माझ्यातली मी

IMG_9842.jpeg

“फी पेक्षा मोठे काहीतरी…”
बोर्डाच्या परीक्षेचे फॉर्म भरायचे शेवटचे दोन दिवस उरले होते. वर्गातले सगळे मुलं उत्साहात होती, पण समीर मात्र शेवटच्या बाकावर मान खाली घालून बसला होता. घरची परिस्थिती बेताचीच, त्यात वडिलांची नोकरी सुटल्यामुळे फॉर्मचे पैसे भरणं त्याला अशक्य होतं.
त्याचे क्लास टीचर, काळे सर, हे सगळं लांबून बघत होते. त्यांनी समीरला मधल्या सुट्टीत स्टाफ रूममध्ये बोलावलं.
“काय झालं समीर? फॉर्म का नाही भरला अजून?” सरांनी सहज विचारलं.
समीर अडखळत म्हणाला, “सर, जरा पैशांची अडचण आहे. यावेळी परीक्षा नाही दिली तरी चालेल, पुढच्या वर्षी बघू…”
काळे सरांनी खिशातून पैसे काढले आणि समीरच्या हातात दिले. समीर नकार देऊ लागला, तसे सर हसून म्हणाले, “हे बघ, तू हुशार आहेस. तुझे हे वर्ष फुकट जाणं मला परवडणार नाही. हे पैसे उधार समजावेत असं तुला वाटत असेल, तर जेव्हा मोठा माणूस बनशील तेव्हा कोणा एका गरजू विद्यार्थ्याची फी भरून याची परतफेड कर. बस, तोच माझा मोबदला!”
समीरच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याला जाणवलं की सरांनी त्याला फक्त पैसे दिले नाहीत, तर एक नवी उमेद दिली.
तात्पर्य: आयुष्यात पैशांपेक्षाही खूप गरज असल्यास निस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो पेक्षाही महाग असते.
✍️ र सिका
©️®️रसिका चवरे

error: Content is protected !!