#माझ्यातलीमी
#वीकेंडटास्क
#कथालेखन
#सायन्स_फिक्शन
#माणसाचे_झाड_होतांना
💚 माणसाचे झाड होतांना 💚
जगातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी म्हणजेच नोबेल प्राईझ साठी विशालला नामांकन मिळालं आणि त्याच्या अथक परिश्रमाचं चीज झालं. त्याच्या घरी आनंद सोहळा साजरा करण्यात आला. आता त्यांनी स्वीडन ला जाण्याची तयारी सुरू केली.
आईवडील, बायको मुलंबाळं, नातेवाईक, मित्रमंडळी सगळ्यांच्या डोळ्यात त्याच्याबद्दल कौतुक दिसत होतं. आतापर्यंत त्याच्या कामाला, संशोधनाला सारेच वेडगळपणा समजत होते. पण आज अभिमानाने तो यशस्वी होऊन सर्वांसमोर उभा होता.
त्याच्या यशाबद्दल, त्याच्या संशोधनाबद्दल सगळीकडे चर्चा व्हायला लागल्या. मुलाखती घेण्यात आल्या .. त्याची भविष्याची पुढील वाटचाल काय यावरही प्रश्न विचारण्यात आले. त्याने काय उत्तर दिलं असेल..!
“मलाही झाड व्हायचंय .. कुणावरही विसंबून रहायला नको. मुलांची लग्न झाली, मी निवृत्त झालो की मीही माझ्या संशोधनाच्या सहाय्याने झाड होणार. स्वयंभू.. झाडाच्या रूपाने इतरांना आनंद देत राहणार.. ”
असे काय संशोधन होते त्याचे..!? सामान्यांना कळणं कठीण होतं, पण इतकं नक्की समजलेलं की त्या संशोधनाच्या उपयोगाने आपण झाड बनू शकतो.
विशाल ने हे अनोखं, आगळं वेगळं संशोधन का केलं असेल? त्याच्या मागे काय प्रेरणा होत्या ..?? ते त्याच्या बालपणात सामावलेलं होतं.
लहानपणापासूनच विशालला झाडे झुडपे, वनराई, हिरवळ, निसर्ग याचे फार आकर्षण.! इतकेच नव्हे त्याला हिरवा रंग ही खूप आवडायचा. शाळेत असताना जेव्हा पहिल्यांदा त्याला कळलं की झाडं अर्थात साऱ्या वनस्पती देखील सजीव आहेत .. तो खूप आश्चर्य चकित झाला. घरी येऊन आईकडून खात्री करून घेतली, कारण शाळेत मॅडम ने शिकवलेलं ते सारं तो घरी आईला येऊन सांगायचा.. आपल्या मनातील शंकाही विचारायचा. कारण आई म्हणेल ती पूर्वदिशा. त्याची आई पण जीवशास्त्राची प्राध्यापिका होती. त्यामुळे झाडाझुडपांबद्दलचे सारे प्रश्न विचारून तो तिला भंडावून सोडायचा.
“आई, आज ना सुरेखा मॅडम ने सांगितलं .. झाडं सुध्दा सजीव असतात. आपल्या प्रमाणे .. प्राण्यांप्रमाणे .. खरं का ग आई..?”
“अगदी खरं आहे. झाडं, वनस्पती, हिरवेगार गवत, वेली, फुलझाडं सजीवच आहेत. म्हणून तर मी तुला सांगत असते ना, की झाडांना हळुवार हात लावायचा. फुलं तोडायची नाही. त्यांनाही दुखतं, खुपतं..”
“अगं आई, पण ते सजीव आहेत तर जगतात कसे.. ते तर काहीच खात नाही. आपण जसं आपल्या मोती ला खायला देतो तसं आपण झाडांना नाही देत ना? फक्त पाणी देतो. फक्त पाण्यावर कुणी जगतं का?”
“आपण त्यांना खायला देत नाही कारण त्यांना त्याची गरजच नाही. हिरवी झाडं आणि वनस्पती आपलं अन्न स्वतः तयार करतात, त्यावरच त्या जगतात.” आईने समजावण्याचा स्वरात सांगितलं.
“स्वतः ..!!!! त्यांच्याकडे कुठे गॅस सिलेंडर आहे!!?” हसतच आणि कुतुहलाने विशालने विचारले.
