#माझ्यातली मी
#विकेंड टास्क लेखन
@everyone
#सरत्या वर्षाला निरोप गुडबाय 2025
शब्दांच्या सोबतीने सावरलेला माझा २०२५
सस्नेह नमस्कार, माझ्या लाडक्या वाचक परिवाराला! 🙏🏼
प्रत्येक शेवट हा नवीन सुरुवातीची नांदी असते असं म्हणतात. २०२४ जाताना मला सर्वांत मोठं दुःख देऊन गेलेला. सर्व घर कसं सावरावं प्रत्येक नातं कसं जपावं हे माझ्यापुढे उभे राहिलेलं मोठं कोडं होतं.
पण २०२५ आला आणि हे वर्ष म्हणजे माझी ३६५ पानांची डायरी आता पूर्ण होत आली आहे. पण ही डायरी केवळ तारखांची नाही तर ती होती माझ्या भावनांची, संघर्षाची आणि मी नव्याने शोधलेल्या ‘माझ्यातल्या मी’ची.
हे वर्ष माझ्यासाठी सोपं नव्हतं. आयुष्यात असे काही क्षण आले ज्यांनी मनाला पूर्णपणे पोखरून काढलं होतं. सासूबाईंच्या जाण्याने घरात आलेली पोकळी असो किंवा त्यांचे रहस्यमयी जाणं या धक्क्यांनी मन सुन्न झालं होतं. जवळची माणसं जेव्हा अशी अचानक सोडून जातात, तेव्हा जगणं अर्थहीन वाटू लागतं.
पण म्हणतात ना, “जेव्हा सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा परमेश्वर कलेचा एक दरवाजा उघडा ठेवतो.” माझ्या बाबतीत ते कार्य ‘लिखाणाने’ केलं.
या दुःखाच्या सावटात स्वतःला सावरण्यासाठी मी हातात लेखणी धरली. मी नव्याने कथा आणि कविता लिहायला शिकले. मनात साचलेलं सगळं दुःख मी कागदावर उतरवू लागले. कवितांच्या ओळींनी मला धीर दिला आणि कथांमधल्या पात्रांनी मला पुन्हा जगायला शिकवलं. सासूबाईंच्या आठवणी आणि दुःख मी माझ्या शब्दांत विरघळवून टाकलं. लिहिता लिहिता कधी माझे डोळे ओले व्हायचे कळायचंही नाही, पण लिहून झाल्यावर मनावरचं ओझं हलकं व्हायचं.
खरं तर आपण आपल्याच दुःखात इतके गुंतलेले असतो की बाहेरचं जग विसरून जातो. पण जेव्हा मी जगाकडे पाहिलं, तेव्हा जाणवलं की माझ्यापेक्षाही कितीतरी मोठी दुःखं उंबरठ्याबाहेर उभी आहेत. या वर्षात झालेल्या भीषण विमान दुर्घटना, महिला आणि लहान मुलींवर होणारे अमानवीय अन्याय… या घटना वाचल्या की मन हेलावून जातं. देशात आणि जगात घडणाऱ्या या घडामोडींनी मला शिकवलं की, आपलं वैयक्तिक दुःख मोठं असलंच तरी समाज म्हणून आपण खूप काही सोसत आहोत. या जाणीवेने मला अधिक प्रगल्भ केलं आणि इतरांच्या दुःखात सहभागी होण्याची ताकद दिली.
समाजातील अन्याय पाहून मन अस्वस्थ होतं, पण “मी एकटी काय करणार?” या विचाराने आपली लेखणी थबकते. मात्र, लक्षात ठेवले पाहिजे की अथांग समुद्रही थेंबाथेंबानेच बनतो. लेखक हा समाजाचा आरसा असतो.
“शब्दांच्या एका ठिणगीनेही, क्रांतीची मशाल पेटते,
लेखणी जेव्हा चालते, तेव्हाच पिढी नव्याने घडते!”असा बदल प्रत्येक लेखणीतून घडावा.
२०२५ ने मला खूप काही शिकवलं. त्याने मला खंबीर केलं. आज जेव्हा मी २०२६ च्या उंबरठ्यावर उभी आहे, तेव्हा मनात कोणतीही तक्रार नाही, तर फक्त कृतज्ञता आहे.
आभार २०२५, मला लिहायला शिकवल्याबद्दल!
आभार २०२५, माझ्या दुःखात शब्दांची सोबत दिल्याबद्दल!
आभार २०२५, मला लिखाणासाठी व्यासपीठ दिल्याबद्दल.!!
आता वेळ आलीय २०२६ च्या कोऱ्या पानावर नवीन स्वप्नं लिहिण्याची. झालेल्या चुका विसरून, जुन्या जखमांवर शब्दांची फुंकर मारत मला पुढे जायचं आहे.
”झालं गेलं विसरून जाऊ, नव्या उमेदीने जगूया,
आठवणींचे गाठोडे सोडून, नव्या स्वप्नांच्या मागे धावूया.”
निरोप घेतेय २०२५ ची, पण मनात एकच ओढ आहे…
लिहिणं हे केवळ माझं सुख नाही, तर ती माझी शक्ती व्हावी. २०२६ मध्ये मी फक्त माझ्या कथाच नाही, तर समाजाच्या व्यथा मांडण्यासाठीही माझी लेखणी सज्ज व्हावी कारण बदल हा नेहमी शब्दांपासूनच सुरू होतो!”
~अलका शिंदे

