#माझ्यातलीमी
#लघुकथालेखन (२९/६/२४)
#वारीचीतळमळ
(रिपोस्ट)
“सलील कसला विचार करतोस आणि इतका उदास का बसला आहेस?” आईने असे विचारताच सलील कसंनुसं हसला.
“आई आषाढी एकादशी जवळ आली आहे. तुला तर माहिती आहे मी दरवर्षी वारीला चालत जातो. त्यात माझा ‘स्वार्थ आणि परमार्थ’ असे दोन्ही हेतू असतात.”
“हो ना हे वारीचं बाळकडू तू तुझ्या बाबांकडूनच घेतलं आहेस. तुझे बाबा दरवर्षी पायी चालत वारीला जायचे. लहानपणी तेथील अनुभव कथा स्वरूपात तुला सांगायचे. तेव्हापासूनच वारीबद्दल तुला खूप आत्मियता निर्माण झाली होती.”
“आई वारीमध्ये विठ्ठल नामामध्ये तल्लीन झालेली इतकी वयस्कर लोकं, लहान मुलं, स्त्रिया सगळेच येत असतात. कितीतरी वृद्ध लोक आपली वारी चुकू नये म्हणून जीवाचा आटापिटा करतात. लहानसहान आजारांना बाजूला ठेवून वारीला हजेरी लावतात. कोणाला ना कोणाला वैद्यकीय मदत लागतेच. तेव्हा आमचा डॉक्टरांचा ग्रुप सर्वांना सर्वतोपरी मदत करतो. यावर्षी माझा पाय फ्रॅक्चर झालाय. अजूनसुद्धा मी जास्त वेळ चालू शकत नाही.”
“अरे चालेल काही हरकत नाही. आपला पांडुरंग सगळं बघतच असतो. त्याच्या भक्तांवर त्याचं बारीक लक्ष असतं. तुझी तळमळ त्याला कळतेच ना.”
“माझे मित्र म्हणतात की यावर्षी तू नाही आलास तरी चालेल तुझ्या वाटची सेवा पण आम्ही करूच. ते सर्व करतीलच पण मला खूप रुखरुख लागून राहिली आहे.”
“हे बघ सलील आता तुझा पाय दुखतोय तरीसुद्धा तू ड्रायव्हर घेऊन दवाखान्यात जातोस. रात्री उशिरापर्यंत सर्वांना वैद्यकीय सेवा देत असतोस. तू मनाला लावून घेऊ नकोस.” इतक्यात सलीलचा मित्र डॉक्टर राहुलचा फोन आला,
“हॅलो सलील मला माहितीये तू खूप उदास बसला आहेस.”
“अरे तू काय व्हिडिओ कॉल केला आहेस की काय!”
“सलील मी तुला हीच गुड न्यूज सांगायला फोन केला आहे की आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की तुझी वारीची इच्छा पूर्ण करायची.”
“हो रे पण मी तुमच्याबरोबर चालू शकणार नाही. तुम्ही कशी माझी इच्छा पूर्ण करणार.”
“अरे यावेळी मी माझी गाडी काढणार आहे माझ्या खास मित्रासाठी. जिथे जिथे आपला ग्रुप सेवा देत असेल तिथे प्रत्येक ठिकाणी तू तुझी सेवा देऊ शकशील.”
“राहुल मी निःशब्द झालोय. तुझे आभार तर मानणार नाही पण माझ्या विठ्ठलानेच मला साद घातली आहे. त्याच्या दर्शनाचा लाभ मला होणारच आहे पण माझ्या बाबांचा दरवर्षीचा वारीचा वसा पूर्ण होईल. आज ते हयात नाहीत परंतु त्यांनी अनेक गरजूंना वैद्यकीय सेवा देऊन त्यांना विठ्ठल दर्शनाचं पुण्य मिळवून दिले. हीच भक्तीतील शक्ती आहे.”
©️®️ सीमा गंगाधरे

