गोष्ट वाटत होती.बऱ्याच मुलांनी नकार दिला होता .जवळपास एक वर्ष असेच सहज निघून गेले. दरम्यान पाटलांच्या मनात एक वेगळाच विचार आला.
त्यांनी तिला पुढे शिक्षण द्यायचे असे ठरविले.उद्देश हाच होता की ती स्वत: तिच्या पायावर उभी राहिली की काळजी रहाणार नाही . शिवाय नोकरीमुळे मिळणाऱ्या पैशाकडे बघून एखादा मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार होईल.
शीलाला तुझी पुढे शिक्षण घ्यायची तयारी आहे कां ? असे विचारताच शीला हरखूनच गेली. तिला मनापासून पुढे शिकायची खूप इच्छा होतीआणि ही इच्छा पूर्ण होणार होती. आता तिने मनोमन आयुष्यभर लग्नच करायचे नाही असे ठरवून टाकले. डॉक्टर होऊन लोकांची सेवा करू असा तिने उत्तम विचार केला.एम.बी.बी.एस. वगैरे शिकणे तर शक्य नव्हते म्हणून होमिओपॅथीचा डी.एच.बी.हा दोन वर्षांचा कोर्स करायचा असे ठरले.
त्यानुसार जिल्ह्याच्या ठिकाणी होमिओपॅथी काॅलेजमध्यें प्रवेश घेतला.त्याकाळातील शीलाचा संघर्ष फार मोठा होता. भाड्याने खोली घेऊन ती तिच्या एका मैत्रिणीसह दोन वर्षे राहिली. काॅलेजमध्यें सुरूवातीला तिला नीट बोलता येत नसल्याने बरेचदा प्रश्न निर्माण झाले तरी यावर मात करीत ती पहिल्या वर्षी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.त्यामागे तिची दिवसरात्र अभ्यासावर घेतलेली मेहनत कामी आली होती. तिचा शिक्षणातील उत्साह त्यामुळे व्दिगुणित झाला. काॅलेजमध्यें सुद्धा सगळ्यांना तिचे खूप कौतुक वाटायला लागले तिच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन आता बदलला होता.
#भाग३:—-
ह्या दरम्यान तिचा बालपणीचा मित्र आनंद हा सुद्धा नोकरीनिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी आला होता. कधीतरी तो शीलाच्या आईने पाठविलेल्या घरगुती गोष्टी द्यायच्या निमित्ताने हिच्या खोलीवर यायचा. काळ तसा जुनाच होता, पण तो तिच्या बहिणीचा पुतण्या असल्याने कोणाला फारसे त्यात वावगे वाटत नव्हते.
आनंदला लहानपणापासूनच शीला खूप आवडायची आणि आता तर तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागला होता. पण शीला श्रीमंताघरची मुलगी आणि आपण पडलो सामान्य घरातील त्यामुळे ह्यातून काही पुढे निष्पन्न होईल असे त्याला अजिबात वाटत नव्हते.
बघता बघता दुसरे वर्षही पार पडले आणि शीला डि.एच.बी.उत्तम रितीने उत्तीर्ण होऊन डॉक्टर झाली. आता तिने आपल्या गावात छोटासा दवाखाना उघडला.सुरवातीला ती देत असलेल्या होमिओपॅथी औषधावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या बारीक गोळ्यांनी रोग बरा होईल ही गोष्ट कोणाला पटत नव्हती.
पण हळूहळू आजूबाजूच्या लोकांनी खूप कमी पैशात उपचार करून मिळतात म्हणून तिच्या दवाखान्यात येण्यास सुरूवात केली. अचूक निदान करून औषध देत असल्याने शीलाच्या हाताला गुण येत गेला व तिच्या औषधावर हळूहळू लोकांचा विश्वास बसायला लागला.
