वीकेंड टास्क मी आरजे

#माझ्यातलीमी
#वीकेंडटास्क
#रेडिओशो
#मीआरजे

नमस्कार श्रोतेहो, मी आर जे सीमा १०७.१ एफएम रेनबो चॅनेलवरून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे “सप्तरंगी साथ”.  मला माहितीये आपला हा कार्यक्रम दुपारी असूनसुद्धा आपण सर्वजण, प्राधान्याने महिलावर्ग दुपारची थोडीशीच झोप घेऊन कार्यक्रम ऐकायला खूप उत्सुक असता.  ह्या कार्यक्रमात आपण आपल्या आवडीची गाणी ऐकता ऐकता आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेत असतो.  आज आपल्या स्टुडिओमध्ये सर्वांना भेटण्यासाठी आल्या आहेत आपल्या सर्वांच्या आवडीच्या अभिनेत्री ज्यांनी अनेक मराठी मालिका, नाटके आणि सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.  परंतु आता त्यांनी त्यांचं लहानपणापासून जोपासलेलं एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं आहे.  मला कल्पना आहे तुम्ही कदाचित त्या अभिनेत्रीची मूर्त तुमच्या डोळ्यांपुढे साकारली असेल.  काही जणांना अजून ओळखता आलं नसेल तर त्यांना मी थोडा वेळ देऊन एक तुमच्या आवडीचं मराठी गीत आशा भोसले यांच्या आवाजात ऐकवते.

गीत _ आज चांदणे उन्हात हसले

ह्या सुरेल गीताची जादू तुमच्या मनावर रेंगाळत असतानाच मी आता स्वागत करत आहे अभिनेत्री अक्षरा कुलकर्णी यांचं.  अक्षयजी आमच्या एफएम रेनबो मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत.  आज तुम्ही आमच्या तरुण पिढी पुढे खूप आदर्श घालून दिला आहेत.  तुम्ही अभिनय क्षेत्रात खूप चांगलं नाव कमावलेलं असतानाही त्या क्षेत्रापासून तुम्ही दूर जाऊन तुमचं स्वप्न कसं साकारलं याबद्दल आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.

अक्षरा : सीमाताई आणि आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार.  कसं आहे ना आपण एखाद्या क्षेत्रात स्वतःला झोकून देतो तरीसुद्धा आपल्या मनात लहानपणापासून एक स्वप्न रुजलेलं असतं.  ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी आवश्यक असं खतपाणी जर मिळालं तर ते नक्कीच साकारलं जातं.  अर्थात ते स्वप्न शेवटपर्यंत आपण पाठपुरावा करत राहायलाच लागतो.  

आर जे :  अक्षरा जी आपण मगासपासून स्वप्न स्वप्न असं बोलत आहोत.  आपल्यातल्या काही जणांना ते स्वप्न कोणते कदाचित माहीत नसेल तर ते तुम्ही जरा विस्तृतपणे सांगाल का.

अक्षरा : हो नक्कीच.  मी लहानपणापासून माझ्या उराशी जे स्वप्न बाळगलं होतं ते म्हणजे मला शेती करायची होती.  मला माहितीये कदाचित तुम्हाला हसू आलं असेल.  मी मूळची कोल्हापूरची.  माझं सारं  बालपण कोल्हापूरलाच गेलं.  तिथे आम्ही एकत्र कुटुंबात राहत होतो म्हणजे माझे आई-बाबा एक भाऊ आणि आजी-आजोबा.  आमची खूप सारी शेती होती.  मी शाळेत शिकताना दुपारी घरी आल्यावर अभ्यास करायला आमच्या शेतावरच जायची.  आमच्याकडे शेतात काम करायला तेव्हा खूप सारी माणसं होती.  असं असलं तरी माझे आजोबा आणि आजी रोज शेतावर जायचे.

