#माझ्यातली मी
#वीकेंड टास्क (19/12/२०२5)
#लग्नम्हणजेसोशलस्टेटसशो
लग्न एक पवित्र बंधन की सोशल स्टेटसचा दिखावा?…
एका लग्नाची गोष्ट…
गेल्या महिन्यात मी एका लग्नाला गेले होते. वधूच्या वडिलांनी,जे आमचे जुने मित्र आहेत. त्यांनी आपल्या आयुष्य भराची पुंजी त्या एका दिवसासाठी लावली होती.
हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, परदेशातून मागवलेली फुलं,शंभरावर पदार्थांचा मेनु, अॅंकरिंग करणाऱ्या मुलीच्या तालावर नाचणारं वधू वर, धक्काच बसला.
मी पाहिलं की, नवरी मुलगी आणि नवरा मुलगा लग्नाच्या विधींकडे लक्ष देण्याऐवजी सतत ‘कॅमेरामन’च्या आणि अॅकर च्या सुचना पाळण्यात व्यस्त होते.
मंगलाष्टकं सुरू असताना पाहुणे अन्नाच्या नासाडीवर आणि सेल्फी काढण्यावर चर्चा करत होते. ज्या बापाने लाखो रुपये खर्च केले, तो बाप मात्र तिथे कुठेच दिसत नव्हता.
लग्न होतं होतं, पण नात्यातला तो ‘ओलावा’ मात्र कुठेतरी गायब होता.ही गोष्ट केवळ एका लग्नाची नाही, तर आजच्या बदलत्या संस्कृतीचं ते विदारक वास्तव आहे.
भारतीय संस्कृतीत ‘लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात’ असं आपण अभिमानाने सांगतो. पण आज लग्नाची व्याख्या ‘दोन जीवांचे मिलन’ राहण्यापेक्षा ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ अधिक झाली आहे.
लग्नाची पूर्वतयारी आता ‘शुभ मुहूर्त’ पाहून नाही, तर ‘प्री-वेडिंग शूट’साठी फोटोग्राफरच्या तारखा पाहून ठरते.
आजच्या काळात लग्नाचं यश हे पाहुण्यांच्या आशीर्वादावर नाही, तर इन्स्टाग्रामवर मिळणाऱ्या ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’वर मोजलं जातं.
लग्नाआधी परदेशात जाऊन लाखो रुपये खर्च करून फोटो काढणं आता अनिवार्य झालंय. याला आपण हौस म्हणायचं की एक प्रकारची ‘मानसिक स्पर्धा’?
सोशल मीडियावर आपलं लग्न किती ‘ग्रँड’ आहे, हे दाखवण्याच्या नादात आपण त्या क्षणाचा निखळ आनंद घ्यायला विसरतोय.
श्रीमंतांच्या लग्नाची कॉपी करण्याच्या नादात मध्यमवर्गीय कुटुंबं भरडली जात आहेत. “लोक काय म्हणतील?” किंवा “आमच्या नातेवाईकांनी इतकं केलं, मग आम्ही मागे का?” या अवास्तव प्रतिष्ठेपायी अनेक वडील आपल्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढतात.
लग्न एका दिवसात संपतं, पण त्याचे हप्ते फेडताना त्या बापाचे पुढचे अनेक वर्षं कष्टात जातात. ही खरंच सुज्ञपणाची लक्षणं आहेत का?
महागड्या पत्रिका आणि आता पत्रिकांसोबत चांदीची नाणी किंवा महागडे ड्रायफ्रूट्स देण्याची फॅशन आली आहे.
डिजाइनर कपडे केवळ ४-५ तासांच्या लग्नासाठी लाखो रुपयांचे कपडे घेतले जातात, जे पुन्हा कधीच कपाटाबाहेर निघत नाहीत.
प्रमाणाबाहेर पदार्थांची रेलचेल असते, ज्यातील निम्मं अन्न कचऱ्यात जातं. ‘आमच्या लग्नात इतके पदार्थ होते’ ही फुशारकी मारण्यासाठी हा अन्नाचा अपमान का?
