# लेख स्पर्धा (२०/६/२५)

२१ मार्च जागतिक योगा दिना निमित्त लेख स्पर्धा (२०/६/२५)

स्पर्धेचा विषय : माझ्या आयुष्यात योगाचे स्थान.

लहानपणी माझे बाबा रोज सकाळी व्यायाम करायचे. सूर्य नमस्कार, कवायतीतले प्रकार व शेवटी योगा व सगळ्यात शेवटी शवासन. त्यामुळे ते दिवसभर उत्साही व आनंदी असायचे. आम्हा भावंडांना पण ते आम्हाला जमेल व झेपेल असे व्यायाम करायला लावत व योगा सक्तीचे असायचे. आमचे सगळ्यात आवडते म्हणजे शवासन अनेक वेळा आम्ही दमून झोपून जायचो.

लग्न झाल्यावर सुध्दा एकत्र कुटुंब होते. घरात मोठे दिर व मिस्टर नियमित ठराविक व्यायाम व योगा करायचे. मलाही मोह व्हायचा त्यांच्या बरोबर योगा करण्याचा पण….. सकाळची कामे, नंतर ऑफिस गाठण्यासाठी रोजच पळापळ चालायची. नंतर लेकीचा जन्म. त्यामुळे आवड व गरज असून योगा करणाचा योग येत नव्हता.

अशीच काही वर्षे गेली. आम्ही सगळे वेगळे झालो. हे नोकरी साठी बाहेर गावी. घरी मी व लेक दोघींच. मग वेळ मिळायला लागला. लेकीची सकाळची शाळा होती. ती शाळेत गेली की, मी टिव्हीवर रामदेव बाबांचे योगा रोज सकाळी असायचे, ते बघून करायला सुरुवात केली. बरीच वर्षे मध्ये गॅप पडल्याने काही जमायचे, काही नाही. पण प्राणायाम मात्र मला व्यवस्थित जमायला लागले व त्यामुळे मला दिवसभर उत्साह असायचा व मुख्य म्हणजे मन आनंदी असायचे. लहानपणापासून मला झोप कमीच. रात्री उशिरा कधीतरी झोप लागायची. जागरणामुळे उष्णता वाढायची, दिवसभर मरगळ असायची ती योगामुळे कमी झाली. माझे शारीरिक आजार कमी झाले. माझी सहनशक्ती वाढली.

आता वयामुळे व इतर शारीरिक आजारामुळे नियमित व योग्य पध्दतीने इतर योगांचे प्रकार करता येते नाही पण प्राणायाम मध्ये कपालभाती, अनुलोम विलोम मी रोज करते व कवायतीचे प्रकार करते.

माझ्या आयुष्यात योगा म्हणजे एक समुपदेशक, डॉक्टर, गुरू, सल्लागार व मित्र अशा अनेक रूपात बरोबर असतो. मी नेहमी म्हणते, योगा हैं जहाॅं तंदुरुस्ती हैं वहा! जागतिक योगा दिनाच्या तुम्हाला आरोग्यमय शुभेच्छा. रोज नियमित योगा करा व आरोग्य संपन्न रहा.

1,460 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!