माझ्या मनातील विठ्ठल

#माझ्यामनातीलविठ्ठल

माझ्या मनातील विठ्ठल

देव म्हणजे काय? तो कुठे असतो? मंदिरात, मूर्तीत, ग्रंथात, की फक्त आपल्या श्रद्धेत? या प्रश्नांची उत्तरं शोधताना अनेकजण पंढरपूरच्या रस्त्यावर वारीस निघतात. वारकरी देहाने चालत असतो, पण त्याचा अंतर्मनाचा प्रवास सुरू झालेला असतो. आणि हाच अंतर्मनाचा प्रवास म्हणजे माझ्या मनातील विठ्ठलाचा शोध!

“पंढरपूरची वारी” हा केवळ भौगोलिक प्रवास नसतो; तो एक आंतरिक जागृतीचा, आत्मशुद्धीचा आणि विठ्ठलाशी एका विशिष्ट नात्याने जोडल्या जाण्याचा अनुभव असतो. विठ्ठल म्हणजे एका मूर्तीत सीमित असलेला देव नव्हे, तर तो मनामनात साक्षात चेतनेने जागा झालेला आत्मस्वरूप आहे.

मनातील विठ्ठल म्हणजे काय तर माझ्या मते मनातील विठ्ठल म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि निरपेक्ष प्रेमाचं रूप. तो केवळ भक्तीचा विषय नाही, तर ती एक जीवनपद्धती आहे. मनामध्ये असणारा विठ्ठल म्हणजे आपल्याला अडचणीच्या क्षणी धीर देणारा, अश्रूंमागील शांतता सांगणारा, चुकीचं कृत्य करताना अंतरात्म्याचा आवाज होऊन टोकणारा एक अंतःस्थ आत्मा आहे. विठ्ठल माझ्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येक ठिकाणी आहे रस्त्यावर एका भुकेलेल्या मुलाला अन्न देणाऱ्या हातात, एखाद्या आजारी माणसाला सांत्वन करणाऱ्या शब्दात, शेजाऱ्याच्या दुःखात सहभागी होणाऱ्या मनात… विठ्ठल तिथे आहे, जिथे ‘स्व’ विसरून ‘पर’ची जाणीव होते.

आजच्या काळात आपण देवाला शोधतो तो म्हणजे फॉर्वर्ड केलेल्या मेसेजमध्ये, दागिन्यांच्या जाहिरातीत, एकादशीच्या सेलिब्रेशनमध्ये. पण खरा विठ्ठल मिळतो तो अंतर्मनात. तो त्या साऱ्यांच्या पलिकडे असतो आपण जिथे कोणाचे दुःख समजून घेतो, कुणाला मदतीचा हात देतो, तिथे तो उपस्थित असतो.

मला वाटते विठ्ठल म्हणजे…तो रडणाऱ्या आईच्या अश्रूंमध्ये आहे. तो आपल्या अडचणीत साथ देणाऱ्या मित्राच्या खांद्यावर आहे. तो आपल्या चुकीची जाणीव करून देणाऱ्या शिक्षकाच्या शब्दांत आहे. तो अनाथाश्रमात चुपचाप सेवा करणाऱ्या तरुणाच्या मनात आहे.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर गाठावं लागतं हे खरं, पण त्याचं मनातलं वास्तव्य ओळखणं ही खरी भक्ती! अस मला वाटत.

“माझा विठ्ठल कुठे आहे?” असा प्रश्न पडतो. तुम्ही कधी स्वतःला विचारलंय का “मी कोणासाठी विठ्ठल आहे का?” कधी कधी आपण स्वतःच कुणाच्या जीवनात विठ्ठल ठरतो कुणाला मदत करून, एखाद्याला वेळ देऊन, कधी फक्त शांतपणे ऐकून घेतलं तरी. म्हणूनच, मनातला विठ्ठल शोधण्यासाठी मनाची दारं उघडावी लागतात. त्या दारांपलीकडे आहे “समजून घेणं”, “क्षमाशीलता”, “आदर”, “करुणा”, आणि “निरपेक्षता”. हे सगळं जेव्हा मनात जागं होतं, तेव्हाच विठ्ठलाचं खरं रूप प्रकट होतं.

दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला वारीला निघतात. त्यांचं चालणं म्हणजे एका ध्येयाकडे केलेली निःस्वार्थ यात्रा. पाय दुखत असतो, अंगावर पाऊस पडत असतो, तरी त्यांचं चालणं थांबत नाही. कारण ते पंढरपूर गाठत नाहीत, ते त्यांच्या मनातील विठ्ठलाला गाठत असतात.

वारी म्हणजे एक प्रतीक आहे – आपल्यातील मोह, अहंकार, राग, लोभ या दुर्गुणांपासून दूर जाऊन एका शुद्ध, निर्मळ अवस्थेकडे होणारा प्रवास.

संत तुकाराम म्हणतात –

“देहाचिया देहीं जाणा, देवा शोधू नको रे वेगळा!”

म्हणजेच विठ्ठल वेगळा नाही. तो प्रत्येकाच्या अस्तित्वात आहे. म्हणूनच, जो कोणाला ओळखतो, समजतो, प्रेम करतो त्याच्यामध्येच विठ्ठल साकारतो. आज आपण किती वेळा कोणासाठी थांबतो, ऐकतो, समजून घेतो? आपण जितके स्वतःला केंद्रस्थानी ठेवतो, तितकं विठ्ठल आपल्यापासून दूर जातो. पण जिथे स्वतःमधला ‘मी’ विरघळतो, तिथेच ‘विठ्ठल’ प्रकट होतो.

माझा विठ्ठल केवळ एकादशीच्या उपवासापुरता नाही. तो फक्त गळ्यातील तुळशीमाळेत नाही, की “विठ्ठल-विठ्ठल” जपात नाही. तो आहे माझ्या दैनंदिन जीवनात. आपण आईला मदत करतो तिथे आहे. रस्त्यावर पडलेल्या माणसाला उचलतो, तिथे आहे. मी कोणाचं हसणं पाहून मनापासून आनंद घेतो, तिथे आहे.

हा विठ्ठल सतत माझ्या मनात आहे. तो मलाच नेहमी टोकतो चुकीपासून सावध करतो, सत्कृत्याची जाणीव करून देतो.

माझ्या मनातील विठ्ठल म्हणजे मी जेव्हा दुसऱ्यासाठी विचार करतो, जेव्हा मी थांबतो, मदतीचा हात पुढे करतो तेव्हा तो प्रकट होतो. नेहामीच त्याचं रूप बदलतं कधी आईच्या डोळ्यात दिसतो, कधी मित्राच्या मिठीत, कधी एखाद्या गाण्यात, कधी एखाद्या गहिवरलेल्या क्षणात. विठ्ठल म्हणजे दिव्यत्वाचा आत्मस्पर्श जो अनुभवता येतो, पण शब्दांत पकडता येत नाही. म्हणून मी पंढरपूरला गेले नाही तरी, मी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात दररोज विठ्ठलाला भेटते. तो आहेच माझ्या मनात. तोच माझा विठ्ठल.

माझ्या मनातील विठ्ठल हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रवास आहे. तुम्हीही डोळे मिटा, मन शांत करा आणि स्वतःला विचारा –

“माझा विठ्ठल कुठे आहे?”

उत्तर तुम्हाला तुमच्या हृदयात मिळेल.

@स्मिता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!