विसाव्याच ठिकाण

IMG_9665.jpeg

#माझ्यातलीमी

#कथालेखन(१२/०१/२०२६)

विसाव्याचं ठिकाण

ईशा ऑफिसच्या कॅबमध्ये खिडकीबाहेर पाहताना स्वतःचे अश्रू लपवत होती. रात्रीचे नऊ वाजले होते. साहेबांचा ओरडा, कामाचा ताण आणि शहरी आयुष्याची धावपळ यामुळे ती पूर्णपणे खचली होती. तिला कोणाशी तरी मोकळेपणाने बोलावंसं वाटत होतं, पण मोबाईलमधील ५०० नावांवरून नजर फिरवतांना कोणाला फोन करावा, हे तिला सुचत नव्हतं.

तिला माहीत होतं, कोणालाही फोन केला की समोरून पहिला प्रश्न येणार— “काय काम काढलंस?” किंवा “काही अडचण आहे का?”. कोणालाही ‘विनाकारण’ त्रास द्यायला तिला संकोच वाटत होता.

तितक्यात फोन व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर ‘आई’ असं नाव चमकलं. ईशाने आवाज सावरून फोन उचलला, “हो आई, बोल ना. या वेळी फोन? काही काम होतं का गं?”

आई पलीकडून अगदी सहज म्हणाली, “नाही ग बाई, काही काम नाही. सहज बसले होते, तुझी आठवण आली. म्हटलं फोन लावून बघावा, माझी लेक काय करतेय. जेवलीस का गं?”

आईच्या त्या एका वाक्याने ईशाचा संयम सुटला. आईने ऑफिसबद्दल काही विचारलं नाही की रडण्याचं कारण विचारलं नाही. ती फक्त १५ मिनिटं घरच्या आणि गावाकडच्या साध्या गप्पा मारत राहिली. ईशाला त्या वेळी सल्ल्याची नाही, तर फक्त कोणाच्या तरी ‘वेळेची’ आणि ‘आवाजाची’ गरज होती.

तात्पर्य:

जगाला तुमच्याशी बोलायला काहीतरी ‘विषय’ लागतो, पण आईला फक्त तुमची ‘ओढ’ लागते. म्हणूनच खरं आहे— हक्काची माणसं कारण नाही, वेळ देतात.

✍️र सि का

©️®️रसिका चवरे

error: Content is protected !!