#विकेंडटास्क (९/१/२०२६)
#एकनवीसुरवात.
कथेचे शीर्षक :- नवी पहाट!.
सीमेवरचा कडकडाट, तोफांचे गोळे आणि रक्ताचा सडा…. अशा वातावरणात वावरताना अजयला भीती कधी शिवली नाही. ” भारत माता की जय!”ही घोषणा त्याच्या नसानसात भिनली होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एका भीषण चकमकीत शत्रूचा तोफ गोळा जवळच पडला आणि अजयच्या आयुष्यात कायमचा अंधार झाला असे वाटले. त्यास्फोटात त्याने आपले दोन्ही पाय आणि एक हात गमावला. रुग्णालयात जेव्हा त्याला जाग आली, तेव्हा समोरचे सत्य पचवणे कठीण होते. ज्या हातांनी शत्रूंचा खात्मा केला ते हात आता नव्हते आणि ज्या पायांनी डोंगरदर्या तुडवल्या ते पायही साथ सोडून गेले होते.
सैन्यातून निवृत्ती घेऊन जेव्हा अजय आपल्या गावी परतला तेव्हा त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते,” मी आता कुटुंबावर ओझे होणार का? पुढे आपलं कसं होईल?”हा प्रश्न त्याला सतत सतावत होता.
अजय घरी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी सावित्री, म्हातारी आई आणि सहा वर्षांचा यश उंबरठ्यावर उभे होते. सावित्रीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले पण ते दुःखाचे नसून आपला पती जिवंत परतल्याच्या समाधानाचे होते. यश धावत आला आणि अजयच्या पुऱ्या सूर्या शरीराला बी लागला.
सुरुवातीचे काही दिवस खूप कठीण गेले. अजयला स्वतःची छोटी-मोठी कामे करण्यासाठी ही इतरांवर अवलंबून राहावे लागे. जो सैनिक शेकडो जवानांचे नेतृत्व करीत होता, तो आज पाण्याच्या एका पेल्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू लागला. पण सावित्री ने मात्र त्याला कधीच हतबल होऊ दिले नाही. ती म्हणाली,” अजय! तुम्ही देशासाठी लढलात. आता स्वतःसाठी आणि आमच्यासाठीही लढा. तुमचे शरीर जरूर थकले असेल पण तुमचा आत्मा अजूनही” सैनिकच” आहे, नाही का?”
अजयने ठरवले तो रडत बसणार नाही. त्याने आपल्या उरलेल्या एका हाताने काम करायला सुरुवात केली. त्याला जाणवले गेली बारा वर्षे त्याने कुटुंबाला वेळच दिला नव्हता. यश चे बालपण, सावित्रीची लढाई, आईचे म्हातारपण त्याने फक्त फोनवर ऐकले होते. आता ती कसर भरून काढण्याची वेळ आली होती.
अजयने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, “प्रोस्थेटिक लेग्ज “(कृत्रिम पाय) लावून घेतले. सुरुवातीला चालताना खूप वेदना व्हायच्या. अनेकदा पडलाही पण यश चा हात धरून तो पुन्हा उभा राहायचा. अजयने घरातच बसून काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. त्याला लेखनाची आणि गणिताची आवड होती. त्यांनी गावातील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करायला सुरुवात केली.
आता अजयचे दिवस पुन्हा धावपळीचे झाले तरी खूप मोठे समाधानही मिळाले. सकाळी तो यश चा अभ्यास घेईल. दुपारचा वेळ आईसोबत चा गप्पांचा आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा. संध्याकाळी गावातील तरुणांना शिस्त आणि राष्ट्रभक्तीचे धडे द्यायचा. त्यांच्या अडचणी सोडवायचा.
सावित्रीला आता तिचा जुना अजय परत मिळाला होता. तो शारीरिक दृष्ट्या पूर्वीसारखा नव्हता, पण मानसिक दृष्ट्या तो अधिकच खंबीर झाला होता. अजयने घराजवळच एक लहानशी नर्सरी, (रोपवाटिका) सुरू केली. एका हाताने माती उकरणे, रोप लावणे कठीण होतच पण त्यातही त्याने आनंद शोधला. जेव्हा एखादे लावलेले लहान रोप बहरून यायचे त्यावेळी अजयला आपले आयुष्यही बहरल्यासारखे वाटायचे.
एके दिवशी गावकऱ्यांनी गावात अजयचा सत्कार सोहळा आयोजित केला. त्यात, तिथे भाषण करताना अजय म्हणाला,
” मित्रांनो! सीमेवर लढणे हे माझे कर्तव्य होते. पण अपंगत्वाशी लढणे हे माझे आव्हान होते. मला वाटले की पाय गेल्यावर मी संपलो! पण आज मला चांगलेच समजले की माणसाचे पाय नाही तर त्याचे विचार त्याला पुढे नेतात. मी सैन्यात असताना कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही. पण आज दैवाने मला ही संधी दिली आहे. आज मी फक्त एक माजी सैनिक नाही तर एक आनंदी पिता, एक जबाबदार मुलगा आणि एक यशस्वी मार्गदर्शक आहे”.
गावातील लोकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. अजय चे डोळे पाणावले पण ते दुःखाचे नव्हते तर ती “एका नव्या सुरुवातीची पावती होती.”
अजयचे आयुष्य आता एका संथ वाहणाऱ्या नदीसारखे शांत पण समृद्ध होते. आपले दुःख विसरून आपल्या मर्यादांनाच ताकद बनवली होती.
संदेश :-
आयुष्यात कितीही मोठी संकटे आली, महत्त्वाचे खूप काही गमावले तरी जगणं संपत नाही. शारीरिक व्यंग हे मनाचे व्यंग नसावे. जेव्हा एक रस्ता बंद होतो तेव्हा निसर्ग आपल्यासाठी दुसरे अनेक रस्ते खुले करतो. सकारात्मकता आणि कुटुंबाची साथ असेल तर शून्यातूनही विश्व उभे करू शकतो.” नवी सुरुवात” करण्यासाठी फक्त जिद्द आणि प्रेमाची गरज असते.
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®
