शब्दांचे फटके

inbound8528206398956507868.jpg

#माझ्यातलीमी
#विकेंडटास्क (०२/०१/२०२६)
#पुणेरीपाट्या
#विनोदीकथा
#शब्दांकन =अलका शिंदे

कथेचं शीर्षक :- शब्दांचे फटके

​पुण्यातील सदाशिव पेठेत ‘धोंडोपंत पाटीवाले’ यांचं दुकान म्हणजे एक विद्यापीठच होतं. धोंडोपंत केवळ पाट्या लिहीत नसत, तर ते समोरच्या माणसाच्या स्वभावानुसार “शब्दांचे फटके” देऊन पाटी तयार करून देत. त्यांचा एकच मंत्र होता – “पाटी अशी असावी की वाचणाऱ्याला मिरच्या झोंबल्या पाहिजेत आणि पाटी लावणाऱ्याला समाधान मिळालं
पाहिजे!”
एके दिवशी तिशीतली तरुणी त्याच्याकडे आली आणि म्हणाली ‘काका मी वैतागले आहे, सारखे मॉर्निंग वोॅक ला जाणारे माझ्या गार्डन कडे बघत असतात. कारण मी तिथे रोज योगा करते काय करू सांगा.’
​धोंडोपंतांनी लगेच लेखणी उचलली आणि कागदावर लिहिलं:

​”येथे डोकावून पाहू नये, आत काहीही प्रेक्षणीय नाही. स्वतःच्या घरात काय चालले आहे ते पहावे!”
मुलगी खूश झाली काका धन्यवाद म्हणाली.
​एके दिवशी धोंडोपंतांच्या दुकानात गराडा पडला होता. धोंडोपंत आपल्या चष्म्यातून समोरच्या ग्राहकाकडे बघत म्हणाले, “बोला पटवर्धन, कशासाठी पाटी हवी आहे?”
​पटवर्धन काका चिडून म्हणाले, “अहो धोंडोपंत, लोक सारखे घराचा पत्ता विचारतात. वैतागलोय मी!”
​धोंडोपंतांनी लगेच लेखणी उचलली आणि कागदावर लिहिलं:

​”पत्त्यासाठी विचारणा करू नये. आम्ही गुगल मॅपचे बाप लागत नाही. ज्याला स्वतःचा पत्ता ठाऊक नाही, त्याने घराबाहेर पडू नये!”

​पटवर्धन काका खूश झाले. धोंडोपंत आजूबाजूच्या लोकांना म्हणाले, “पाहिलंत? स्पष्ट बोललं की लोक शहाणे होतात. शब्दांना धार हवी, तरच शिस्त लागते!”

​तेवढ्यात शेलार मामा आले. त्यांचं सायकलीचं दुकान होतं. “धोंडोपंत, उधारी मागणारे खूप झालेत, काहीतरी तोडगा सांगा.” जीव वैतागून गेलाय.
​धोंडोपंतांनी तिरकस हसून पाटी सुचवली:

​”उधारी मागून स्वतःची इज्जत आणि आमची वेळ घालवू नये. येथे रोकड चालते, आणि आम्ही टोकडं बोलतो!”

​धोंडोपंत सर्वांना सल्ला देऊ लागले, “अहो, जग हे सरळ बोलून ऐकत नसतं. त्याला ‘पुणेरी टोमणा’ लागला की बरोबर वठणीवर येतं. पाटी ही घराची सुरक्षा कवच असते.”

एक हॉटेल व्यावसायिक आले. “काका, लोक जेवताना फोनवर एवढ्या जोरात बोलतात की इतरांना घास गिळणं कठीण होतं.”
धोंडोपंतांनी डोळ्यावरचा चष्मा सावरत लिहीले:

​”तुमच्या घरातल्या गप्पा ऐकण्यात आम्हाला रस नाही. मोबाईलवर मोठ्याने बोलणाऱ्यांना जेवण मिळणार नाही, त्यांनी थेट रेडिओ स्टेशन गाठावे!”
अहो असं लिहिलं तर लोक हॉटेल मध्ये येतील का?
मग काय लिहू सुचवा तुम्हीच?
हॉटेल व्यावसायिक साने काका म्हणाले, “अहो धोंडोपंत, असं ‘रेडिओ स्टेशन’ वगैरे लिहिलं तर लोक हॉटेलमध्ये यायचेच बंद होतील हो! काहीतरी ग्राहक टिकवणारे पण शिस्त लावणारे सुचवा.”
​धोंडोपंत मिश्किलपणे हसले, त्यांनी आधीची पाटी खोडली आणि दुसरी पाटी लिहिली:

