शतशब्द कथा (लघुकथा)
#आउटिंग आणि स्वातंत्र्य दिन.
कथेचे शीर्षक :- ” दुहेरी स्वातंत्र्य”
कॉलेजचे मित्रमंडळ 15 ऑगस्टला ट्रेकला निघाले. पावसाळ्याचे दिवस असल्याने हिरवेगार डोंगर, डोंगरातून कोसळणारे पांढरे शुभ्र लहान-मोठे धबधबे. डोंगरदर्यातून हसत खेळत, टवाळक्या करीत निघाले. डोंगराच्या पायथ्याशी सर्वजण जेवायला बसले.
तेवढ्यात निसर्ग म्हणाला,” आजच स्वातंत्र्य म्हणजे माझ्यासाठी हेच! कोणत्याही बंधनाशिवाय मित्रांसोबत हसणे. सगळ्यांनी माना डोलावल्या.
तेवढ्यात जवळच बसलेल्या वृद्ध आजीबाई हळू आवाजात म्हणाल्या,” बाळांनो ,आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो , तेव्हा असं मुक्त हसू मिळावं म्हणून रक्त सांडलं! आमचं स्वातंत्र्य म्हणजे देशाला परकीय साखळीतून सोडवणंआणि तुमचं स्वातंत्र्य म्हणजे त्यातले दिवस मुक्तपणे जगणं”.
क्षणभर सर्वजण गप्पच! समोरचा वाऱ्याच्या वेगाबरोबर तिरंगा ही हलला… जणू त्या बलिदानाच्या कथाच सांगत होता. निसर्गाने आजीचा हात हातात घेतला म्हणाला,” आजी आम्ही हे हसू व्यर्थ जाऊ देणार नाही. तुमचं स्वप्न जपणं हाच आमचा खरा उत्सव असेल”.
आजी म्हणाली,” स्वातंत्र्याची ही अशी बीजं आहेत, जी फक्त जबाबदारीच्या मातीतच रुजतात”. स्वातंत्र्य म्हणजे केवळ बंधन मुक्ती नाही तर योग्य तेची जाणीव आहे.
स्वातंत्र्याच्या नव्या विचारासोबत ट्रेक पुढे सुरू झाला……….
शब्द संख्या:- १४७.
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®

सुंदर शब्दांकन