#माझ्यातलीमी
#विकेंडटास्क (९.२.२६)
#एकनवीसुरुवात
अंत जिथे होतो तिथेच नवीन सुरुवात होतच असते ..
म्हणजे बघा ना वर्षाचा अखेरचा दिवस सांजवतो तेव्हाच पहाटेला नवीन वर्षाची चाहूल लागते..
एखादी वही कधी ना कधी रेखाटल्यावर संपतेच तेव्हा नवीन वहीचा उगम होतो नवीन लेखणीसाठी ..तसंच प्रत्येक गोष्टीचा अंत तिथे नवीन सुरुवात..
कधी कधी उगाच प्रश्नांना उपप्रश्न पडून मार्ग सैरभैर होत असतो आणि उत्तरांची पायवाट हरवून जाते .तिथे थोडं थांबलं ,एक लांब श्वास ,एक छोटासा विश्राम आणि नकारात्मक वृत्तीना मोकळं करून एक नवीन ऊर्जात्मक ,सकारात्मक एक पुनर्श्वास श्वास आपल्याला प्रगतीचा मार्ग घेऊन येतो. पण त्यासाठी आपल्या डोळ्यांआड आणि मनाआड असलेल्या स्वतःच्याच वैचारिक मार्गाचे आपल्याला स्वागत करता यायला हवे ..
जसं एक पाऊल टाकलं आणि ते पुढे पुढे टाकत गेलो तर एक पाऊलवाट तयार होते आपोआपच म्हणजेच काय तर नवनिर्मिती होते.आपल्या वाटेला एक नवीन आंगण मिळत जाते..स्वतःचे हक्काचे …
एक पहाट नवीन दिवस घेऊन येते प्रत्येक आयुष्यात
ती असंख्य सुखाची ,आनंदाची ,प्रश्नांची,संकटांची ,यश अपयशाची यादी घेऊनच ..पण त्याचे उत्तर वा अनुभूती आपल्यालाच आपली घ्यायची असते .ही आयुष्याची शाळा प्रत्येकाचीच वेगवेगळी असते.मग आपल्याच प्रश्नांची उत्तरं आपल्यालाच आपल्याच नवनीत मध्ये (गाईड) म्हणजेच आपल्या वैचारिक पातळीवर शोधावी लागतात स्वतःच्या मनाच्या तळाशी डोकावून..
आनंदाचे जसं स्वागत करत असतो तसं दुःखाचे ,संकटाचे
अपयशाचे सुद्धा स्वागत तितक्याच आनंदात
धीराने ,जिद्दीने करता यायला हवे . खरं तर आव्हानाशिवाय आयुष्य नाहीच..आणि बदलाव हा आयुष्याचा एक स्थायी भाग आहे पण स्वीकार करणे हा एक मनाचा निश्चयी भाव असला पाहिजे.
मार्ग म्हणजेच आत्मबळाची गुरुकिल्ली मग ती मानसिक असो शारीरिक ,वैचारिक वा आध्यात्मिक ..
तळ्यात पडल्याशिवाय आपण पोहायला शिकत नाही तसेच संकटात अडकल्याशिवाय आपण उत्तरांचा मार्ग शोधायचा प्रयत्नही करत नाही .एखादा मार्ग काढणे म्हणजे “मी” मधल्या आत्मविश्वासाची नवीन ओळखपावती….
निसटलेल्या क्षणांना जसं पकडून ठेवता येत नाही तसंच परिस्थितीला लेट गो करता आलं पाहिजे.. आणि पुन्हा नवीन जिद्दीने नवीन आत्मवृक्षाचं बीज पेरता आलं पाहिजे .. सकारात्मक संस्काराचे खतपाणी घालता आलं तर नक्कीच सुदृढ जन्म होईल
आणि ती असेल नवीन आशेची, नवीन स्वप्नांची नवीन सृष्टीची ऊर्जात्मक किरणं…
अस्मितेचा पुनर्जन्म ….
मधुरा

