#माझ्यातली मी
# लघुकथा लेखन टास्क
विषय….पण मी माझ्या बाळासाठी उभी राहते तर चुकीची ठरते
(लेखिका… संगीता देवकर ..कथा…रिवेंज )
मातृशक्तीचा विजय
काल संध्याकाळचा विश्वास चा रुद्रावतार पाहून सारे घर चिडीचूप झाले होते.वृषाली तर कालपासून सैरभैर झाली होती . स्वराली त्यांची लेक जिच्या वरुन सारे घडले ती आपल्या खोलीत शांत बसून होती. खरोखर शांत,हुशार, मुलगी . पदवीधर होताच वडिलांनी पाहिलेल्या मुलासोबत विवाहबद्ध झाली. पुढे स्पर्धा परीक्षा देऊन कलेक्टर पदापर्यंत पोहचायचे स्वप्न मनातल्या मनात ठेवून पदरात पडलेल्या आयुष्याला सामोरी गेली .तिची आई वृषाली ला फक्त तिच्या ईच्छेची जाणीव होती पण पुरुषी वर्चस्व असलेल्या या जाधवांच्या कुटुंबात स्त्रीयांच्या विचाराला किमंत नव्हती.
सध्या जाधवांच्या घरातल्या तिनही स्त्रियांनी म्हणजे विश्वास ची आई , बायको आणि मुलगी तिघींनीही आपल्या वाटेला आलेले आयुष्य स्विकारले होते पण नियतीला ते मान्य नव्हते.एक सायंकाळ त्या कुटुंबाला दु:खी करुन गेली..जावंई मिहीर चे अपघाती निधन झाले. सहा महिन्या पूर्वी लग्न झालेल्या लेकीला ते माहेरी घेऊन आले अन तेव्हा पासून वृषाली चे चित्त थाऱ्यावर नव्हते स्वराली ने तर स्वतः जणू मिटवूनच घेतले होते.
वृषाली विचार करत होती पंचवीस वर्षापूर्वी आपले पण आपल्या बाबांनी लग्न लावून दिले.तेव्हा पासून आपल्या आवडी, छंद सारे आपण एका पेटीत बंदीस्त करुन ठेवले आणि सारे आयुष्य विश्वास च्या संसाराला वाहून घेतले होते .आता लेकीची अवस्था पाहून तिचे मन तिला स्वस्थ बसू देईना शेवटी तिने काल मुलीच्या पुढच्या शिक्षणाचा विषय काढला..
क्षणाचाही विचार न करता विश्वास गरजला….
काय आवश्यकता आहे पुढे शिकायची
आज शिकायच म्हणाल व उद्या नौकरी करायची असेल
तर परवा पुन्हा लग्न करायचं म्हणेल
अशी थेर माझ्या घरात चालायची नाहीत
या वादळानतंर सर्व शांत झाल होत.
वृषाली मनात मात्र चक्रीवादळ सुरु झाल होत.माझ्या आयुष्याच जे झाल ते झाल पण लेकीच्या मागे मी ठाम उभी राहणार एकदा घर सोडेल पण लेकीला तिच्या पायावर उभी करेल समाजाने,नवऱ्याने मला कितीही चूक ठरवले तरी मी सहन करेल. याच निर्धाराने ती विश्वास समोर जाऊन उभी राहीली…
तुमचा होकार असेल तर ठिक नाही तर मी माझ्या मुली्ला घराबाहेर काढून स्वतःच्या पायावर उभी करणार .एक चांगल आयुष्य जगण्याचा तिला अधिकार आहे.
तिच्या आवाजातली जरब आणि डोळ्यात ला आत्मविश्वास पाहून विश्वास स्तब्ध झाला व एक शब्द न बोलता घराबाहेर पडला.आजीने पण नातीसाठी मुक संमती दिली.
आज जाधवांच्या पुरुषसत्ताक घरात मातृशक्तीचा विजय झाला होता.
©® विनया देशमुख