आर जे :  अक्षराजी तुम्हाला मध्ये थोडं थांबवते. तुम्ही म्हणता की तुम्हाला लहानपणापासून शेतीची आवड होती मग तुम्ही अभिनय क्षेत्राकडे कशा काय वळलात. त्याबद्दल आपण जाणून घेऊया पण त्यापूर्वी एक जाहिरात.  तुम्ही कुठेही जाऊ नका आम्ही लगेच परत येतो

डेटॉल _ माझ्या गिफ्ट साठी पिगीबँक का फोडली.
टाईड _ खरा एसआरके तर टाईडच आहे

अक्षरा. : सीमाताई तुम्ही अगदी अचूक प्रश्न विचारलात.  कसं आहे ना मी शाळेत जायची तिथे मी नाट्यछटा, गाणी, वक्तृत्व सर्वातच नेहमी हिरीरीने भाग घ्यायची.  सर्वांची मला आवड होतीच.  शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात मी या सर्व कार्यक्रमांमध्ये उत्सव मूर्ती असायची.  मला खूप बक्षीसे मिळायची.  तुम्हाला तर माहितीच आहे कोल्हापूर म्हणजे कलाकारांची मांदियाळी.  मला तिथे अभिनयाचं बाळकडू मिळालं.

आर जे :  म्हणजे अभिनय तुमच्या रक्तातच मुरलेला होता म्हणा ना.  तुमचे बाबा अभिनय क्षेत्रात होते, बरोबर नाही का.

अक्षरा :  हो माझ्या बाबांना अभिनयाची प्रचंड आवड होती.  ते सुद्धा आजोबांबरोबर शेतीत काम करायचे आणि अभिनयाची आपली आवड जोपासत होते.  मी कॉलेजमध्ये गेल्यावर विविध  एकांकिका स्पर्धांमध्ये घेतला.  आमच्या कॉलेजचे नाव नेहमी आंतर महाविद्यालयीन चषकावर कोरले जायचे.

आर जे : अभिनय क्षेत्रात तुमची गाडी वेगाने धावत असताना तुम्हाला शेतीकडे वळताना काही दुःख झालं का.  

अक्षरा. : दुःख असं नाही म्हणता येणार पण थोडं वाईट वाटलं.  एक तर लग्नाचं वय झालं होतं आणि आई माझ्यामागे लग्न कर लग्न कर म्हणून भुणभुण करत होती.  मी तिला आणि बाबांना स्पष्ट सांगितलं होतं की मी लग्न करेन तर ज्याला माझ्यासारखी शेतीची आवड आहे आणि जो शेतीमध्ये काम करू शकेल अशाच तरुणाशी मी लग्न करेन.  

आरजे :  हल्लीच्या तरुणांमध्ये अशी आवड असेल असं काही वाटत नाही तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे जोडीदार मिळाला.  अर्थात तो सहजासहजी मिळाला नसणारच. त्यांची आणि तुमची भेट कशी झाली?

अक्षरा. : असंच मी एका कार्यक्रमात मुलाखतीसाठी गेले होते.  तिथे एका प्रश्नांवर उत्तर देताना मी माझ्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या होत्या.  तेव्हा मी स्पष्टपणे सांगितलं होतं की असा तरुण श्रीमंत असलाच पाहिजे किंवा दिसायला खूप चांगलाच असला पाहिजे असं काही नाही.  माझी महत्त्वाची अट शेती हीच होती.

आरजे. : राजेश सरांनी तुम्हाला मागणी घातली का? या प्रश्नाचे उत्तर एकाला आपले श्रोते नक्कीच आतुर असतील पण तत्पूर्वी ऐकूया हे एक श्रवणीय गीत.

गीत _ धुंद मधुमती रात

ह्या अप्रतिम गीतानंतर तुम्ही आणि राजेश सर यांचे लग्न कसं झालं ते सांगा.

अक्षरा :  राजेश हा स्वतः बीएससी
(एग्रीकल्चर ) झालेला आहे.  त्याला शेतीची खूपच आवड होती परंतु त्यांची स्वतःची शेती नव्हती म्हणून तो एका कंपनीत एग्रीकल्चर डेव्हलपर म्हणून नोकरी करत होता.  त्यांनी माझी मुलाखत ऐकल्यावर एकदा स्वतःला आरशात पाहिलं आणि विचारू की नको या संभ्रमात असताना त्यांनी मला विचारले आणि मग मला माझ्या जीवनाचा शेतकरी जोडीदार मिळाला.

