.#माझ्यातीलमी
#लघुकथालेखनटास्क

ओंजळीतील नाती

नयनतारामध्ये राहायला आले आणि शेजारी मीरा काकू भेटल्या. त्यांच्या घराचं दार कायम उघडं असायचं, जसं त्यांच्या मनाचं. कुणीही आलं तरी रिकाम्या पोटी परत जायचं नाही, हे त्यांचं ठरलेलं. नातं, ओळख, आपलं-परकं असा भेद नव्हताच. सगळ्यांना त्या आपलंसं करत.

स्त्री म्हणून मला ते फार जवळचं वाटायचं. कारण आपणही आयुष्यभर असंच देत राहतो
वेळ, माया, काळजी आणि कधीकधी स्वतःलाच विसरतो.

काही दिवसांनी काकूंचा अपघात झाला. हॉस्पिटलमध्ये मला वाटलं, काकूंनी जमवलेली माणसं आता धावून येतील. पण तसं झालं नाही. खरंच थांबणारी, काळजी घेणारी माणसं फारच मोजकी होती. बाकी फक्त कोरडी सहानुभूती होती.

मनात खूप खंत दाटून आली. काही दिवसांनी मी ते काकूंना सांगितलं. त्यांनी माझा हात अलगद धरला. त्यांच्या डोळ्यांत मला फक्त शांतता दिसत होती.

त्या म्हणाल्या,
“मी देते कारण मला द्यायला आवडतं. पण बदल्यात अपेक्षा ठेवत नाही. ती ठेवली की दुःख वाढतं. हे मला समजलं आहे ग. आणि हे जेव्हा समजलं, तेव्हा मी स्वीकारलं की ते आपल्याला आपले मानत नसले तरी मी त्यांना आपलं समजते. आपली भरलेली ओंजळ आपण बघायची
ह्या सगळ्यात माझा एकच दृष्टिकोन आहे
काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात; कितीही जपली तरी आपली होत नाही.” हे स्वीकारावं, बाकी सोडायचं, बस.

त्या क्षणी मला उमगलं
काकूंचं स्त्रीमन किती मोठं आहे.
सहज प्रत्येक नातं आपल्या ओंजळीत किती सहज सांभाळून धरते, आणि वेळ आली तर किती सहजतेने ती ओंजळ रिती करत निरपेक्ष राहते. तेव्हा त्यात सगळं किती छान, सहज ओंजळतं.

(शब्दसंख्या: २१८ शब्द)

©® मनगुंजन सीमा
सौ सीमा कुलकर्णी

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!