लग्न म्हणजे सोशल स्टेटस शो

लग्न म्हणजे सोशल स्टेटस शो

लग्न…
एकेकाळी दोन माणसांच्या आयुष्याला जोडणारा पवित्र संस्कार. यातून निर्माण होणार एक पवित्र नात.
दोन कुटुंबांच्या नात्यांना घट्ट बांधणारा भावनिक बंध.
संयम, जबाबदारी, प्रेम आणि आयुष्यभराच्या सहवासाचा शब्द.
मात्र आज या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत चालला आहे. लग्न आता संस्कार न राहता सोशल स्टेटस शो बनत आहे. नात्यांपेक्षा नेटीझन महत्त्वाचे ठरू लागले आहेत. प्रेमापेक्षा पोस्ट, समजुतीपेक्षा शोभा आणि आयुष्यापेक्षा इमेज जपण्याची स्पर्धा सुरू आहे.
पूर्वी लग्न साधं होतं. मोजकी आमंत्रणं, साध टिपिकल पारंपारिक जेवणाच्या पंक्ती,ओळखीची माणसं आणि भरपूर भावना. प्रेम.लग्नात काय केलं यापेक्षा कोणासोबत केलं, हे महत्त्वाचं असायचं. आज मात्र चित्र वेगळंच आहे. लग्न म्हणजे एक मोठा इव्हेंट, नियोजन महिनोन्‌महिने आधी सुरू होतं. लग्नाची सुरुवात शुभमंगलाष्टकांनी नाही, तर प्री-वेडिंग शूटने होते.
कोणता हॉल, किती चौरस फूट, किती झुंबर, कोणता डेकोरेटर, कोणता फोटोग्राफर, कोणते डिझायनर कपडे या सगळ्याचा हिशोब लग्नाच्या अर्थाशी जोडला जातो. जणू लग्नाची किंमत नात्यांमध्ये नाही, तर खर्चाच्या आकड्यात मोजली जाते.
या बदलामागे सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, रील्स आणि स्टेटसने लग्नाला प्रदर्शन बनवलं आहे. फोटो किती सिनेमॅटिक आहेत, व्हिडिओ किती व्हायरल झाला, किती लाईक्स मिळाले यावरच लग्न ‘यशस्वी’ की ‘फसलेलं’ हे ठरतं. काही वेळा लग्न स्वतःसाठी नसून, इतरांसाठी केलं जातंय, असं वाटू लागतं.
या दिखाव्याच्या स्पर्धेत अनेक कुटुंबं अक्षरशः होरपळून निघतात. “आपण कमी पडू नये”, “लोक काय म्हणतील?”, “समोरच्याच्या लग्नापेक्षा आपलं मोठं हवं” या मानसिकतेतून कर्ज काढलं जातं, आई वडिलांचा बँक बैलेंस रिकामा होतो . एका दिवसाच्या झगमगाटासाठी आयुष्यभराचा आर्थिक ताण स्वीकारला जातो. लग्न संपतं, पाहुणे निघून जातात, सोशल मीडियावरची चर्चा थांबते पण कर्जाचं ओझं मात्र पालकांच्या आणि हल्ली थोड्या प्रमाणात नवदांपत्याच्याही आयुष्यावर कायमचं बसतं.
या सगळ्यात सर्वात जास्त अडकतं ते नवविवाहित जोडपं. लग्नानंतर सुरू होणारं नवं आयुष्य प्रेम, समजूत आणि सहवासावर उभं राहण्याऐवजी ‘परफेक्ट कपल’ची इमेज जपण्यात अडकतं. खऱ्या आयुष्यात मतभेद असतात, अडचणी असतात, संघर्ष असतात पण सोशल मीडियावर मात्र कायम हसतं-खेळतं चित्र दाखवावं लागतं. ही बनावटी परिपूर्णता मानसिक ताण वाढवणारी ठरते.

या सगळ्या प्रक्रियेत साधेपणा हरवतो. साधं लग्न करणं आज धाडसाचं मानलं जातं. “एवढंच?”, “काही खास नाही वाटलं” अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. जणू साधेपणा हा न्यूनगंड बनवला गेला आहे. खरं तर साधेपणात असलेली शांती, समाधान आणि स्थैर्य यांची किंमत कुठेच मोजली जात नाही.

स्त्रियांच्या बाबतीत हा दबाव अधिक तीव्र असतो. वधूचा लूक, कपडे, दागिने, मेकअप, फिगर सगळं जणू समाजाच्या नजरेखाली असतं. लग्न हा तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतानाही, तिची ओळख ‘ब्राइडल फोटो’पुरतीच मर्यादित केली जाते. तिचं शिक्षण, तिचे विचार, तिची स्वप्नं दुय्यम ठरतात.

प्रश्न असा आहे की, आपण लग्न नेमकं कोणासाठी करतो? दोन माणसांच्या आयुष्याचा निर्णय हा समाजाच्या अपेक्षांवर अवलंबून असावा का? लग्नानंतर आठवणीत काय राहायला हवं एकमेकांसोबत घालवलेले क्षण की सोशल मीडियावर मिळालेले लाईक्स?

खरं तर लग्नाची खरी किंमत मोठ्या हॉलमध्ये नाही, महागड्या कपड्यांत नाही, किंवा सेलिब्रिटी फोटोंमध्ये नाही. ती असते दोन माणसांच्या परस्पर आदरात, संवादात, विश्वासात आणि कठीण प्रसंगी एकमेकांसाठी उभं राहण्याच्या तयारीत. हे सगळं कॅमेऱ्यात कैद होत नाही, पण आयुष्यभर अनुभवता येतं.

आज गरज आहे ती समाजाने आत्मपरीक्षण करण्याची. लग्न म्हणजे स्पर्धा नाही. तो शो नाही. तो एक जबाबदारीचा निर्णय आहे. तो दोन माणसांनी एकत्र आयुष्य निभावण्याचा समाजदारपण आहे. जर अशा पवित्र नात्याची सुरुवातच दिखावा, कर्ज आणि बनावटी परिपूर्णतेवर झाली, तर पुढचा प्रवास अधिकच कठीण होणार आहे.

म्हणूनच आता आपल्याला ठरवावं लागेल
आपल्याला झगमगाट हवाय की स्थैर्य?
आपल्याला लाईक्स हवेत की विश्वास?
आपल्याला शो हवा आहे की सहवास?

कारण शेवटी लग्न हे एकमेकांच्या प्रेमाने आवडीने समजुत्तीने जाणिवेने तयार झालेल सुंदर नात असायला हवं,
लोकांनी काय पोस्ट केलं, किती व्हायरल झालं यासाठी नव्हे.

लग्न हे दाखवण्यासाठी नाही, निभावण्यासाठी असतं
हे साधं सत्य पुन्हा एकदा स्वीकारून आजच्या पिढीला समजवण्याचा वेळ त्यांच्या पालकांवर आली आहे.असा मला वाटत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!