आरजे :  आता थोडक्यात तुम्ही शेतात काय पिकवता आणि कोणत्या पद्धती वापरता त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगाल का एका जाहिरातीच्या ब्रेकनंतर

लायझॉल _ मॅडम फिनाईल विसरून जाल तुम्ही
मोती साबण _ आली आली दिवाळी आली

अक्षरा. :  मी स्वतः लहान असल्यापासूनच शेतात थोडेफार काम करायचे.  तेव्हापासूनच या काळया आईशी माझी नाळ जोडली गेली होती.  माझ्या आईला तेव्हा मी असं शेतात काम केलेलं फार काही आवडायचं नाही.  ती म्हणायची नक्षत्रासारखं रूप आहे तुझं कोणत्याही घरात ऐटीत राज्य करशील.  माझ्या आजी-आजोबांना मात्र माझं खूप कौतुक होतं.  त्यांनी मला शेतातील सर्व काम शिकवली.  आता शेतात आम्ही पावसाळ्यात भात, जोंधळा अशी पिकं घेतो.   इथे पाणी मुबलक असल्यामुळे भाज्याही चांगल्या होतात.  राजेश स्वतः शेतकी पदवीधर असल्यामुळे ते विविध पद्धती मला सांगतात आणि अमलात आणतात.

आर जे : आता मला एक सांगा की समाजात वावरताना तुम्हाला अभिनेत्री म्हणून ओळखलेलं जास्त आवडतं की शेतकरी म्हणून ओळखलेलं जास्त आवडते. तत्पूर्वी ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजातील हे सुमधुर गीत.

गीत _ तळव्यावर मेंदीचा अजून रंग

अक्षरा : खरं सांगायचं तर जेव्हा मी अभिनय करायचे तेव्हा मला अभिनेत्री म्हणून ओळखलेलं खूप आवडायचं.  माझ्या अभिनयाची प्रशंसा ऐकताना माझा उर अभिमानाने भरून यायचा.  आता जेव्हा मी शेतीत काम करते तेव्हा मी रुजवलेल्या बियांचं पीक तयार होतं ते पाहून मला केलेल्या कष्टांचे चीज झालं असं वाटतं.  आज जेव्हा लोक मला एक प्रगतिशील शेतकरी या दृष्टिकोनातून बघतात तेव्हाही मला तितकाच आनंद होतो.

आर जे :  आज अनेक तरुण तरुणी बेकार आहेत अथवा नोकरीत असलेल्या कित्येकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे.  आजच्या तरुणाईला तुम्ही काय संदेश द्याल हे ऐकायला नक्कीच आवडेल छोट्याशा जाहिरातीच्या ब्रेकनंतर

अमुल _ दूध पिता है इंडिया

अक्षरा :  आपण सर्वांनी एक लक्षात घ्यायला हवं की भारत हा एक कृषिप्रधान देश आहे.  सर्वांनीच सुटाबुटातील आयटीतली नोकरी करायचा ध्यास घेतला तर आपल्या मूलभूत गरजांपैकी अन्नधान्य कोण पिकवणार.  मला असं म्हणायचंय की ज्याला शेतीची आवड आहे त्यांनी स्वतःची जमीन नसली तरी सुरुवातीला पोटापाण्यासाठी नोकरी करून थोडी बचत करून जमिनीचा तुकडा विकत घ्यायला काही हरकत नाही.  एरवी तुम्ही शहरातील लोक सेकंड होम म्हणून गावामध्ये गुंतवणूक करतात ना.  तेव्हा ती करताना थोडीफार शेती करण्याची इच्छा बाळगावी.

आरजे : अक्षराजी खरंच तुम्ही फारच मोलाचा संदेश आजच्या तरुणाईला दिला आहात.  तुमच्याशी शेती विषयक अजून गप्पा मारायला आम्हाला नक्कीच आवडलं असतं.  परंतु वेळेअभावी आपल्याला इथेच थांबावं लागतंय. पुन्हा कधीतरी तुमचे शेती विषयक विचार ऐकायला आपण पुन्हा भेटू.  आता आपण इथेच थांबूया. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात याबद्दल खूप खूप धन्यवाद. जाता जाता एक तुमच्या आवडीचं गाणं ऐकूया

गीत _ काळया मातीत मातीत

अक्षरा : सीमाताई मी तुमची खूप आभारी आहे तुम्ही मला इथे येण्याची संधी दिलीत आणि रसिक श्रोत्यांनी आपल्या झोपेचं खोबरं करून माझं म्हणणं ऐकलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद.

आरजे : श्रोतेहो आपला आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच फोन किंवा इमेल करून कळवा.  पुढल्या आठवड्यात भेटूया अशाच एखाद्या आगळ्यावेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आवडत्या व्यक्तीला.  तोपर्यंत मस्त मजेत रहा, हसत रहा.

©️®️ सीमा गंगाधरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!