#माझ्यातली मी
#विकेंड टास्क लेखन
# रसग्रहणगाण्याचे
@everyone
जीवनगाणे गातच रहावे
जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे!
सात सुरांचा हा मेळा व्यापून उरला विश्वाला
हृदये हलता वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्या माझ्या श्वासामधुनी आकारा यावे
जीवनगाणे गातच रहावे!
चिमणाबाई हिरमुसली, गाल फुगवुनी का बसली?
सान बाहुली ही इवली, लटकी लटकी का रुसली?
रुसली रुसली खुदकन हसली, पापे किती घ्यावे!
जीवनगाणे गातच रहावे!
मातीमधुनी अंकुरली चैतन्याची दीपकळी
आनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली
या मातीला या प्रीतीला हितगुज सांगावे
जीवनगाणे गातच रहावे!
आपली माणसं-चित्रपट. गीतकार -शांता शेळके. संगीतकार- राम लक्ष्मण.गायक -महेंद्र कपूर,उषा मंगेशकर
शीर्षक – जीवनगाणे गातच रहावे: एका गाण्याने बदललेला माझा आयुष्याचा सूर.
मराठी संगीतात काही गाणी अशी आहेत, जी केवळ ऐकण्यासाठी नसतात, तर ती आपल्याला जीवन जगण्याची दिशा दाखवतात. ‘जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे चालावे…’ हे असेच एक गीत आहे. हे गीत म्हणजे आशावाद आणि वर्तमान क्षणाचा आनंद साजरा करण्याचा मंत्र आहे.
भावपूर्ण संगीत ही या गाण्याची खासियत आहे. चाल शांत असूनही खूप उत्साहवर्धक आहे. विशेषतः सकाळच्या वेळी किंवा जेव्हा मी महत्त्वाच्या कामाला सुरुवात करते, तेव्हा हे गाणे मला मानसिक आधार देते.
सरळ पण खोल अर्थ या ओळीत दडलेला आहे.गाण्याचे शब्द खूप सोपे आहेत, पण त्यांचा अर्थ आयुष्याच्या अगदी मुळाशी भिडणारा आहे. ते अनावश्यक जड-जड तत्त्वज्ञान न सांगता, जगण्याचे वास्तव स्वीकारायला शिकवते.
हे गाणे माझ्यासाठी केवळ मनोरंजन नाही, तर ते माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनले आहे.हे गाणे ऐकताच मनातील सारी नकारात्मकता दूर होते आणि एक नवी ऊर्जा संचारते. कितीही समस्या असल्या तरी, ‘थांबायचे नाही’ हा सकारात्मक संदेश मला खूप प्रेरणा देतो.
या गाण्याशी माझी एक खास आठवण जोडलेली आहे. माझ्या लग्नाला काहीच दिवस झालेले तेव्हा मला समजले की माझ्या वडिलांची फसवणूक झाली आम्हाला दाखवलेलं घर, गाडी, दुकान सर्व काही खोटं होतं मी खूप निराश झाले होते. मला माझ्या माहेरी नेले त्यावेळी माझे आजोबा माझ्या शेजारी बसले आणि त्यांनी मला हे गाणे गुणगुणून ऐकवले.
ते म्हणाले, “बाळा, आयुष्य कोणाच्या फसवणूकीवर थांबत नाही. झाले गेले विसरून जा आणि आता पुढे काय करायचे आहे ते ठरव. आपले ‘जीवनगाणे’ कधीही थांबवू नकोस.”त्याच क्षणी त्यांनी मला परत सासरी सोडले.
त्यांच्या या बोलण्यामुळे आणि या गाण्यामुळे मला मोठा दिलासा मिळाला. तेव्हापासून, जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात मोठे आवाहन किंवा अडचणी आल्या तर, त मी हे गाणे आवर्जून ऐकते. हे गाणे माझ्यासाठी ‘पुन्हा उभे राहण्याची’ प्रेरणा बनले आहे.
या गाण्यातील प्रत्येक ओळीत जीवनाचे एक महत्त्वाचे रहस्य दडलेले आहे.
”जीवनगाणे गातच रहावे” या ओळीचा अर्थ: आयुष्य म्हणजे एक अखंड प्रवास आहे, जो कधीही थांबत नाही. या प्रवासात सुख-दुःख हे गाण्यातील आरोह-अवरोहांसारखे आहेत. दुःख आले म्हणून गाणे थांबवायचे नाही, तर त्या दुःखालाही सुरात गुंफून पुढे चालायचे आहे.
जीवनाशी निगडित असा या गाण्याचा अर्थ आपली उमेद कधीही गमावू नये. प्रत्येक दिवस एक नवी संधी घेऊन येतो, तेव्हा उत्साहाने त्याला सामोरे जावे.
“झाले गेले विसरून जावे” या ओळीचा अर्थ भूतकाळात जे काही वाईट घडले— चूक झाली, नुकसान झाले किंवा कोणी दुखावले— ते आता बदलणे शक्य नाही. त्या गोष्टींना कवटाळून बसण्याऐवजी, त्या आठवणींना सोडून द्या.
जीवनाशी निगडित अर्थ चिंता आणि पश्चात्ताप हे दोन मोठे ओझे आहेत जे आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवतात. आपल्याला भूतकाळाला माफ करून, त्या अनुभवातून फक्त शिकवण घेऊन पुढे जायचे आहे.
“पुढे पुढे चालावे” या गाण्यातील ही ओळ सर्वात महत्त्वाची आहे. जीवनात वेळ कोणासाठी थांबत नाही. आपण भूतकाळाच्या विचारात अडकलो तर वर्तमान काळ आणि भविष्य दोन्ही गमावतो.
नेहमी ध्येयावर लक्ष केंद्रित करा. नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी सतत तयार राहा. आपले खरे सामर्थ्य पुढील क्षणात काय करायचे यात दडलेले आहे.
मातीमधून अंकुरून जशी चैतन्याची ज्योत बहरते तसेच जीवनही थरथरते कधी हर्ष, कधी गहिवरात.या आपल्या मूळ मातीशी आपण प्रेमाने संवाद साधावा,सुख-दुःख गाठीशी बांधून,त्यावर मार्ग काढून जीवनगाणे गातच रहावे माती आणि प्रीती यांचा आधार घेऊन चैतन्याने पुढे पुढे जावे.
’जीवनगाणे गातच रहावे’ हे गाणे आपल्याला शिकवते की, आपण आपल्या कथेचे नायक आहोत. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला एक ‘चॅलेंज’ म्हणून स्वीकारा.
म्हणून, आजपासून ठरवा.कोणतीही गोष्ट तुम्हाला थांबवू शकणार नाही.
तुमचे जीवनगाणे उच्च स्वरात, आनंदाने आणि पूर्ण आत्मविश्वासाने गातच रहा! ~अलका शिंदे


सुरेख
खुप छान
ताई एकदम अप्रतिम
वा! फारच छान!
वा! फारच छान!
खूप सुंदर रसग्रहण
खूप छान👌👌
सर्वांचे खूप धन्यवाद 🙏🏼