# माझ्यातली मी #.. लेख स्पर्धा..
***** माझ्या आयुष्यात योगाचे स्थान *****
खरं सांगू का मला आधीपासूनच म्हणजे वयाच्या १० वर्षापासून मॉर्निंग वॉक आणि योगा हा खरोखरच मनापासून आवडायचा. त्यावेळेसचे आई-बाबांनी केलेले संस्कार मला फायद्याचेच ठरले. आई-बाबांनी आम्हा भावंडांना कधीच अंथरुणात लोळत पडू दिले नाही. मग लवकर उठून करायचे काय? सकाळी ५ची वेळ. अभ्यास तर हा राहतोच. मी लवकर उठण्याचा फायदाच करून घेतला व रोज वॉक आणि योगा सकाळी झालाच पाहिजे यानुसार मी माझा प्रोटोकॉल ठरविला व त्यावर कायमच फोकस ठेवला.
माझ्या आयुष्यात योगाचे स्थान म्हणजे मनाची मानसिकता व शरीराची ताकद वाढविणे. चिकाटीने जर प्रयत्न केला तर आपण नक्कीच यात यश शिखर गाठू शकतो. योगा केल्याने शरीराची लवचिकता वाढते.ताठरपणा जर आला असेल तर स्नायू मोकळे होऊन मजबुतीकडे त्यांचा कल जातो व शरीर अधिकच सक्षम होण्यास मदत होते. मनावरील ताण-तणाव कमी होऊ नकारात्मक भूमिकेतून सकारात्मक भूमिकेकडे आपण वळतो. रोगप्रतिकार शक्ती वाढून अनेक आजारापासून मुक्त होतो. आत्मविश्वास, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते. ध्यान आणि चिंतन करण्यास मदत होते. योगा हा भावनिक संतुलनास मदत करून स्वतःची ओळख करून देतो. जीवनाचा अर्थ सोप्या पद्धतीने समजून घेण्यास त्याचा सहभाग हा उंच शिखरावर नेऊन पोहोचवतो.
माझ्या आयुष्यातील “योगाचे महत्व ” हा टॉपिक खूपच महत्त्वाचा आहे. योगाचे महत्त्व काय हे वर सांगितल्याप्रमाणे माझ्या आयुष्यात खरोखरच त्याचा जो फायदा झाला तो अगदी योग्य दिशेनेच गेला. नकारात्मकता तशीच माझ्या जीवनात कधीच नव्हती. पण म्हणतात ना फुल ना फुलाची पाकळी. एखादा टक्का जर असेल तर त्यातून सुद्धा मला मुक्ती मिळाली. सकारात्मकतेचे शिखर मी गाठले.
लग्न झाल्यानंतर सुद्धा हीच भूमिका मी कायम ठेवली. घरच्यांचा ( लहान-मोठे) मला पूर्ण पाठिंबा होता. घरची जबाबदारी सांभाळून मी अमरावतीला असतांना योगा क्लास जॉईन केला. सकाळी५. ३०ते ६. १५ मॉर्निंग वॉक व लगेच ६. ३० ते ७. १५ योगा. आमचे योगा सर सुद्धा खूप मेहनतीने आमच्याकडून योगा करून घ्यायचे. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम सुद्धा ते खूप कटाक्षाने करून घ्यायचे. प्रत्येक प्राणायाम करायला आम्हाला १० मिनिटे मिळायची. एखादा प्राणायाम करताना प्रत्येकीला एक एक गाणे किंवा भजन म्हणायचा चान्स असायचा. ज्या दिवशी जी गाणे म्हणेल त्या दिवशी तिचा तो एक प्राणायाम व्हायचं नाही. मी खूपच जिद्दी. ज्या दिवशी माझा प्राणायाम तिथे झाला नाही त्या दिवशी मी तो घरी आल्यानंतर पूर्ण करायचे.
