विश्वास

#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क (१५/९/२५)
#विश्वास

“सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू मांडतील”

“हॅलो साहेब तुमच्या ऑफिसमधील राहुलने पैशाची अफरातफर केली आहे. त्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये फाईल खाली पैसे लपवले आहेत.”

“कोण बोलतंय!”

धाडदिशी फोन ठेवल्याचा आवाज आला. त्या दिवशी नेमका राहुल गैरहजर होता. साहेब अस्वस्थ झाले. राहुलच्या कामावर खुश होऊन ते त्याला प्रमोशन देणार होते. खरं तर त्यांचा राहुलवर विश्वास होता. ते असे निनावी फोनवर विश्वास ठेवणार नव्हते. परंतु खात्री करण्यासाठी त्यांनी शिपायाला ऑफिसमधील चाव्यांचा जुडगा आणायला सांगितला. त्यांनी स्वतः राहुलचा ड्रॉवर उघडला. त्यांना पाचशेच्या नोटांचे कोरे बंडल मिळाले. ते त्यांनी कोणाला दिसू दिले नाही.

त्यांनी सर्व स्टाफला जवळ बोलावलं आणि झालेली घटना सांगितली. झालं! लगेचच सर्वजण राहुलबद्दल वाईटसाईट बोलू लागले. एकटा रोहन जो राहुलचा जिगरी दोस्त होता तो त्याच्या बाजूने बोलला,

“मी खात्रीने सांगतो राहुल असं कधीच करणार नाही. तो अत्यंत प्रामाणिक आणि कामात निपुण आहे. साहेब आता त्याला प्रमोशन देणार म्हणून त्याच्यावर जळणाऱ्या कोणीतरी हे केले आहे आणि हे मी आत्ताच सिद्ध करू शकतो.” सर्व एकदमच बोलले,

“कसं काय?”

“साहेब राहुलच्या ड्रॉवरमध्ये मिळालेली शंभर रुपयांची बंडल जरा दाखवा.” लगेच तिथे उपस्थित असलेला सुभाष, जो राहुलचा मित्र असल्याचं भासवायचा, तो म्हणाला,

“राहुलच्या ड्रॉवर मध्ये तर पाचशे रूपयांचं बंडल आहे.”

“तुला कसं कळलं रे साहेब तर नोटा कोणत्या ह्याबद्दल काहीच बोलले नाहीत.”

सुभाषचा चेहरा तर पाहण्यासारखा झाला होता. इतक्यात साहेबांनी फोन करून बोलावून घेतलेला राहुल पण आला. रोहन म्हणाला,

“बघ राहुल मी तुला नेहमी बजावत असतो ह्या सुभाषपासून सांभाळून राहा. हा तुझ्यावर जळतो आणि तुझ्यावर ह्याने आरोप केला.” आज राहुलच्या गैरहजेरीत रोहनने त्याची बाजू मांडल्यामुळेच मोठ्या आरोपातून राहुल वाचला होता.

©️®️सीमा गंगाधरे

शब्द संख्या _ २३७

661 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!