“आपल्याप्रमाणे त्यांना अन्न शिजवावं नाही लागत बेटा.. ते पाण्याच्या, कार्बन डायऑक्साइड वायूच्या आणि सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने आपलं अन्न तयार करतात, त्यावरच जगतात आणि वाढतात. तू मोठा झाला की तुला कळेल हळूहळू..! जास्त विचार नको करुस.”
“फक्त हिरव्या वनस्पती आणि झाडं!!? पण काही झाडं तर नसतात हिरवी, त्यांची पानं पिवळसर किंवा लालसर असतात.. मग त्या कश्या जगतात?”
“हिरव्या नसल्या तरीही त्यांच्यात अन्न तयार करण्यासाठी लागणार हिरवं द्रव्य असतं काही प्रमाणात. त्यामुळे त्याही स्वतःच अन्न स्वतःच तयार करतात.”
“अच्छा .. आत्ता कळलं. अन्न तयार करण्यासाठी त्या हिरव्या द्रव्याची गरज असते. असच ना..!?”
“होय .. असच.. ”
त्यानंतर काही दिवसांनी विशाल ची आई कॉलेज मधून घरी आली तर बघते ते काय .. विशाल हातापायाला हिरवा रंग लावून जवळ पाण्याची बाटली घेवुन बाहेर बागेत उन्हात उभा ..!!
“अरे .. हे काय विशाल ..?? असा हिरवा रंग लावून उन्हात उभा राहून काय करत आहेस?”
“तू म्हटलं ना .. हिरव्या द्रव्याने सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साइड वायूने आणि पाण्याच्या सहाय्याने झाडं अन्न तयार करतात. मी पण अन्न तयार करतोय. पण अन्न तयार झालं की भूक नाही लागणार ना. पण मला तर जाम भूक लागलीय.”
“वेडा कुठला ..!!? चल वाढते तुला. आधी तो रंग काढ.”
“पण मी का नाही तयार करू शकणार अन्न?”
“ते हिरव्या रंगाचे द्रव्य झाडाचे स्वतःचे असते. आणि या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण (फोटोसिंथेसिस) म्हणतात. ही खूप मोठी प्रक्रिया असते. तुला आता नाही कळणार, खूप लहान आहेस तू .. मोठा झालास की कळेल.”
“मग मी मोठा झाल्यावर मला झाडांप्रमाणे अन्न तयार करता येईल?”
“जेव्हा करता येईल तेव्हा करशील ..आता तरी मी बनवलेलं अन्न खाऊन घे. भूक लागलीय ना..”
आईने पिच्छा सोडवत म्हटलं. कारण एकदा त्याचे प्रश्न सुरू झाले की अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत थांबायचे नाही.
बरेचदा मंदिराच्या बाहेर, रस्त्याच्या कडेने, बसमध्ये, रेल्वे स्टेशनवर त्याने गरीब, गरजू, अपंग, भिकारी लोकांना दोन पैशासाठी, अन्नासाठी हात पसरताना बघितलं होतं. ते बघून त्याला नेहमी वाटायचं .. या गरीब, लाचार लोकांना अन्नासाठी दारोदार फिरावं लागतं. यांना झाडांप्रमाणे स्वतःच अन्न स्वतः तयार करता आलं तर किती छान होईल. ज्यांना साऱ्या सुखसोयी आहेत त्यांना नाही पण अशा गरजवंताना याचा नक्कीच फायदा होईल.
असा जिज्ञासू विशाल मोठा झाला. जीवरसायन शास्त्रात बी. एस. सी. ऑनर्स झाल्यावर वनस्पती जीवरसायन शास्त्रात एम. एस. सी. केलं. लहानपणापासूनच वेड होतंच .. माणसाला झाड बनवायचं. त्याला स्वयंभू करायचं. त्यामुळे त्याने नोकरीऐवजी संशोधनातच करियर करायचं ठरवलं. संशोधनासाठी आवश्यक असलेली UGC-CSIR ही परीक्षा उत्तीर्ण केली. संशोधनासाठी त्याला फेलोशिप मिळू लागली. डॉ. अरविंद मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपला पहिला प्रबंध (थेसीस) पूर्ण केला. विषय होता – हरितलवके (chloroplast), हरितद्रव्य (chlorophyll) आणि संप्रेरकांचा प्रकाश संश्लेशणातील महत्व आणि प्रभाव. तीन वर्षात हा प्रबंध पूर्ण झाला. विशाल आता पी. एच. डी. मिळवून एका वनस्पती शास्त्राच्या संशोधन संस्थेत काम करू लागला. आता त्याच्या झाडांप्रमाणे अन्न तयार करण्याच्या स्वप्नाला सुरुवात झाली. सुरुवातीला त्याच्या या विचारावर सारे हसायचे. पण त्याने आपला सिद्धांत वैज्ञानिक दृष्ट्या सर्वांसमोर सादर केला. त्याला या प्रोजेक्ट वर काम करण्याची परवानगी मिळाली आणि त्याच्या कामाला वेग आला.