कालांतराने मी मुंबईत आले. घराला लागूनच एक गार्डन होता. आम्ही दोघांनी तेथे मॉर्निंग वॉकला जायला सुरुवात केली. तिथे गेल्यानंतर “हास्य क्लब “आमच्या दृष्टीस पडला. दुसऱ्या दिवशी पासून आम्ही दोघांनी तो जॉईन केला. तिथे गेल्यानंतर आम्हाला खूपच प्रसन्न वाटायचे. भरपूर मित्र मैत्रिणींशी ओळख सुद्धा झाली. आमच्या लाफ्टर क्लब मध्ये ४० ते ५० मेंबर्स आहेत. पहिल्याच दिवशी सरांनी मला तुम्ही खूप सुंदर करताय हा किताबच म्हणाना तो बहाल केला. त्यांना मी म्हटले सर, हा योगाचा चमत्कार आहे. मी नियमित योगा करत असल्यामुळे तुम्ही जो मला किताब दिलाय तो केवळ आणि केवळ फक्त योगानेच.” ध्येय व मनाची गाठ बांधूनच मी त्यात प्रवेश केलाय. सरांनी मला लगेच म्हटले तुम्ही उद्यापासून क्लास घेऊ शकता. मी म्हणाले सर तुम्ही आमचे गुरु आहात आणि मी शिष्या. मी तर सध्या नवीनच आहे. पुढे मागे बघू.
सुट्टीत नातीला घेऊन अमरावतीला गेले की मी परत योगा क्लास अजूनही जॉईन करते. मला देते खूपच सात्विक समाधान मिळतं. त्या योगा क्लास मध्ये आम्ही सदैव सकारात्मकतेच्या भूमिकेतून वावरतो. तोही ग्रुप आमचा मोठ्या प्रमाणावरच आहे.
सध्या मी मुंबई बाहेर असल्यामुळे ऑनलाइन “सौरभ बोथरा ” सरांचा योगा क्लास जॉईन केला. त्यांचा प्रोटोकॉल हा २१ दिवसांचा आहे. पहिल्या दिवसापासूनच मला त्यांचा क्लास आवडायला लागला. त्यांचा हा लाईव्ह योगा सकाळी तीन बॅच व संध्याकाळी तीन बॅच असा असतो. मी सकाळचा मॉर्निंग वॉक करून ७. ३० ते ८. १५ ही बॅच जॉईन करते. त्यांच्या योगामध्ये सर्वांगसन ज्याला म्हणतात एकही अवयव न सोडता त्यांनी सात दिवसात वेगवेगळ्या प्रकारचे योगा, आसने, प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम व वेगवेगळी हास्यासने ते आमच्याकडून व्यवस्थित रित्या करून घेतात. त्यांच्या या लाईव्ह योगामध्ये व्हेरिएशन्स भरपूर आहेत. अजून त्यांचे १४ दिवस बाकी आहेत. ज्यांनी हा योगा क्लास जॉईन केला नसेल त्यांनी तो आवर्जून करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. मला या ७ दिवसातच त्याचा खूप फायदा झाला. योगासने निरंतर यथाशक्ती केल्याने माझ्या जीवनात समाधान, निरोगत्व व सौख्य प्राप्त झाले. कोणत्याही परिस्थितीचा आनंदाने मी सामना करू शकते. योग साधना ही एक माझ्यासाठी “निरंतर शक्तीच “आहे.
जीवनात योगसाधनेचे महत्त्व हे अनन्य साधारण आहे. २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा करतात. “सौरभ बोथरा “सरांचा हा ऑनलाइन योगा क्लास जॉईन केल्यामुळे मला २१ जून जागतिक योग दिनाचे सर्टिफिकेट सुद्धा मिळाले. धन्यवाद सौरभ सर 🙏
माझी आता एकच इच्छा आहे की २१ जून रोजी या सर्वात मोठ्या दिवसापासून नियमित योगा करण्याचा आपण सर्वांनीच संकल्प करूया.
***** कास धरू या योगाची *****
**** ध्यानधारणा करू मनःशांतीची ****
*** जीवन जगू या आनंदाने ***
** योग दिशा मिळवून आंतरिक शांतीने **
…… अंजली आमलेकर…… २१/६/२५
….. जागतिक योग दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा… 💐💐
