शतशब्द कथा
कथेचे शीर्षक :- ” नजरेच्या पलीकडचं सौंदर्य”.
एक तरुण छायाचित्रकार, आदित्य. त्याला फक्त सुंदर मॉडेल सारखे चेहरे टिपायला आवडायचे. ग्रामीण भागातल्या एका स्पर्धेसाठी त्याला गावात जावे लागले. तिथे त्याला चंद्रा भेटते.
रापलेला रंग, वाळवंटासारखा सुकलेला चेहरा, पण डोळ्यात एक अद्भुत तेज. तो पहिल्यांदा फोटो काढायला नकार देतो. पण गावातील तिचं काम, इतरांच्यासाठी समर्पण, आजारी आईसाठीची तिची धावपळ बघून त्याची दृष्टी बदलते.
त्याने तिचा फोटो काढला…. मातीने माखलेली, हातात विळा पण चेहऱ्यावर तृप्ती.
तो फोटो स्पर्धेत पहिले बक्षीस जिंकतो. लोक म्हणतात,” इतक्या साध्या स्त्रीचा फोटो का?”.
आदित्य हसून म्हणतो….
” बघण्याची नजर प्रामाणिक असेल, तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. आणि चंद्रा सुंदरतेचे प्रतीक!”.
(शब्द संख्या–१००)
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®
