कथालेखन
शीर्षक:- ” माझ्यातली खरी मी!”
महिला दिनानिमित्त माझ्या आयुष्यातलं एक खरं पान.
अश्रूंमधून उमललेलं लेकीचं नातं. ( स्वानुभव)
महिला दिनी सगळ्या जणी आपली स्वप्न, यश, कर्तुत्व सांगतात पण आज मी माझ्या आयुष्यातील असं एक पान उघडते आहे ज्यावर अश्रूही आहेत आणि स्वाभिमानाचं सोनं ही आहे.
लग्न होऊन सासरी आले तेव्हा मनात खूप आशा होत्या. माहेरचे चांगले संस्कार, आई वडील शिक्षक, वडील लेखक. आणि विचारांनी समृद्ध असलेल्या कुटुंबातून मी आले. आई बाबा म्हणायचे ,”स्वतःच सत्व जप पण त्याबरोबर नातेसंबंधही जप बर का!”
पण सासरच वास्तव वेगळंच होतं. माझ्या सासूबाईंना बऱ्याच वर्षापासून डिमिशिया होता. त्या मला वाटेल तसं बोलायच्या पण आपण काय बोलतोय हे त्यांना कळतच नव्हतं. पण मला ते समजत होतं. कधीकधी त्या खूप चांगल्या वागायच्या तर कधी कधी आक्रमक होऊन मारणे किंवा बोचकारणे असंही घडायचं. सासर्यांचा राग तर विचारू नका, भात फडफडीत झाला तर ताटच भिरकावून द्यायचे. कधी वाटायचं आपलं वागणं इतकं चुकतं का? अनेकदा मनाची घुसमट व्हायची. मन अतुन आक्रोश करी पण माझे आई-बाबा माझ्या पाठी खंबीर उभे होते ते म्हणायचे तू लढा द्यायचा पण नात्यात कटूता यायला नको आणि स्वतःलाही सांभाळायला हवं. अशा माणसांना डील करणं हेच तर आपलं कौशल्य. आणि स्वतःलाही सांभाळायचं. याच बळावर संसाराचा लढा आनंदाने स्वीकारला.
काळ बदलला. सासुबाईंना डिमेन्सिया होताच त्यात त्या घरांमध्ये पडल्या आणि झोपून राहणं आलं. जागेवरच शी, शू, डायपर बदलणं, औषध देणं, नाश्ता भरवणं हे सगळं माझ्या हातात आलं. अंगावरच पडलं म्हणाना. ब्युरोच्या बायका होत्या पण त्या सकाळी दहा नंतर यायच्या. सासूबाईंना स्वच्छता भयंकर प्रिय तोपर्यंत आम्ही प्रातर्विधी उरकून घ्यायचो, मग आरामात ब्युरोच्या बायका यायच्या. सासुबाईंना जागेवरून उठवणं हलवणं मला शक्य नसल्यामुळे यात माझा नवरा आणि मुलगा मला मदत करी. त्या दोघांकडे पाहून मीही सर्व आनंदाने करी शेवटी आपलं माणूस चांगलं होतं ना.
नवरात्रात देवीची ओटी भरण्याचा माझा नियम पण घराबाहेर पडता येईना. मनाला हुरहुर लागली. माझी अशी अवस्था पाहून शेजारच्या आजी म्हणाल्या,” पोरी, तू जिवंत देवीची सेवा करतेस. हीच खरी देवीची पूजा नाही का ग? त्या एका वाक्याने माझ्या मनातली खंत विरघळली. देवी मंदिरात नसून ती आपल्या कृतीमध्येच असते हे मला त्यादिवशी उमगलं आणि मन निश्चिंत झालं
आमचे शेजारी शेजारी दोन घर आहेत. आमचं जरा जरी दुर्लक्ष झालं तरी त्या आतून कडी लावून घ्यायच्या. आणि गाणं म्हणत छान फिरायच्या. मला म्हणायच्या आहो आत या ना. पण आतून कडी आहे हे तिच्या लक्षात यायचं नाही. अशावेळी माझी ट्युशनची वेळ असेल तर जिन्यात बसून मी ट्युशन घेतल्या आहेत.
त्यामुळे जराही दुर्लक्ष करून चालायचं नाही.
सासुबाईंना माझ्या नंणंदे कडे किंवा दिराकडे जायची खूप इच्छा असायची तसं त्या व्यक्त करायच्या. ते निघाले की त्या स्वतःची चप्पल पण जिन्यात काढायच्या. त्यांच्याबरोबर जाण्यासाठी पण ते त्यांना चुकवून निघून जायचे. हे सगळं माझा लहान मुलगा बघत होता. वडिलांना आईची वाटत असलेली काळजी आणि तिचं करता करता मुलाला आणि बायकोला होणारा त्रास अशा कात्रीत बाबा सापडले आहेत हे त्याला कळलं. तो म्हणाला बाबा तुम्ही काळजी करू नका मी आणि आई आजीचा व्यवस्थित सांभाळ करू. या विश्वासावर ते निश्चितपणे बाहेर कामाला जायचे.
अशी सात-आठ वर्ष मी सासूबाईंची आई बनून सेवा केली. कधी मनापासून तर कधी मनाविरुद्ध. कारण माझी ही मानसिक अवस्थेत चढ उतार होत होते. माझ्या सासुबाई हळूहळू सगळ्यांची ओळख विसरल्या. सख्ख्या मुलीलाही ओळखीनाश्या झाल्या. पण मला माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलाला शेवटपर्यंत ओळखायच्या आमच्या हातूनच खायच्या आणि आमच्यावरच विश्वास टाकायचा. नवरा माझा तर अगदी श्रावण बाळ.
एके दिवशी पलंगावर पडून मी पेपर वाचत होते त्या माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या,” अहो! तुम्ही खूप दमला असाल ना! म्हणून त्या माझे पाय चेपू लागल्या. हे पाहताच टचकन माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिला जवळ घेतलं. दोघींच्याहीडोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले. मोठ्यांकडून सेवा करून घेणं माझ्या तत्त्वात बसत नव्हतं. मी उठून बसले त्या म्हणाल्या पोरी तु माझी सून नसून लेखच आहे. आणि प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवला.
त्याक्षणी जाणवलं, सहनशीलतेच सोन शेवटी चमकत.
आज मी मागे वळून पाहते तेव्हा राग नाही फक्त शिकवण दिसते….
मी लढले – कटूतेने नाही तर संयमान, प्रेमानं.
मी जिंकले – दुसऱ्यांना हरवून नाही तर स्वतःलाच घडवून.
महिलादिनी माझा अनुभव सांगताना मी प्रत्येक स्त्रीला इतकच सांगू इच्छिते…..
* स्व किंमत ओळखा.
* अन्याय सहन करू नका पण प्रतिक्रिया देताना माणुसकी ही जपा.
* सेवा ही कमजोरी नाही, ती शक्ती आहे.
* आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई-बाबांचे संस्कार हेच खरं आपलं कवच असतं. आज आमच्या घरात माझं भरभरून कौतुक केलं जातं. पण त्या कौतुका मागे आहेत – अश्रू, संयम आणि निस्वार्थ सेवा.
एक स्वानुभव महिलादिनी कृतज्ञतेने व्यक्त करते आहे.
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
८ मार्च २०२६
