# माझ्यातली मी
# कथा लेखन
दि. 5 जाने.2026
विषय…. काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही नाही मिळाल्या तरीही
वृक्षमाता
सोळा वर्ष पुर्ण झाले तरी तिला पाळी आली नव्हती म्हणून आईने डॉ.कडे आणले तपासणी नतंर धक्का च बसला तिला गर्भाशयच नव्हते त्यामुळे पाळी आली नव्हती बाकी ती पुर्ण निरोगी होती. घरी आल्यावर वडिलांना समजताच त्यांनी पण त्रागा केला .तिच्या मनाचा विचार न करता ही गोष्ट समाजापासून लपवून ठेवली व तिचे एका दूरच्या गावी लग्न ठरवले.
लग्नानंतर एक वर्षांपर्यंत सर्व निट होते.एक दिवस अचानक तिच्या पोटात दुखत होते म्हणून तिला डॉ.कडे दाखवले अपेंडिक्स होते पण ते ऑपरेट करता करता तिला गर्भाशय नाही हे तिच्या कुटुंबात समजले .आमची फसवणूक झाली असे म्हणत तिला त्याच रात्री बाहेरचा रस्ता दाखवल्या गेला.
मातृत्वापासून वंचित राहायचे दु:ख नशिबात आले असतांना जवळच्यांनी पण तिची साथ सोडली होती .आता जगून काय करायचे या विचारात असतांना ती फिरत फिरत ओसाड माळरानावर आली .इतक्या मोकळ्या ठिकाणी ती प्रथमच येत होती. काही ठिकाणी मोठी तर कुठे छोटी छोटी रोपे उगवली होती.ती तिला अनाथ बालकासारखी वाटली. ती शेवटी एक स्त्री होती .विचार केला यांना जर देखभाल मिळाली तर यांचे पण वृक्षात रुपांतर होईल अन्यथा काही जागेवरच जीव सोडतील.
अन इथेच तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली जुने सर्व विसरुन तिने स्वतःला निसर्ग रक्षणासाठी वाहून घेतले. बोटात चुकून राहिलेली अंगठी विकुन बियाणे खरीदी केली ओसाड जागेवर रोपे तयार केली .रस्त्याच्या दुतर्फा लावली.पाच वर्षात त्याचे वृक्षात रुपांतर झाले. प्रथम तिला वेडी समजणारे आता तिचे काम पाहून तिच्या मदतीला आले हळूहळू संपुर्ण गावात नतंर तालुका, जिल्हा करत तिचे वृक्ष संवर्धनाचे,निसर्ग रक्षणाचे कार्य इतके मोठे झाले की शेवटी राज्यसरकरला पण दखल घ्यावी लागली.
आज तिच्या जवळ सरकारी घर ,गाडी मानमरातब होता .आज तिला सरकार तर्फे ‘वृक्षमाता ‘ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले होते. ती जरी स्वतः जन्म देऊन आई होऊ शकली नाही तरी निसर्गाने, वृक्षांनी तिला मातृत्व बहाल केले होते. शेवटी एका न मिळालेल्या व दुसऱ्या रुपात मिळालेल्या गोष्टींनी तिचे आयुष्य बदलून टाकले होते. प्रत्येक स्त्री ही माता असते हे सिद्ध झाले होते.
विनया देशमुख
शब्द संख्या… 300
