#शतशब्दकथा
उंच अंजू
बाबांची बदली झाली आणि अंजू नवीन शाळेत दाखल झाली. वयाच्या मानाने तिची उंची लहानपणापासूनच खूप कमी होती. पहिल्याच दिवशी वर्गातल्या मुली तिला बघून हसू लागल्या. बुटकी म्हणून चिडवू लागल्या. खेळायला, डबा खायला घेतले नाही !
अंजू रडत घरी आली. नाही जाणार शाळेत म्हणून हटून बसली. आईने तिला समजावले, ” तू दुर्लक्ष कर बाळा.. माणूस शरीराच्या उंचीने नाही तर मनाच्या, कामाच्या, स्वभावाच्या उंचीने मोठा होतो.”
अंजू आता हसून दुर्लक्ष करू लागली. अभ्यासात हुशार होतीच ! मनमिळाऊ स्वभाव आणि परोपकारी वृत्ती यांमुळे सर्व मुलींची आणि शिक्षकांची लाडकी झाली. अंजूला आता शाळा, मैत्रिणी सारे आवडू लागले.
तिला कळून चुकले… खरंच दुर्लक्ष करण्याचं कौशल्य वाढवणं म्हणजे सुख…!
शब्दसंख्या – १००
सौ. सुविद्या करमरकर
पुणे
