#माझ्यातलीमी
#लघुकथालेखन (१३.१०.२५)
दिलेले वाक्य – त्या लोकांना तुमचं मोल कधीच समजणार नाही ज्यांच्यासाठी तुम्ही नेहमी हजर राहता.
यशोदा
आई वडिलांच्या मागे धाकट्या बहिणीचे शिक्षण, लग्न सगळी जबाबदारी पार पाडली सीमाने.. आणि नंतर ओळखीच्या कोणा दूरच्या नातेवाईकाच्या मुलाशी लग्न..! डोळ्यातली स्वप्नं अजून ओलीच होती आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले तिच्या. नवऱ्याचे बाहेर संबंध ..घरात जाच..शेवटी अवघ्या चार महिन्यातच संसार आटोपला.. उध्वस्त, निराधार झाली ती. आणि धाकट्या बहिणीकडे..लीनाकडे जावे लागले तिला..!
लीनाने मायेने फुंकर घातली आणि आपला जेमतेम वर्षाचा मुलगा पदरात टाकला तिच्या..! सीमा आपलं घर समजून सगळं करू लागली. बहीण आणि मेव्हणे बाहेर नोकरीसाठी. छोट्या विहारचं खाणं मग शाळा, अभ्यास, दुखणी सारं आनंदाने तीच करे.. घरातलं सगळं खूप आपलेपणाने पाही… लीनाचे तर पानच हलत नसे सीमाताई शिवाय. समरसून गेली सीमा बहिणीच्या संसारात.. !
आज विहारचा साखरपुडा ! खूप खुश होती ती.. सगळी तयारी केली. स्टेजवर नवऱ्या मुलीला औक्षण करण्यासाठी घरातल्या ज्येष्ठ महिलेला बोलावले… तशी नकळत ती पुढे झाली… पण लीनाने तिचा हात हळूच मागे ओढला आणि स्वतः स्टेजवर चढली..!
खूप दुखावली सीमा बहिणीच्या या कृतीने..मागच्या मागे तडक आत खोलीत जाऊन बसली..असहाय.. तीस वर्षापूर्वी होती तशी..!
इकडे अंगठ्या, कपडे, पेढे , आहेर कुणालाच काही सापडेना..लीना पूर्ण गोंधळून गेली..सीमाताईला शोधत आली. तिला पाहिलं आणि लीनाला आपल्या चुकीची जाणीव झाली. सीमा म्हणाली, “खरंय .. त्या लोकांना तुमचं मोल कधीच समजणार नाही ज्यांच्यासाठी तुम्ही नेहमी हजर राहता..”
लीनाचे डोळे भरून आले. म्हणाली “सीमाताई ..खरंच चुकले..माफ कर ग… तूच तर खरी आई आहेस विहारची ! यशोदा होऊन सगळं केलंस त्याचं..आज खरा मान तुझाच आहे..!”
आणि सीमा स्टेजवर चढली. लाडक्या विहारसाठी..नव्या सुनेचं सारं कौतुकाने करण्यासाठी..!!
शब्दसंख्या – २३५
सौ. सुविद्या करमरकर
पुणे

Sundar katha
खूप छान कथा
खूप छान कथा
सुरेख कथा
मतलबीपणा