#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क (२७/१०/२५)
#विजोडजोडी
वाक्य _ सौंदर्य सर्वांनाच आवडतं पण काहींना चेहऱ्याचं तर काहींना विचारांचं
समीरने साधनाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या जवळच्या सर्वांनी त्याला समजावलं,
“अरे तू वेडा आहेस का! तुझ्यासारख्या देखण्या आणि सर्वच बाबतीत सरस तरुणाशी लग्न करायला किती मुली वरमाला घेऊन उभ्या आहेत. साधना किती सावळी, किती बारीक, तिच्या गालावर किती मोठा व्रण आहे. तुझी आणि तिची जोडी किती विजोड आहे. तिला समाजात घेऊन फिरताना नंतर तुला लाज वाटेल. त्यापेक्षा आधीच विचार कर.” अशा सर्वांना विजयचे एकच उत्तर होतं,
“शारीरिक सौंदर्य अल्प काळासाठी सोबत असतं. एखाद्या व्यक्तीच्या विचारांतील सौंदर्य नेहमीच शाश्वत असतं. चेहऱ्याचे सौंदर्य गौण असतं. माझी आई हॉस्पिटलमध्ये असताना मी तिला पाहिलं आहे. ती तिच्या मावशीसोबत होती. त्या वॉर्डमध्ये एकूण सात आठ रुग्ण होते. ही तिच्या मावशीला पाहत होती आणि इतर रुग्णांची पण सेवा करत होती. इतकेच काय तर रात्री मध्यभागी उभे राहून सर्वांना ऐकू जाईल अशी एखादी बोधकथा सांगायची. सर्वांच्या मनातील निराशा दूर करण्याचा सर्वार्थाने प्रयत्न करायची. मला तिथे स्त्रियांच्या वॉर्डमध्ये थांबायची परवानगी नव्हती पण आई तिचं कौतुक करायची. साधना उच्चशिक्षित असून सरकारी कार्यालयात वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. जी व्यक्ती आपल्या मावशीसाठी रजा घेऊन सेवा करते, ती नक्कीच माझ्या घरातील सर्वांची त्याच प्रेमाने काळजी घेईल. साधनाचा चेहरा भलेही सुंदर नसेल पण तिचे शिक्षण, तिच्या विचारातील सौंदर्य ह्याला मी जास्त महत्व देतो. मला खात्री आहे आमचा संसार नक्कीच सुखाचा होईल.”
समीरने साधनाशीच लग्न केलं आणि त्याला कधीच पश्चाताप झाला नाही. आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की विचारांनी एकरूप असलेल्या जोडीचा संसार सुखाचा होतो.
©️®️सीमा गंगाधरे

