दान पावलं बाबा दान पावलं
वासुदेव आला हो वासुदेव आला
सकाळच्या पारी हरीनाम बोला || धृ ||
हे देवता चित्रपटातील गायक जयवंत कुलकर्णी ह्यांनी गायलेलं आणि राम लक्ष्मण ह्यांनी संगीतबद्ध केलेलं मधुसूदन कालेलकर ह्यांनी लिहिलेलं एक जबरदस्त उर्जा निर्माण करणारं गीत. आज ह्या गीताची प्रकर्षाने आठवण झाली कारण _ अहो, आज आमच्या घरासमोर खरोखरच वासुदेव आला होता. आज इतक्या वर्षांनी वासुदेवाला पाहून मला रहावलेच नाही आणि म्हणून हा लेखनप्रपंच. आत्ताच्या ह्या पिढीला वासुदेव म्हणजे काय हेच ठाऊक नाही. माझ्या लहानपणी अनेकदा वासुदेव यायचा. हा वासुदेव आला की बायका आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे त्याला काही धान्य अथवा थोडे पैसे वगैरे देत असत.
वासुदेव ही महाराष्ट्राची एक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे, ज्यात एक लोककलाकार (वासुदेव) पहाटे उठून गावांमध्ये फिरायचा. पांडुरंगावरील अभंग गाणे आणि दान मागणे. वासुदेव हा श्रीकृष्णाचा भक्त आहे आणि तो लोकांना संगीतातून सामाजिक आणि आध्यात्मिक संदेश द्यायचा, तसेच लोकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्यही करायचा.
डोक्यावर मोरपिसांची टोपी, अंगावर पायघोळ अंगरखा, कमरेभोवती शेलावजा उपरणे आणि एका हातात चिपळ्या घेऊन हा लोककलाकार सकाळच्या वेळी घरोघरी फिरून पांडुरंगावरील अभंग, गवळणी आणि इतर भक्तीगीते गाणी गाऊन झाल्यावर तो लोकांकडून दान मागायचा. असे मानले जाते की, वासुदेवाला दान दिल्याने ते दान पावते आणि त्याचा आशीर्वाद मिळतो. केवळ दान मागणे एवढाच वासुदेवाचा उद्देश नसायचा तर तो आपल्या गायनातून व कलात्मकतेतून लोकांना सामाजिक आणि आध्यात्मिक संदेशही द्यायचा.
ही महाराष्ट्राच्या मातीतील एक प्राचीन आणि अस्सल सांस्कृतिक परंपरा मानली जाते.
वासुदेव हे वारकरी पंथातील कृष्णाचे भक्त मानले जातात.
हा कलाकार लोकांना मातीशी आणि संस्कृतीशी जोडून ठेवायचा आणि पारंपरिक संगीताच्या माध्यमातून लोकांमध्ये सामाजिक जागृती घडवण्याचे कार्य करायचा.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसारख्या दिंडीत वासुदेवांचा गट सहभागी होऊन या सांस्कृतिक परंपरेची ओळख लोकांना करून द्यायचा.
वासुदेव आपल्या गीतातून जे तत्त्वज्ञान सांगतो त्यामध्ये दैववाद आहे. आपण चांगले काम करीत रहावे आणि आयुष्यात मिळणार-या चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी ईश्वरावर सोपवावी अशी वासुदेवाची जीवनदृष्टी आहे. याशिवाय मोगल साम्राज्यात संत एकनाथ महाराजांनी वासुदेव धर्म उभारून वासुदेव समाजाची धर्म प्रचारासाठी तयारी करून घेतली आणि मोगल साम्राज्याविरुद्ध धर्मप्रचार करून लढा उभारला असाही इतिहास सांगितला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे उत्तम युद्धाभ्यास, राजकारण आणि दूरदृष्टी होती. महाराजांनी याच वासुदेवाला आपला हेर बनवून आपल्या शत्रुच्या गोटातून बातम्या मिळवण्यासाठी महाराजांनी वासुदेवांचा योग्य वापर करुन स्वराज्याच्या अनेक मोहीमा आखल्या होत्या.
आज इतक्या वर्षांनी वासुदेवाला पाहून मला फार आनंद झाला. आपली हिंदू संस्कृती टिकवून ठेवणारा हा बहुरूपी समाज अजूनही आपल्या कलेशी निगडित आहे. ह्यातच सर्व आले.
अमोघ आपटे
©_”पहल” अमोघ
मोबाईल:- 9960867254


खूप सुंदर लेख 👌👌