माझ्यातीलमी

IMG_9796.jpeg

#माझ्यातलीमी

#विकएंडटास्क(१७-०१-२०२६)

अबोल प्रित

कॉलेजचा निरोप समारंभ होता. सगळीकडे गोंगाट, हसणं-खिदळणं आणि सेल्फीचा माहोल होता. पण एका कोपऱ्यात उभा असलेला आदित्य मात्र शांत होता. त्याचे डोळे गर्दीत फक्त एकाच व्यक्तीला शोधत होते— ईश्वरीला.
तीन वर्षं झाली, पण आदित्यने कधीच तिला आपल्या मनातील भावना सांगितल्या नव्हत्या. तो नेहमी लांबूनच तिला पाहायचा. ती लायब्ररीत अभ्यास करताना असो किंवा मैदानावर मित्रांशी गप्पा मारताना, आदित्यचं लक्ष नकळत तिच्याकडे असायचं. तिचं ते हसणं, बोलताना केसांची बट सारवरणं, हे सगळं त्याने मनात साठवून ठेवलं होतं. पण ईश्वरीला मात्र याची पुसटशी कल्पनाही नव्हती.
आज शेवटचा दिवस होता. ईश्वरी तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत फोटो काढण्यात दंग होती. तिने एकदाही मागे वळून आदित्यकडे पाहिले नाही. आदित्य मात्र लांबूनच तिला न्याहाळत होता, जणू काही आज तो तिचं रूप शेवटचं डोळ्यांत भरून घेत होता.
त्याच्या मनातील संवाद:
“पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले…
कितीदा तरी तुझ्या नजरेची वाट पाहिली, पण तुझे लक्ष कधीच माझ्याकडे वळले नाही. तू माझ्यासाठी एक सुंदर स्वप्न होतीस, जे मी जागृत डोळ्यांनी रोज पाहायचो.”
समारंभ संपला. ईश्वरी आपल्या बॅगेतून एक डायरी काढते आणि त्यावर काहीतरी लिहिते. ती जाताना ती डायरी चुकून बाकावर विसरते. आदित्य धावत जाऊन ती डायरी उचलतो आणि तिला हाक मारणार इतक्यात त्याची नजर डायरीच्या शेवटच्या पानावर पडते.
तिथे लिहिले होते— “तीन वर्षांत तुला एकदाही नीट पाहण्याची हिंमत झाली नाही, कारण तू समोर आलास की माझे डोळे झुकून जायचे. पाहिले न मी तुला, तू मला नाही पाहिले… पण मनातून मात्र कधीच सोडले नाही!”
आदित्य स्तब्ध झाला. ईश्वरी निघून गेली होती, पण त्या एका ओळीने त्याला सांगून दिले की, जे प्रेम तो एकतर्फी समजत होता, ते खरं तर ‘दोन्ही बाजूंनी अबोल’ होतं.
✍️र सि का
©️®️रसिका चवरे
PC Source Google

error: Content is protected !!