” फक्त तत्वज्ञानाने आयुष्य जगता येत नाही. त्यासाठी व्यावहारिक आयुष्यातील झटके आणि चटके खावे लागतात. ” हे वाक्य वापरून
लघु कथा (४/८/२५)
……. मित्र नव्हे वैरी ………
योगेश व रमेश दोघेही लहानपणीचे मित्र. योगेश हुशार, मेहनती व भोळा, त्याउलट रमेश बुध्दीने यथातथाच होता, पण अतिशय धूर्त. तरीही दोघांची मैत्री होती.
योगेशच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला व ते अंथरुणाला खिळले. घरातील जवाबदारी योगेशवर आली. बाबांचे कपड्यांचे दुकान होते, ते तो सांभाळायला लागला. तो काॅलेजच्या शेवटच्या वर्षाला होता. हे वर्ष वाया जाऊ द्यायचे नव्हते म्हणून योगेश आभ्यास व दुकान दोन्ही सांभाळत होता. एकदा बी. काॅम झाल्यावर, नोकरी करून बाहेरून परीक्षा देऊन त्याला शिकायचे होते.
वडीलांचा औषधांचा व घरखर्च दुकानातल्या कमाईवर चालवणे योगेशला कठीण जात होते. रमेश एकटाच होता व कामधंदा करत नव्हता. तो अधूनमधून दुकानात यायचा. तेव्हा हा योगेशला कपडे दाखवायला मदत करायचा.
योगेशची परीक्षा जवळ आल्याने तो आभ्यास करायचा व रमेश कस्टमर बघायचा. त्याला या दुकानाचा मोह झाला. योगेशला म्हणाला, तूला तसेही दुकान चालवायचे नाहीये. शिकून नोकरी करायची आहे तर मला कायदेशीर भागीदार कर म्हणजे व्यवहारात अडचण येणार नाही. मी दुकान सांभाळीन व निम्मा हिस्सा तुला देईन.
रमेश आपला लहानपणीचा मित्र आहे, हा काही आपल्याला फसवणार नाही, याला भागीदार केले की, हा दुकान बघेल व मी नोकरी करीन. यालाही काम मिळेल व दुकानही सुरू राहील. रमेशने त्याच्या ओळखीच्या वकीलाला जास्त पैसे देऊन स्वतःचा फायदा होईल असे कागदपत्रे तयार करून घेतले. योगेश चांगल्या मार्कांनी पास झाला व त्याला एका कंपनीत नोकरी पण लागली. बाबांची तब्येत जास्त बिघडल्याने परत दवाखान्यात ठेवावे लागले. नवीन नोकरी त्यामुळे रजा मिळणार नव्हती म्हणून नाईलाजाने नोकरी सोडून द्यावी लागली.
बाबांच्या आजारपणामुळे योगेशला दुकानात जाता येत नव्हते त्याचा गैरफायदा घेऊन. योगेशच्या खोट्या सह्या करून रमेशने दुकान एका बाहेरगावच्या माणसाला विकले व पैसे घेऊन तो पळून गेला. बाबांचे निधन झाले. त्या गडबडीत योगेशच्या लक्षात आले नाही की, बरेच दिवसात रमेश आपल्याला भेटलाच नाही. तो दुकानात गेला तर तिथे सगळे अनोळखी लोकं कामं करत होते. योगेशने तिथल्या एकाला विचारले की, रमेश कुठे आहेत? आणि तूम्ही कोण आहात? माझ्या दुकानात तूम्ही का काम करता? तेव्हा मालक म्हणाला, आता मीच या दुकानाचा मालक आहे. रमेशने हे दुकान मला विकले आहे. त्याने पुराव्यासाठी कागदपत्रे दाखवली. योगेशला काय बोलावे कळेना तो तिथून घरी आला.
आपला बालपणीचा मित्र आपल्याला फसवणार नाही हे फक्त तत्वज्ञान त्याला व्यावहारिक झटके व चटके देवून गेले.
शब्द संख्या : ३६१
