विकेंडटास्क….. मनभावन श्रावण (२५/७/२५)
……. राखी पौर्णिमा……
श्रावण महिना म्हणजे, सणवार, व्रतवैकल्ये, पूजाअर्चा, नटणे मुरडणे आणि निसर्ग सौंदर्याने भरलेला हा महिना निधीला खूप आवडायचा. निलला तिने फोन करून विचारले, उद्याची रजा मिळाली ना? आपल्याला उद्या मुंबईला जायचे आहे. दरवर्षी निधीच्या मोठ्या काकांकडे सगळे जमतात व एकत्र राखीपौर्णिमा, गणपती – गौरी, नवरात्र, भाऊबीज व रंगपंचमी मोठ्या दणक्यात साजरी करतात. आज राखी पौर्णिमा व निधीच्या चुलत बहिणीची मंगळागौर एकत्रच होणार होती. म्हणून निधी व निल मुंबईला सकाळी कॅब करून निघाले.
श्रावण महिना असल्याने अधूनमधून पाऊस पडत होता. मधूनच एखादे इंद्रधनुष्य दिसत होते. रस्त्याने आजूबाजूला डोंगरावरून लहान मोठे धबधबे पडताना दिसत होते. डोंगराच्या माथ्यावर ढगांचा पळापळीचा खेळ सुरू होता. एखादा ढग वाट चुकलेल्या वासरा सारखा अगदी खालून जवळून जात होता. फूडमाॅल मध्ये दोघांनी चहा घेतला. निधीने ड्रायव्हर काकांना विचारले, तुम्हाला चहा नाष्टा करायचा आहे का? ते नको म्हणाले. त्यांना बराच घाम येत होता व ते जरा अस्वस्थ दिसत होते म्हणून निलने विचारले, काका… बरे आहात ना? काही होतय का? काका म्हणाले, नाही… मी ठिक आहे.
परत प्रवास सुरू झाला. दोघेही बाहेरचे सृष्टी सौदर्य बघत होते. निलचे ड्रायव्हर काकांकडे लक्ष गेले. ते सारखे रुमालाने घाम पुसत होते. तेवढ्यात त्यांनी कार बाजूला थांबवली व म्हणाले, साॅरी… मला जरा बरे वाटत नाहीये. तूम्ही प्लिज दुसरी कॅब करून जाता का? निलने त्यांना पाणी प्यायला दिले व म्हणाला, काका अशा अवस्थेत आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही. तूमची हरकत नसेल तर मी कार चालवतो व जवळपास हाॅस्पिटल असेल तिथे तुम्हाला घेऊन जातो. काकांना त्रास जास्तच होत असावा ते लगेच तयार झाले. ते मागे जाऊन डोळे मिटून बसले. निधीही त्यांच्या जवळ बसली व निल कार चालवू लागला. निधी त्यांना विचारत होती, तुमच्या जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर द्या आम्ही त्यांना सांगतो व बोलावून घेतो. काका म्हणाले, माझी बहिण पनवेलला राहते. त्यांनी तिचा नंबर काढून दिला. तेवढ्यात एका हाॅस्पिटल जवळ निलने कार थांबवली. दोघेही काकांना आत घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासून सांगितले की, वेळेवर घेऊन आलात यांना माईल्ड हार्ट अटॅक आला आहे.
लगेच सलाईन लावून ट्रिटमेंट सुरू केली. निधीने त्यांच्या बहिणीला मालती ताईंना, फोन करून काकांन बद्दल सांगितले, ती म्हणाली मी लगेच येते. काका निलला म्हणाले, तूम्ही जा साहेब माझ्यामुळे तुम्हाला आधीच उशीर झाला आहे. निधी म्हणाली, असू द्या काका, तूमची बहिण आल्यावर आम्ही जाऊ. निधीच्या बाबांचा फोन आला. तूम्ही कुठ पर्यंत आलात म्हणून विचारले, उशीर झाला तर सर्वांना काळजी नको म्हणून थोडक्यात झालेला प्रकार निधीने बाबांना सांगितला व काळजी करू नका आम्ही येतोच आहोत म्हणून सांगितले. थोड्यावेळाने मालती ताई व तिचे मिस्टर आले. भावाला डोळे भरून बघितले व त्यांचा हात हातात घेऊन रडू लागली. काकांनी तिचे डोळे पुसले व म्हणाले, मालू ताई…. तूझा अजून राग आहे का तूझ्या राम्यावर? नाही रे माझ्या भाऊराया….
मालती ताई थोडी सावरल्यावर ती निधी जवळ जाऊन म्हणाली, तूमचे खूप उपकार आहेत आमच्यावर. तूम्ही आज पंधरा वर्षांनी आम्हा भाऊ बहिणीची भेट घडवून आणलीत. थोडा गैरसमज होता आमच्या दोघांत पण आज राखी पौर्णिमा आहे या पवित्र दिवशी आम्ही सारे मागचे विसरून गेलो. निधीने पर्स मधून राखी काढून मालती ताईंना दिली व म्हणाली या पवित्र धाग्याने परत एकदा भावाला बांधून ठेवा.
निलने दुसरी कॅब बुक केली. काकांना ठरलेले पैसे दिले ते काका घ्यायला तयार नव्हते पण निधी व निलने घ्यायला लावले व विचारले, बरे वाटते ना? आम्ही निघालो तर चालेल ना? काका हात जोडून म्हणाले, तूमचे उपकार मानावे तेवढे थोडेच आहेत. आमच्या बहिण भावाचे आशिर्वाद कायम तूमच्या दोघांना आहेत. आज तूमच्या रूपाने विठूमाऊलीने माझे रक्षण केले. निधी मालती ताईंना म्हणाली, तूम्ही काकांना राखी बांधा मी फोटो काढते. त्यांनी राखी बांधली भाऊबहिणींच्या चेहर्यावरचा आनंद निधीने कॅमेरात टिपला व तो फोटो काकांना पाठवला व ती तिची राखी पौर्णिमा साजरी करायला मुंबईकडे दोघेही रवाना झाले.
******************