औषध देण्यासोबतच
गावातील आजूबाजूच्या खेड्यांतील
लोकांना तिने स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगायला सुरुवात केली. तसेच मुलांना शाळेत पाठवून शिक्षण देणे कसे आवश्यक आहे , जीवनात शिक्षणाचे महत्त्व किती आहे हे ती सगळ्यांना पटवून सांगू लागली. दवाखान्यात औषध देता देता एकप्रकारे तिने समाजकार्य सुरू केले होते.
हळूहळू आसपासच्या खेड्यापाड्यातील बरेच लोक तिच्या दवाखान्यात औषध घ्यायला येवू लागले व हाताला चांगला गुण असलेली डॉक्टर म्हणून सगळीकडे तिचे नाव ही होऊ लागले.
आता पाटील व पाटलीणबाईंची अर्धी काळजी मिटली पण मनात अजूनही तिचे लग्न होऊन जीवन मार्गी लागावे असे वाटतच होते.
शीलाने तर आपले लग्न होणारच नाही हे गृहीत धरले होते.पण म्हणतात ना कधीं कधी आयुष्यात चमत्कार घडत असतात, तसाच चमत्कार तिच्या आयुष्यात घडला.
सहज बोलता बोलता आनंदचा विषय निघाला आणि तिच्या चेहऱ्यावर आलेले सूक्ष्म लज्जेचे भाव मोठ्या बहिणीच्या नजरेतून सुटले नाही.आनंद तिचा चुलत पुतण्याच असल्याने तिने सासरी हा विषय काढला.जेव्हा आनंदलाच स्वतः बहिणीने विचारले की ,”आनंद, तुला शीलाशी लग्न करायला आवडेल कां? “तेव्हा त्यानेही फार आढेवेढे न घेता , “काकू ,मी लग्नाला तयार आहे ,पण ती डॉक्टर असल्याने माझ्यासारख्या साधारण नोकरी असलेल्या मुलीशी लग्न करायला तयार होईल कां?” असा उलटा प्रश्न काकूला केला.
दोघेही एकमेकांना पसंत करत होते, पण पुढाकार कोणी घ्यायचा हा प्रश्न होता! घरातील मोठ्यांच्या संमतीने एका शुभ मुहूर्तावर देव ब्राह्मणाच्या साक्षीने श्रीशीला आनंदची झाली आणि दोघांचे संपूर्ण जीवनच आनंदमय झाले.
अशाप्रकारे ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण झाली. आज श्रीशीला या जगात नाही.पण या कहाणातील सगळ्या गोष्टींची साक्षीदार असलेली माझी एक मैत्रीण जिने तिचा संघर्ष जवळून पाहिला होता , तिने मला श्रीशीलाबद्दल सगळे सांगितल्यावर खर्या अर्थाने समजले की, “विजिगिषुवृत्ती काय असते!”
मनुष्याला आयुष्यात अनेक दु:ख असतात पण जेव्हा स्वतःच्या
अस्तित्वासाठीच संघर्ष करायची वेळ येते तेव्हा तो संघर्ष हृदयाला अतिशय भिडणा‌रा असतो.तुमच्याही मनाला तो भिडला असेलच. श्रीशीलाचा संघर्ष भावनिक, बौद्धिक व सामाजिक होता.प्रचंड ऊर्जेने तिने संघर्षाला तोंड दिले.
चला तर आपणही कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता निर्भिडपणे संकटाला सामोरे जात मात करू या.ह्यात परमेश्वर आपल्या पाठीशी असतोच ,हो ना!
© ® रोहिणी अग्निहोत्री ,पुणे
(स्वप्नीलकळ्या)🥀
(ही एक सत्यघटनेवर आधारित कथा आहे.)
#माझ्यातलीमी
#दीर्घकथा

17 Comments

  1. рулонные шторы на пластиковые окна с электроприводом [url=https://rulonnaya-shtora-s-elektroprivodom.ru/]рулонные шторы на пластиковые окна с электроприводом[/url] .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!