” आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी काय चांगले केल आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केल. ” या वाक्यावरून लघु कथा. (११/८/२५)
….. आनंदाने जगा व जगू द्या ……
काल अनन्या ऑफिस मधून येताना रस्त्यावर खूप गर्दी झाल्याने ट्राफिक जाम झाला होता. तिने ड्रायव्हर काकांना सांगितले की, काका खाली उतरून जरा बघा काय झाले ते ? त्यांनी सांगितले की, एक बाईकवाला भररस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे व कोणीही मदतीला न येता नुसती बघ्यांची भूमिका घेताएत. अनन्या खाली उतरली व तिथे गेली. त्याला हाॅस्पितल मध्ये तातडीने नेणे गरजेचे होते म्हणून तिने ऍब्युलन्स बोलावून ती स्वतः त्याच्या बरोबर ऍब्युलन्स मधून गेली. तिने निरखून बघितल्यावर तिला चेहरा ओळखीचा वाटला तेव्हा त्याच्या गळ्यात कंपनीचे ओळखपत्र दिसले. तिने नाव वाचले, सुबोध काळे आणि तिला त्याची ओळख पटली.
हाॅस्पिटल मध्ये त्याला ऍडमिट केले व सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून ट्रिटमेंट सुरू झाली. ती रात्रभर तिथेच थांबली. सकाळी डॉक्टरांची राऊंड झाल्यावर त्यांनी औषध लिहून दिली ती आणायला गेल्यावर सुबोधला शुध्द आली. आपण इथे कसे? आपल्याला कोणी आणले हे तो नर्सला विचारत असताना, अनन्या औषधं घेऊन आली, नर्स म्हणाली, यांनी तुम्हाला इथे आणले. सुबोध म्हणाला, अनन्या तू….. तू मला वाचवलेस. अनन्या… नाही काळूबाई…. तूच हे नाव ठेवलेस मला. विसरलास का? मला बघून तू व तूझे मित्र काळूबाई आली हो काळूबाई आली म्हणायचे नं. मला खूप वाईट वाटायचे सुरवातीला मी आजीच्या कुशीत शिरूर रडायची. तेव्हा आजी मला सांगायची, तू जितकी चिडशील तेवढे ते जास्त चिडवतील. तू दुर्लक्ष कर. मग मलाही तूमच्या चिडवण्याची सवय झाली व नंतर ते मी विसरून पण गेले. अनन्याने आपल्याला वाचवले हे कळल्यावर त्याला स्वतःचीच लाज वाटली. ज्या मुलीला चार वर्षे आपण त्रास दिला तिनेच आज आपला जीव वाचवला. सुबोधच्या डोळ्यात पाणी आले. तो अनन्याला म्हणाला, तूझे माझ्यावर खूप उपकार आहेत. तू जुने मनात न ठेवता माझ्या मदतीला धावून आलीस. अनन्या म्हणाली, मला माझ्या आजीने शिकवले आहे की, आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरायच्या आपल्याशी कोणी वाईट वागले तरी ते विसरून जायचे व आपण कोणासाठी चांगले केले तर तेही विसरून जायचे. तेव्हा तू जास्त विचार करू नकोस. घरी फोन कर व त्यांना बोलावून घे म्हणजे मला घरी जाता येईल.
शब्द संख्या ३४४.
