विषय आरशातील जग: आरशातून दुसर्‍या जगातला प्रवास!

कथा : **स्वप्न कि सत्य?**

लहानपणापासून तिला आरशात स्वतःला पाहायला खूप आवडायचं. ती तासनतास त्यात रमून जायची. आजी आणि आईचा किती ओरडा खाल्ला होता तिने त्यासाठी. कधी पाठीवर धपाटेही मिळाले होते. पण तिची ही सवय काही बदलली नाही.

लग्न झाल्यानंतरही सासू-नवर्‍याची चिडचिड व्हायची; पण ती तेवढ्यापुरतंच ऐकायची आणि पुन्हा आरशासमोर उभी राहायची!
तिलाही समजत नव्हतं, आपल्याला हा आरशाचा मोह का वाटतो? का आपण त्याच्या समोर भान हरपून उभे राहतो? कसले हे आकर्षण? पण ते होतं खरं… आणि अगदी खरं!

एकदा तिला घरात एकटीच राहावं लागलं. घरात कोणीच नव्हतं. तिने पटपट काम आटोपलं आणि आरशासमोर आली!
आज तर तिला कोणी ओरडायला नव्हतं, त्यामुळे तिची अगदी समाधीच लागली.

ती आरशात बघत होती की ती आरशातच शिरली हे तिलाच कळलं नाही!
ती तिच्या स्वप्नांच्या राज्यात पोहोचली होती. काय नव्हतं तिथे? – हिरवेगार डोंगर, उंच उंच झाडं, सुंदर बगीचे, खळखळणारे झरे. फुलांचे किती प्रकार, रंगीबेरंगी फुलपाखरं, पाखरं… फुलांचा मादक गंध मनाला भुलवून टाकणारा! सगळीकडे मखमली हिरवळ, सुंदर कमानी, गवाक्षं… आणि सगळीकडे मोठ्ठाले आरसे!

पहिल्याच आरशात पाहिलं तर ती दचकली. तिच्या अंगावर राजकन्येचा पोशाख होता. डोक्यावर सुंदर मुकुट. हे बघून तिचं भान हरपलं. अरे, हे तर लहानपणीचं स्वप्न प्रत्यक्ष उतरलं होतं!

दुसऱ्या आरशात डोकावली तर ती शाळेच्या गणवेशात होती. वर्गाची मॉनिटर, सगळ्यांना ताब्यात ठेवणारी, आणि बक्षीस समारंभात अमिताभ बच्चन यांच्या हातून बक्षीस घेणारी! सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत असताना तिच्या डोळ्यांत आनंद चमकत होता.

तिसऱ्या आरशात ती अबोली ड्रेसमध्ये दिसली. त्यावर पांढऱ्या फुलांचं भरतकाम, लांबसडक केसांचा वेणीशेपटा, कानात मॅचिंग कानातले, हातात पर्स… एकदम परफेक्ट! कॉलेजमध्ये सगळ्यांच्या नजरा ती सहज झेलत चालली होती. अप्सरेसारखी!

चौथ्या आरशात तिने पाहिलं… नवरीच्या वेशातली ती! शेजारी उभा असलेला नवरा, हळूच हाताला स्पर्श करणारा, कटाक्ष टाकणारा… त्या क्षणांनी ती रोमांचित झाली, लाजेने चूर झाली. पुन्हा तेच लग्नसोहळ्याचे क्षण ती अनुभवत होती.

तेवढ्यात सहाव्या आरशावर ऊन्हाची तिरीप पडली. ती तिकडे गेली, तर काय… ती एका बँकेत मॅनेजरच्या केबिनमध्ये बसलेली! कॉटनची साडी, मोजके पण नाजूक दागिने, आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व. फोन वर ह्या वर्षीची तीची Branch उत्कृष्ट Branch ठरली होती अशी कौतुकाची बातमी आली होती. ती भावविभोर झाली पण तिने स्वतःवर ताबा ठेवला होता. एक कर्तबगार महिला म्हणून ती काम करत होती.

हे बघून मात्र ती सस्मित झाली. कारण खरं तर हे अजूनही स्वप्नच होतं… पण आज ती ते अनुभवत होती, जणू खऱ्यासारखं.
आरशांच्या दुनियेत तिला तिचीच वेगवेगळी रूपं दिसली. आणि तिला कळलं आरसा तिच्यासाठी केवळ काच नव्हता, तर स्वप्नांचा, इच्छांचा, आणि स्वतःला शोधण्याचा एक दरवाजा होता

त्या विचारात ती इतकी तल्लीन झाली की बाहेरच्या गाडीचा हॉर्नसुद्धा तिला ऐकू आला नाही.
तेवढ्यात लँडलाईनची रिंग वाजली आणि ती भानावर आली. आरशातले ते जग एका क्षणात धूसर झाले.
घाईघाईनं ती बाहेर आली. अंगणात गाडी थांबलेली होती.

नवरा आणि सासू उतरून येत होते.
नवर्‍याच्या हातातून पिशवी घेताना तिची नजर त्याच्या डोळ्यांत जाऊन विसावली. त्या डोळ्यांत तिला आरशात दिसलेलं नवरीचं रूप क्षणभर पुन्हा तरळलं.

मनात एक हळवी जाणीव उमटली…
आरशाने दाखवलेली राज्यं, बक्षिसं, मुकुट, स्वप्नं… हे सगळं मोहक होतं. पण खरं आयुष्य मात्र या साध्या क्षणांत, या नात्यात, या नजरेत दडलेलं आहे.

तिच्या ओठांवर मंद स्मित उमटलं.
तिने मनाशीच कुजबुज केली…

“स्वप्नं सुंदर होती, पण खरं सुख माझ्या ह्या साध्या जगण्यात दडलेलं आहे.”

– सौ. सीमा अशोककुमार कुलकर्णी

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!