प्रकाश संश्लेशणासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे हरितलवकातील हरितद्रव्य. पण या हरितद्रव्याचा अर्क झाडांच्या पानातून काढून तो प्राण्याच्या शरीरात टोचून (इंजेक्ट करून) उपयोग होणार नव्हता. त्यासाठी हरितद्रव्य तयार व्हायला हवं. तेही पेशींमधील हरितकवकात. जसं ते झाडांच्या पेशीत असतं. त्यामुळे त्याचा पहिला प्रयत्न होता कृत्रिम हरितलवक बनवण्याचा. ज्यात तो यशस्वी झाला. आता प्रश्न होता, प्रयोग कुणावर करायचा. असे प्रयोग प्रथमतः प्राण्यांवर विशेषतः उंदरावर किंवा गिनीपिग वर करतात. त्यानेही तेच केलं. गिनिपिगच्या त्वचेच्या पेशींमध्ये हरितलवक जाईल अशाप्रकारे सोडलं. पण फक्त हरितलवक सोडून उपयोग नव्हता. आता त्या पेशींनी असं कार्य करायला हवं की जेणेकरून त्या पेशी हरितद्रव्य तयार करतील. हरितद्रव्य एक प्रकारचं रंगद्रव्य असून ते प्रथिनांच्या प्रकारात येतं. प्रथिने तयार होण्याकरता तशा प्रकारची पेशीतील डी. एन. ए. ची रचना असावी लागते. डी. एन. ए. ची रचना बदलणं म्हणजे खूप जोखमीचे काम. त्यामुळे त्याने वनस्पतीचा डी. एन. ए. काढून तोही गिनीपीग च्या त्वचेवरील पेशीत सोडला. सुरुवातीला प्रयोग फसत गेले, अडचणी येत गेल्या, लोकांचे टोमणे सुरू असायचेच, पण त्याने हार मानली नाही, प्रयत्न सुरू ठेवले. हळूहळू त्याच्या प्रयत्नांना यश मिळू लागलं. गिनीपिग चा रंग हिरवा होऊ लागला. आता त्याने गिनीपिग ला उन्हात ठेवायला सुरुवात केली. त्याला भरपूर पाणी पाजू लागला. खाऊ पिऊ ही घालायचा. उन्हातील पिंजऱ्यात तो बिचारा प्राणी सैरवैर पाळण्याचा प्रयत्न करायचा. रात्री घरात आणायचा. एके दिवशी असच त्याने गिनीपिग ला खाऊ घातलं. तो काहीच खाईना. तोंड फिरवू लागता. आता तो पूर्ण हिरवा झाला होता. विशाल च्या प्रयोगाला यश आलं होतं. गिनीपिग ने अन्न तयार करायला सुरुवात केली होती. विशालचा आनंद गगनात मावेना. हळूहळू गिनीपिग चे पाय जमिनीच्या आत गेले. पायांना मुळं येऊ लागले होते. आणि काही महिन्यात गिनीपिग पूर्णपणे झाड झाला.
यासाठी विशालला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. पण तो एवढ्यावर थांबणार नव्हता. त्याला माणसाला झाड बनवायचं होतं. पण कोण स्वतःहून तयार होणार? प्रश्नच होता. तरीही विशालच्या मनात उत्तर होतंच … गरीब, गरजू, भिकारी .. ते नक्की तयार होतील. पण कितीही नाही म्हटलं तरी यासाठी मानवसंवर्धन, सरकार सगळ्यांची परवानगी हवी. त्यातच गरीब, गरजू असले तरी मनुष्य झाड व्हायला कसा तयार होईल ..!???
पण विशालने प्रयत्न सोडले नाही. सगळ्या परवानग्या मिळवल्या. सरकारची परवानगी, मानवता हितवादी संस्था यांची परवानगी महत्वाची होती. तीही मिळाली. आणि आता सगळ्यात महत्वाचं होतं .. ज्यांच्यावर प्रयोग करायचा ते लोकं..
