#माझ्यातलीमी
#विकेंडटास्क (२१/०३/२०२६)
#कथालेखन
# चालू घडामोडींवर आधारित कथा.
कथेचे शीर्षक – ” शून्याचा प्रवास!”
विठ्ठल लाल डब्याच्या एसटी बस मधून उतरताच आपली मळकट शबनम खांद्यावर नीट केली. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर ची गर्दी नेहमीसारखीच धावणारी होती. पण आज विठ्ठलच्या पायात एक वेगळीच ताकद होती. गेल्या पाच वर्षापासून ज्या दिवसाची तो वाट पहात होता. तो दिवस अखेर उजाडला होता. आज,” राज्यसेवा” परीक्षेचा निकाल लागणार होता.
विठ्ठल हा बीड जिल्ह्यातील एका छोट्या गावातला मुलगा. वडील शेतमजुरी करायचे आणि आई धुण्या भांड्यांची काम करायला जायची. विठ्ठल ने पुण्यात एका छोट्या खोलीत राहून वडापाव खाऊन तर कधी उपाशी राहून रात्र-रात्र लायब्ररी बसून अभ्यास केला. लायब्ररी बंद झाल्यावर रात्री रस्त्यावरच्या दिवा खाली बसून अनेक वेळा अभ्यास केला. कारण हीच त्याची शेवटची संधी होती कारण आता वयाची अट आडवी येणार होती.
दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होणार होता. विठ्ठल एम .पी .एस. सी च्या ऑफिस बाहेर असलेल्या एका कट्ट्यावर बसला होता. त्याच्यासोबत त्याचे काही मित्रही बसले होते. सर्वांच्या छातीत धडधड आणि चेहऱ्यावर धाकधूक दिसत होती. दोन वाजताच सर्वांचे मोबाईल खणखणू लागले. विठ्ठल ने थरथरत्या हातांनी पीडीएफ मध्ये आपला रोल नंबर शोधला.
” झाला! आई, माझा नंबर आला!” विठ्ठल ओरडलाच. त्याचे डोळे आनंद अश्रूंनी भरून आले. त्यांनी लगेचच गावी फोन लावला. आई अडाणी, तिला काहीच कळत नव्हतं पण विठ्ठल चा आवाज ऐकून ती रडू लागली.” माझा लेख, साहेब झाला!” हे शब्द गावात वाऱ्यासारखे पसरले.
पण हा आनंद फक्त काही तासांचाच ठरला.
संध्याकाळ होता होता सोशल मीडियावर काही स्क्रीन शॉट्स व्हायरल होऊ लागले. परीक्षेचा पेपर आदल्या रात्रीच काही विशिष्ट टेलिग्राम चॅनेलवर विकला गेल्याचे पुरावे समोर आले होते. विठ्ठल च्या छातीत धस्स झालं…….. त्यांनी बातम्या लावल्या बातम्यांमध्ये चॅनेलवर ओरडून ओरडून सांगितलं जात होतं………..
” महाघोटाळा, पेपर फुटला!”
पुढच्या दोन दिवसात पुण्याच्या रस्त्यावर विद्यार्थ्यांचा महासागर लोटला. विठ्ठल ही त्या गर्दीत होता शरीराने पण त्याचे मन कुठेतरी हरवले होते. ज्या व्यवस्थेत त्याने आपले आयुष्य झोपून दिले होते, ती व्यवस्थाच आतून पोखरलेली निघाली होती.
” आम्हाला न्याय हवा आहे!” अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला!.
. दिवसभर आंदोलनात बसून विठ्ठल रात्री आपल्या दहा बाय दहाच्या खोलीत परतला. खोलीत पुस्तकांचा डोंगर होता. लक्ष्मीकांत चे राज्यशास्त्र, बिपीन चंद्राचा इतिहास, मराठी साहित्याचा इतिहास, ही पुस्तके त्याला आता शत्रूसारखीच वाटू लागली. त्याने आपली शबनम उघडली त्यामध्ये आईने दिलेली दशमी अजूनही तशीच होती.
अचानक त्याचा फोन वाजला. आईचा फोन होता.
” विठ्ठल साहेब! गावाने तुझा सत्कार करायचा ठरवलंय. कधी येतोय पोरा? आईच्या आवाजातला तो उत्साह आणि आनंद विठ्ठल च्या काळजाला भिडला काळीज .चिरून गेला. तू काय बोलणार? ” आई, पेपर फुटलाय. कदाचित परीक्षाच रद्द होतील”. हे सांगण्याचे त्राणच त्याच्यात उरले नव्हते.
” आई, येतोय मी लवकरच…….!” एवढेच बोलून त्यांनी फोन ठेवला. पुढच्या दिवशी सरकारने अधिकृत घोषणा केली…….
” गैर प्रकारामुळे परीक्षा रद्द करण्यात येत आहे. नवीन तारखा लवकरच जाहीर होतील”.
विठ्ठल ने ती बातमी वाचली आणि तो हसतच सुटला…. हे हसू आनंदाचे नव्हते तर व्यवस्थेच्या क्रूर थट्टेवरचे होते. त्याचे वय परीक्षेसाठी संपले होते. वडिलांचे कर्ज वाढले होते आणि आईच्या डोळ्यातील स्वप्न आता धुळीला मिळाली होती. त्याने आपली सर्व पुस्तके रद्दीवाल्याला विकली होती. ज्या ज्ञानाने त्याला अधिकारी बनविण्याचे स्वप्न दाखवले, त्याच ज्ञानाची किंमत आज किलोच्या भावात ठरली होती.
बस स्थानकावर परत जाताना त्याने पाहिले, तिथे आजही शेकडो तरुण डोळ्यात नवीन स्वप्न घेऊन पुण्यामध्ये उतरत होते. विठ्ठल ला त्यांना सांगावेसे वाटत होते,” अभ्यासासोबत नशिबाची ही नाही तर भ्रष्ट व्यवस्थेशी लढण्याची ताकद घेऊन जा”.
विठ्ठल पुन्हा एकदा त्या लाल डब्यात बसला. खिडकीतून मागे सुटणारे पुणे त्याला खुणावत होते. पण यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर एक सुंदर करणारी शांतता होती. एका हुशार आणि कष्टाळू तरुणाचा,” साहेब ” होण्याचा प्रवास एक भ्रष्ट व्यवस्थेच्या कागदावर संपला होता.
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®
