लघू कथा

#माझ्यातली मी
#विकेंड टास्क
#एक नवी सुरुवात

माझ्या मते जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं , तिथेच तर खरी नवी सुरुवात होते . पण हे आपल्याला समजायला हवं …. संपलं म्हणून आपण पूर्णविराम देतो . पण आपण जर स्वल्पविराम देत पुढे गेलो तर … नव्या विषयाला एक नवी सुरुवात होईल ..कारण सारं संपल्यावरच आपण नव्याने विचार करायला सुरुवात करतो आणि मग नव्या विचाराला एक नवी दिशा मिळून जाते .

सरिता दुधाचा ग्लास घेऊन आपल्या खोलीत येते . मनात विचारांचं काहूर माजलेलं असतं . सचिन आपली वाट पाहत असेल असं तिला वाटत असतं . तो आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट सुद्धा आणला असेल हाही विचार ती करत असते . आपल्याला जे हवं आहे ते जर त्यांन आपल्याला गिफ्ट केलं तर आज पासून तो आपल्याला खूपच आवडेल… हा विचार देखील तिच्या मनात चमकून जातो .. तिला दाग -दागिने किंवा कपडेलत्ते यांची काही हाऊस नव्हती , फक्त तिला सचिन कडून आपल्या आवडीच्या लेखकाची एखादी कादंबरी हवी होती . कारण लग्नाआधी पहिल्या भेटीत तिने सचिनला आपल्या आवडीनिवडी सांगितल्या होत्या . त्यावेळी तो फारसा काही लक्ष दिला नव्हता पण नंतर याच्यावर तो विचार करेल अशी तिची आशा होती .
सरिता एका शिक्षकांची मुलगी असल्याने , तिला वाचण्याची भरपूर आवड होती . आणि तिच्या प्रत्येक वाढदिवसाला तिच्या वडिलांनी तिला पुस्तकेच भेट दिली होती . ती तिच्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा हेच सांगायची की मला माझ्या वाढदिवसाला पुस्तकेच भेट द्या .
आणि आजही तिला सचिनकडून एखाद्या पुस्तकाची अपेक्षा होती …. पण अपेक्षाभंग व्हायला काही वेळ लागला नाही … ती जेव्हा खोलीत प्रवेश करते तेव्हा सचिन तिची वाट पाहत असेल अशी तिची अपेक्षा होती पण तो तर नोटा मोजण्यात व्यस्त होता … सरिता एक शब्दही न बोलता त्याच्या शेजारी जाऊन बसली , पण तिच्याकडे लक्ष न देता तो आपला व्यवहारच पाहत होता. आता पहिली रात्र अशी गेली म्हटल्यावर नंतरचे दिवस कसे जातील या विचाराने सरिता हताश झाली.
दिवसा मागून दिवस जात होते . पण दोघांच एकाही विषयावर सहमत होत नव्हतं . सरिताचा एकही विचार सचिनला पटत नव्हता .. बघेल तेव्हा व्यवहार पैसा नुकसान नफा ह्या गोंधळामध्येच बुडालेला असायचा. सरिताला वाईट वाटायचं …आपले विचार मांडायचे तरी कोणासमोर .. हा तिला प्रश्न पडायचा .
सचिन आपल्याकडे लक्ष देत नाही तर आपण आपला वेळ घालवायचा तरी कसा या विचाराने सरिता पुस्तके वाचायची पण पुस्तके वाचताना ती त्यात रमून जायची आणि सचिन आलेलं तिला माहितीच व्हायचं नाही. मग तिच्यावर तो रागवायचा . कशाला त्या पुस्तकात डोकं खूपसून बसतेस असं ओरडायचा .. एक एकदा तर चक्क त्यांन हातातलं पुस्तक काढून घेऊन फाडूनही टाकलं आहे . मग त्या गोष्टीवर होणारा वाद भांडणे या साऱ्यांनी सरिता कंटाळली होती . वडिलांना त्याविषयी तिनं सांगितलं होतं . पण वडील साधे शिक्षक… मुलीला सांगणार तरी काय .. संसारा हा असाच असतो नवऱ्याच्या मतानुसार आपल्याला वागायला लागतं असं सांगून ते तिची समजूत काढायचे आणि शेवटी एकच वाक्य म्हणायचे …सरिता कधी करते का खंत …
हळव्या बापाच्या मनाला धक्का लागू नये म्हणून सरिता स्वतःचा संसार आहे तशीच ओढत होती .

पुस्तके पाहिल्यावर सचिनचं डोकं फिरायचं … त्याचा मनस्ताप वाढायचा … शेवटी कंटाळून सरिताने आपली सारी पुस्तक एका गाठोड्यात बांधून उंच माळावर ठेवून टाकली …. आणि त्यावर एक कागद चिकटवला आणि त्यावर लिहिलं की ” सरिता आता कधीच करणार नाही खंत आता तिचा झाला आहे अंत “..

सरिता आपल्या व्यवसायाला हातभार लावावा अशी सचिनची इच्छा होती . पण सरिताचं सचिनच्या त्या व्यवसायात मन रमायचं नाही … मग कळत नकळत तिच्याकडून चुका व्हायच्या … त्या चुकांमुळे सचिन तिच्यावर रागवायचा , त्यातून वादावाद निर्माण व्हायचे.
शेवटी एकदा वादावादी इतक्या टोकाला गेले की त्या दोघांनी वेगळं व्हायचं ठरवलं … आणि कायद्यानुसार सरिता त्याच्यापासून दूर झाली..

सचिनच्या बंधनातून सुटलो खरं ., पण आता पुढे काय?
आता आपले बाबा आपल्या संस्कारांना दोष देतील, आपण आपल्या मुलीला वाढवायला कुठे कमी पडलो याचा त्यांना पश्चाताप होईल , या विचाराने सरिता आत्महत्ये चा विचार करू लागली .. आता जीवनात काहीच उरलं नाही असं तिला वाटू लागलं . जीवन म्हणजे संसारात सुखी होणं एवढीच संकल्पना तिला या समाजाकडून कळली होती. आणि या स्पर्धेमध्ये आपण जिंकलो नाही म्हणून आपल्याला जगण्याचा हक्कच नाही असे तिला वाटू लागले …
सरितेचा विषय जेव्हा तिच्या वडिलांना कळाले तेव्हा ते स्वतःला दोष देऊ लागले . आपल्या मुलीचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला माहिती होतं … तरीही आपण एका व्यवसायिकाच्या गळ्यात तिला बांधलं याचा त्यांना पश्चाताप होऊ लागला.. पण पश्चाताप करण्याची ही वेळ नव्हती त्यांना कसंही करून सरिताला सावरायचं होतं . त्यामुळे त्यांनी सरिताला आधार द्यायचा विचार केला . आणि तिला , तिच्या मनाप्रमाणे वागण्याची संधी दिली .

सरितेचा आज वाढदिवस होता, सरिताच्या वडिलांनी तिच्यासाठी रेशीम कपड्यानी बांधलेल एक गाठोड भेट दिलं . जे तीन उंच माळावर आपल्या सासरी ठेवलं होतं .

भरलेल्या डोळ्यांनी सरिता त्या गाठोड्यावर चिकटवलेल्या कागदावरील अक्षर वाचत होती…

” सरितेच्या खंतेचा झाला आता अंत , आता तिच्या जीवनाची झाली नवी खरी सुरुवात “…

आणि … आज सरिता एक मोठी लेखिका बनली आहे ..

” सरिता कधी करते का खंत या तिच्या कादंबरीने सर्वत्र ओळखली जात आहे .”

रूपाली मठपती…

error: Content is protected !!