आता त्याने आपली शोध मोहीम सुरू केली. मंदिरात जाऊन, रेल्वे स्टेशनवर जाऊन गरीब एकाकी अशा चार पाच जणांना घेऊन तो घरी आला, तुमच्या राहण्याची, जेवणाची सोय करतो, असं सांगून. मूळ उद्देश सांगितला असता तर कुणीही आलं नसतं. म्हटल्याप्रमाणे त्याने सगळ्यांची चांगली काळजी घेतली. तो त्यांच्यातीलच एक असल्याप्रमाणे त्यांच्याशी वागू लागला. त्यांनाही याची सवय झाली. ते त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागले. मैत्री जमली. सगळे त्याच्या घरी रुळले.
आता त्याने एक दिवस सगळ्यांना आपली योजना, प्रयोग सांगितला. हे ऐकून काय होणार. सगळे त्याच्यावर चिडून बोलले, ” स्वतःच्या कामासाठी, प्रसिद्धीसाठी आणलं आम्हाला!!??? काही नाही, सगळे श्रीमंत सारखेच. फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी काहीही करतील. चला निघू आपण. आतापर्यंत सगळा देखावा होता. काळजीचं रूप पांघरलेला.” सगळे जायला लागले. कसंबसं आपल्या दोन वर्षाच्या मुलीची शपथ घेवून त्याने त्यांना थांबवलं. मुलीची शपथ घेतली म्हणून ते थांबलेही. आता त्याने आपला मुद्दा मांडायला सुरुवात केली..
विशाल : हे बघा तसंही तुम्ही एकटे, एकाकी आहात. ना आगा ना पिछा. तुम्ही जर झाड होवून इतरांना आनंद देऊ शकत असाल, त्यामुळे जास्त जगू शकणार असाल, कुणावर अवलंबून रहावं लागणार नसेल, कुणापुढे हात पसरावे लागणार नाही.. तर वाईट काय आहे. निसर्गातच राहून तुम्हालाही त्याचा आनंद मिळेलच ना.
एक जण (हसत हसत) : आनंद ..!!!? झाडाला कुठला आलाय आनंद?! त्याला कुठल्या आल्यात भाव भावना. आम्हाला मूर्ख समजतोस का..? तुझ्या या प्रयोगाने आम्ही भावनाशून्य होऊ. फक्त एका जागेवर उभे. वर्षानुवर्षे ..”
इतरांनी दुजोरा दिला.
विशाल : चुकताय तुम्ही. उलट झाडांना जास्त भाव भावना असतात. ते हसतात, रडतात, व्यक्त होतात, प्रत्येक गोष्ट चांगली, वाईट जाणवते त्यांना. ते आपल्यापेक्षा जास्त भावनिक असतात.
“आम्ही कसं मानणार..? आम्ही तर कधी असं बघितलं नाही.” दोन तीन जण म्हणाले.
विशाल : एखाद्या झाडाला जर सुमधुर संगीत रोज ऐकवलं तर ते ताजतवान राहतं. जर तुम्ही झाडाशी रोज प्रेमाने बोललात, त्याच्या पानफुलांवरून हळुवार हात फिरवला तर ते वेगाने वाढतं. इतकचं काय जर का एखाद्या झाडाला तुम्ही तर्जनी दाखवून शिवीगाळ केली तर ते मुरझुन जातं. एवढंच काय, जर एखाद्या घरातील वयोवृद्ध व्यक्ती वारली तर त्या घरातील एखादं मोठं झाड वाळून जातं. इतकं भावनाप्रधान असतं ते.
दुसरा जण : हे मात्र खरं आहे. माझ्या शेजारी राहणारे आजोबा वारले तेव्हा त्यांच्या आवारात असलेलं आंब्याचं झाड पूर्ण वाळून गेलं.. एका महिन्यातच.
आता सगळ्यांना विशाल च्या प्रयोगासाठी मदत करायची तयारी झाली. आपले दुःख ही दूर होणार या भावनेने ते उत्साहित झाले होते.
प्रयोगाचा दिवस आला. विशालने गिनीपिग वर केलेल्या प्रयोगा प्रमाणेच त्यांच्यावरही प्रयोग केले. पण माणसाचं शरीर लवकर साथ देत नाही. लोकं आजारी पडायचे. मग प्रयोग थांबायचा. ते बरे झाले की परत सुरुवात. असे करता करता एक वर्ष उलटून गेलं. प्रयोग पुढे जात नव्हता. विशालची उमेद संपली. काय करावे कळेना.
