#माझ्यातलीमी
#लघुकथा लेखन.(४/८/२५)
कथेचे शीर्षक:- ” फक्त “एक निर्णय.
सार्थक एक तरुण वकील आपला पहिला मोठा खटला लढण्यासाठी कोर्टात उभा होता. त्याच्या समोरचा आरोपी एका मोठ्या कंपनीचा मालक होता ज्याने अनेक कामगारांचे पैसे बुडवले होते. सार्थक ने खूप अभ्यास करून, आपल्या तत्त्वज्ञानावर आधारित एक मजबूत केस तयार केली होती.
सार्थक:- ” न्यायाधीश महोदय! कायद्याच्या तत्त्वानुसार आरोपीने केलेल्या कृत्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे मला खात्री आहे की न्याय जिंकणारच”.
(नील, जो कोर्टात सार्थक च्या बाजूला बसला होता. त्याने त्याला हळूच विचारले.)
निल म्हणाला,” सार्थक, तू केवळ कायद्याच्या पुस्तकावर अवलंबून आहेस. पण आरोपीकडे खूप पैसा आणि राजकीय पाठबळ आहे. त्याचा वकील अनुभवी आणि चलाख आहे.
सार्थक म्हणाला,” नील माझ्या तत्त्वांवर मला विश्वास आहे. सत्य नेहमी जिंकते. कायद्याची नैतिकता सर्वोच्च आहे.
(कोर्टात केस चालू असताना. आरोपीच्या वकिलाने एका महत्त्वाच्या साक्षीदाराला विकत घेतल्यामुळे सार्थकचा महत्त्वाचा पुरावा निरुपयोगी ठरला आणि सार्थक निराश झाला.)
सार्थक म्हणाला,” हे कसं शक्य आहे? माझा सगळा अभ्यास, माझी तत्व सगळं काही व्यर्थ ठरलं!”
नील म्हणाला,” सार्थक निराश होऊ नकोस फक्त तत्त्वज्ञानाने आयुष्य जगता येत नाही. त्यासाठी व्यावहारिक आयुष्यातील झटके आणि चटके खावे लागतात. आज तुला हाच चटका बसलाय. तू केस जिंकली असतीस पण तू फक्त कायद्याच्या एकाच बाजूचा विचार केलास. तू हे विसरलास की कायद्याच्या बाहेरही एक जग आहे आणि जिथे पैशाची आणि सत्तेची ताकद चालते”.
नील ने त्याला एक सल्ला दिला. त्याने सांगितलं की आता आपल्याला कायदेशीर मार्गासोबत जनमताचा वापर करायला हवा. सार्थक ने मीडियाच्या मदतीने त्या कामगारांना एकत्र आणले. कंपनीसमोर निदर्शने सुरू केली. बातम्यांमध्ये हे प्रकरण गाजल्यामुळे कंपनीच्या प्रतिमेला धक्का बसला.
सार्थक म्हणाला,” नील, तू खरच योग्य होतास. केवळ कायद्याच्या पुस्तकावर अवलंबून राहणे पुरेसे नाही”.
या दबावामुळे आरोपीला नमते घ्यावे लागले व कामगारांची थकबाकी देण्याचे मान्य केले. सार्थक ने केस जिंकली आणि कामगारांना न्याय मिळवून दिला.
सार्थक आत्मविश्वासाने म्हणाला,” आज मला कळलं की तत्व महत्त्वाची आहेत पण ती जिवंत ठेवण्यासाठी कधी कधी व्यवहाराचा आधार घ्यावा लागतो आणि त्यातूनच खरी लढाई जिंकता येते”.
संदेश:-
जीवनात केवळ नैतिक आदर्श पुरेसे नसतात. जेव्हा परिस्थिती आव्हानात्मक असते, तेव्हा तत्त्वांना व्यावहारिकतेची जोड देणे आवश्यक ठरते. कठोर वास्तवाचे ” झटके, चटके”, आपल्याला अधिक मजबूत आणि कुशल बनवतात.
शब्द संख्या 290.
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®