आपण कुठे चुकतोय?
आमची पिढी बऱ्याचदा म्हणते, “मला जे मिळालं नाही, ते मी माझ्या मुलांना देणार.” पण हे ‘देणं’ म्हणजे केवळ पैसा उधळणं आहे का? आपण आपल्या मुलांना नात्यातील गांभीर्य, पैशाची किंमत आणि साधेपणाचं महत्त्व शिकवण्यात कमी पडतोय का?
आजची तरुण पिढी कदाचित या ग्लॅमरला भुलली असेल, पण त्यांना योग्य दिशा देणं ही मोठ्यांची जबाबदारी आहे.
माझ्या मते लग्न थाटात करा, पण तो थाट आपल्या खिशाला परवडणारा असावा, कोणाला दाखवण्यासाठी नाही.
मोजक्या, पण खऱ्या प्रेमाच्या माणसांना बोलवा. हजारो अनोळखी लोकांच्या गर्दीपेक्षा दहा आशीर्वादाचे हात जास्त मोलाचे असतात.
लग्नाचा अनावश्यक खर्च टाळून तो पैसा मुलांच्या भविष्यासाठी किंवा एखाद्या अनाथाश्रमाला दान केला, तर त्या संसाराला खऱ्या अर्थाने देवाघरचा आशीर्वाद मिळेल.
लग्नाला ‘शो’ बनवण्यापेक्षा त्याला पुन्हा एकदा ‘संस्कार’ आणि ‘नात्याचा उत्सव’ बनवूया. शेवटी पैसा तुमचा आहे, आयुष्य तुमचं आहे, पण लक्षात ठेवा—देखण्या लग्नापेक्षा देखणा संसार अधिक महत्त्वाचा असतो.
शेवटी एकच वाटतं, काळ बदलला तशा पद्धती बदलल्या हे मान्यच आहे.
प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुला-मुलीचं लग्न थाटात व्हावं आणि प्रत्येक तरुण जोडप्याला आपले आनंदाचे क्षण सुंदर पद्धतीने जपून ठेवावेसे वाटतात, यात काहीच गैर नाही.
माझा हा लेखन प्रपंच कोणाच्याही आनंदावर विरजण घालण्यासाठी किंवा कोणाच्या भावना दुखावण्यासाठी मुळीच नाही.
कोणाचे वैयक्तिक निर्णय किंवा हौस-मौज चुकीची ठरवण्याचा माझा अधिकारही नाही. शेवटी पैसा तुमचा आहे, स्वप्नं तुमची आहेत आणि निर्णयही तुमचाच आहे.
पण हे सगळं बघताना मन कुठेतरी ‘खजिल’ होतं, कारण आपण पुढच्या पिढीला नेमका कोणता वारसा देतोय? लग्नाचा सोहळा हा ‘इव्हेंट’ म्हणून लक्षात राहण्यापेक्षा, तो त्यातल्या ‘माणुसकीने’ आणि ‘आशीर्वादाने’ स्मरणात राहावा, इतकीच माफक अपेक्षा आहे.
लग्न म्हणजे केवळ दोन शरीरांचे नाही, तर दोन आत्म्यांचे आणि दोन कुटुंबांच्या विश्वासाचे मिलन आहे.
हा विश्वास सोन्या-चांदीच्या दागिन्यांपेक्षा किंवा सोशल मीडियाच्या लाईक्सपेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान आहे.
चला, लग्नाला पुन्हा एकदा ‘प्रदर्शनापेक्षा’ अधिक ‘दर्शन’ आणि ‘दिखाव्यापेक्षा’ अधिक ‘जिव्हाळा’ मिळवून देऊया. कारण देखणी रोषणाई काही तासांची असते, पण नात्यातला ओलावा आयुष्यभराचा असतो.
बघा पटतंय का… पटलं तर नक्की विचार करा, नाहीतर आपला हा लेख समजून वाचून पुढे जा हा माझा वैयक्तिक मांडलेला विचार समजा आणि आणि सोडून द्या.
©️®️उज्वला राहणे