आता त्याने विचार केला की लोकांची अजूनही इच्छा नाही, झाड बनण्याची. मनातून इच्छा असल्याशिवाय काहीही शक्य नाही. त्याने परत सगळ्यांना तसं विचारलं. ते म्हणाले .. आम्ही तयार झालो तेव्हाच तर तुम्ही प्रयोग करताय ना.. मग असं का म्हणता. तेही खरच होत. आता ही शक्यता नाकारता येत नव्हती की त्याचं अचेतन मन हे स्वीकारत नाही आहे .. की आपण झाड होणार. त्यामुळे त्याने एक युक्ती केली. प्रत्येकाला त्याच्या बागेतील एक एक झाड वाटून दिलं. त्याची काळजी घ्यायला, त्याच्याशी बोलायला सांगितलं. बागेत त्यांचा वेळ खूप आनंदात जायला लागला. त्यांनाही हळूहळू वाटायला लागलं .. आपणही आता असेच होणार.. किती छान होईल.
सकारात्मकता वाढली, प्रयोगाला यश मिळू लागलं. गिनीपिग च ठीक होतं पण माणसांना उन्हात ठेवणं योग्य नव्हतं. त्यामुळे विशालने त्यांना अशा खोलीत ठेवलं जिथे खूप सूर्यप्रकाश यायचा. प्रयोग पुढे जाऊ लागला. हळूहळू त्यांची त्वचा हिरवी होऊ लागली. भूक कमी व्हायला लागली. उत्सर्जन (एक्क्रिशन) क्रिया मंदावली. पायं झाडाच्या खोडाप्रमाणे टणक होऊ लागले. पूर्ण शरीर हिरवं झालं पण आकार माणसाचाच होता. आता सारे जास्त वेळ बाहेर उन्हात जाऊन उभे राहू लागले. हातांवर नोड यायला लागल्या. पानं तयार होऊ लागली. बोलणं कमी झालं. पाय जमिनीत घट्ट झाले. आता ते एका जागेवर स्थिर झाले. आणि काही दिवसातच ते पूर्णपणे झाड बनले.
आपापल्या स्वभावाप्रमाणे त्यांचं झाडात रूपांतर झालं. रुक्ष आणि कठोर तुषार काटेरी झाड झाला, नेहमी आनंदात राहणारा राजन पारिजातकाचं झाड झाला, वरून कठोर पण आतून मृदु स्वभाव असणार प्रदीप फणसाचं झाड झाला, खेळीमेळीने वागणारा प्रफुल पिंपळाच झाड झाला..
प्रयोग यशस्वी झाला .. मोठी बातमी झाली, विशाल ला अनेक पारितोषिक मिळाली. आता जीवनाला कंटाळलेले लोकं स्वतःहून त्याच्याकडे झाड बनायला येऊ लागले. आणि या शोधासाठीच त्याला जीवरसायन शास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले. या विषयावर स्वतंत्र नोबेल पारितोषिक देण्यात येत नाही त्यामुळे रसायन शास्त्राचे नोबेल पारितोषिक त्याला मिळणार होते. लहानपणापासून बघितलेलं विशालचं स्वप्न पूर्ण झालं होतं.
©️®️ मनिषा चंद्रिकापुरे (२६/९/२५)
टिप: प्रकाश संश्लेशणाची क्रिया, हरितलवक, माणसाचं झाडात होणार रूपांतर हे सारं लिहितांना मी जीवरसायन शास्त्राच्या अभ्यासावरुन लिहिले आहे. मी स्वतः जीवरसायन शास्त्रात एम. एस. सी. आहे. बाकी सऱ्या गोष्टी काल्पनिक आहेत.


खूप छान 👌🏻📖✍🏻
विज्ञान निष्ठ कथा…छान जमली
खूप अप्रतिम कथा
खूप अप्रतिम कथा
एकदम भन्नाट,खूप छान कथा…मला ही झाड व्हायला आवडेल ..
वैज्ञानिक कथानक
Thank you
Thanks
Thank you tai
Thank u so much
मी प्रोजेक्ट करेल यावर तेव्हा पाहिला चान्स तुम्हालाच … 😂
Thanx