​”जेवताना मोबाईलचा वापर टाळावा. अन्नाची चव जिभेला कळते, कानाला नाही. मोबाईलवर बोलणाऱ्यांनी कृपया स्वतःचे जेवण आणि इतरांची शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी!”

​धोंडोपंत पुढे म्हणाले, “साने काका, पुणेकर खवय्ये आहेत, त्यांना अन्नाचा अपमान सहन होत नाही. हे वाचल्यावर लोक फोन खिशात ठेवतील आणि जेवणाचा आस्वाद घेतील, बघाच तुम्ही!”
​इतक्यात एक तरुण मुलगा आला आणि म्हणाला, “काका, माझ्या घरासमोर लोक गाड्या लावतात, काहीतरी कडक लिहा.”
​धोंडोपंतांनी डोळे मिचकावले आणि पाटी लिहिली:

​”येथे गाडी लावल्यास चाकातील हवा काढली जाईल आणि त्या हवेचा फुगा करून तुमच्याच मुलांना खेळायला दिला जाईल. खर्च तुमचाच!”

​सगळे दुकानात पोट धरून हसू लागले. धोंडोपंत गंभीर होऊन म्हणाले, “हसू नका! हा व्यवसाय नाही, हे समाजप्रबोधन आहे. लोकांच्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी शब्दांचे दिवे लावावे लागतात.”

दिवसभर शब्दांचे डोस पाजून धोंडोपंत दुकान आवरण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात एक अतिशहाणा आणि गर्विष्ठ तरुण दुकानात शिरला. त्याने आजूबाजूच्या पाट्या पाहिल्या आणि उपरोधिकपणे हसून म्हणाला, “काय हो धोंडोपंत, तुम्ही सगळ्यांना शहाणपण शिकवता, पण तुमच्याकडे स्वतःसाठी एखादी पाटी आहे का? की फक्त दुसऱ्यांच्या घराबाहेर ‘मिरच्या’ लावायचा तुमचा धंदा आहे?”

​आजूबाजूचे लोक थबकले. त्यांना वाटलं आता धोंडोपंत चिडणार. पण धोंडोपंतांनी संथपणे आपला चष्मा नाकावर सरकवला. त्यांच्या चेहऱ्यावर एक मिश्किल पण करारी भाव उमटला. त्यांनी एक कोरा कागद घेतला, त्यावर काही क्षण लेखणी चालवली आणि तो कागद त्या तरुणाच्या हातात दिला.
​त्यावर लिहिलं होतं:
​”येथे शहाणपण विकले जाते, विनामूल्य वाटले जात नाही. ज्यांना स्वतःचे शहाणपण अगाध वाटते, त्यांनी ते स्वतःपाशीच सुरक्षित ठेवावे, कारण आम्हाला कचरा साठवायची सवय नाही!”
​तो तरुण निरुत्तर झाला. त्याचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता. काहीही न बोलता तो तिथून पाय काढता झाला. धोंडोपंत हसले आणि त्यांनी दुकानाचा फळा बाहेर काढला.
​त्यांनी शेवटचा समारोप करताना जमलेल्या लोकांना सांगितलं, “बघा, शब्दांचा फटका बसला की अहंकार गळून पडतो. पुणेरी पाटी ही केवळ लाकडाची पट्टी नसते, तो एक आरसा असतो. समोरच्याने त्यात स्वतःचं वागणं पाहावं, एवढीच आमची अपेक्षा!”
​रात्रीचे नऊ वाजले. सदाशिव पेठेत शांतता पसरली होती, पण धोंडोपंतांनी लावलेल्या त्या नव्या ‘शब्दांच्या दिव्यांचा’ प्रकाश मात्र लोकांच्या मनात बराच वेळ तेवत राहिला.
©® अलका शिंदे

error: Content is protected !!