#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा(२१/७/२५)
#डायरी
#शब्दांच्यापलिकडलेनातं
विभाच्या सासूबाई अनेक वर्ष डायरी लिहायच्या. अर्थात त्यांची पहाटे उठल्यापासूनची दिनचर्या, महत्वाचे प्रसंग, विशेष खरेदी लिहिलेली असायची. त्या देवाघरी गेल्यानंतर त्यांच्या डायरी कोणी वाचू नये म्हणून विभा आणि सतीशने त्या फाडून टाकायच्या ठरवल्या. एक डायरी फाडताना पान पंख्याच्या वाऱ्याने फडफडलं. सहज विभाची नजर गेली. लिहिलं होतं, “पन्नास वर्षांचा संसार झाला. गरिबीत दिवस काढले. कधी मला दुखवलं नाही. फक्त मला ‘ मूर्ख कुठची ‘ म्हणायचात. तेव्हाही मी गालात हसायचे. आताही हसते आहे. पण हे दोन शब्द ऐकायला कान आसुसले आहेत. या ना हो परतून. किमान पुढल्या जन्मी तरी माझेच व्हा.”
खरंच दोघं एकमेकांशी जास्त बोलत नसत. परंतु छोट्या छोट्या कृतीतूनही प्रेम व्यक्त व्हायचं.
©️®️सीमा गंगाधरे
शब्द संख्या १००
