माझ्यातली मी, विकेंड टास्क

#माझ्यातलीमी
# विकेंड टास्क (२/१/२०२६)
#पुणेरीपाट्या
#विनोदीकथा.

कथेचं शीर्षक :- ” वाचाल तर हसाल !”

पुण्यातील सदाशिव पेठे मधील रस्ते म्हणजे गल्ल्यांच जाळचं. याच गल्लीमधून कुलकर्णी आणि देशपांडे कुटुंब एका स्नेह्याच्या लग्नाला जायला एकत्रच निघाले होते. लग्नाचा हॉल जवळच असल्याने पायीच जायचं ठरवलं. जाता जाता घरांवर, रस्त्यावर, बंगल्यावर, दुकानांवर असलेल्या विविध मजेशीर पाट्या. वाचत वाचत आणि गप्पा मारत ते सर्व चालतच निघाले होते. आणि मग सुरू झाला विनोदाचा प्रवास……

एका टुमदार बंगल्याच्या गेटवर पाटी होती.
” कुत्र्यापासून सावध राहा!” ( कुत्र्याला बीपी आहे. तो जर चिडला तर आम्ही जबाबदार नाही!)

मिसेस कुलकर्णी म्हणाल्या,” अग बाई! कुत्र्याला पण बीपी असतो? काहीही लिहितात बाई! मालकाला विचारावसं वाटतं, कुत्र्याला गोळी वेळेवर देता का?
त्यावर मिसेस देशपांडे हसल्या आणि म्हणाल्या , बाई ग, कुत्र्याला बीपी असेल किंवा नसेल पण ही पाटी वाचून बाहेरच्या माणसाचा बीपी नक्कीच वाढेल”

आणखी थोडं पुढे गेल्यावर एका दुकानावर पाटी दिसली,

” एक ते चार दुकान बंद राहील! कृपया दरवाजा वाजवू नये”.

मिस्टर देशपांडे म्हणाले,” पहावं ते नवलच! हे बघा, इथे देव जरी प्रसन्न झाला तरी तो चार वाजेपर्यंत बाहेरच थांबणार, नाही का?
पुणेकरांची झोप मोडणं म्हणजे वाघाच्या मिशीला हात लावल्यासारखंच आहे”.
मिस्टर कुलकर्णी म्हणाले,” खरे हो! मी एकदा दोन वाजता बेल वाजवली तर आतून मालक ओरडला, स्वर्ग हवा असेल तर चार वाजता या”

बरेच पुढे आल्यावर एक पाटी दिसली.

” पाहुणे म्हणून येताना स्वतःचा चहाचा मसाला आणि साखर सोबत आणावी. दूध आमचे चव तुमची!”.

मिसेस कुलकर्णी पाटी वाचताच लगेच म्हणाल्या,” बघा देशपांडे ही कसली पाहुणचार करण्याची पद्धत? साखरेचा डबा घेऊन जायचं का घरोघरी! काहीतरीच बाई. हा कसला पाहुणचार .

मिसेस देशपांडे बोलल्या,” अगं ही नम्र विनंती आहे! याचा अर्थ काय घ्यायचा? येऊच नये आणि आला तर लवकर निघा! सगळेच हसू लागतात.
” बाबा, चला लवकर मला लग्नाच्या मिरवणुकीत नाचायचं आहे ना? अनिश पुढे म्हणतो कसा आपली हास्य जत्रा कधी पोहोचणार लग्नाच्या हॉलवर?
सर्वजण हसत हसत घाईघाईने पुढे निघाले.

रस्त्याच्या कडेला एका भिंतीवर मोठ्ठी पाटी होती.

” इथे गाडी लावू नये, लावल्यास चाकातील हवा काढली जाईल आणि पंक्चर काढण्याचे पैसे तुमच्याकडूनच वसूल केले जातील!”

कुलकर्णी काका म्हणाले,” अहो देशपांडे पाहिलंत का! लोक किती प्रॅक्टिकल आहेत. नुसती हवा काढत नाही तर त्यातून व्यवसाय कसा करायचा हेही त्यांना माहित आहे बर का! म्हणूनच मी पेठेत जाताना कधीही गाडी आणत नाही.

कुलकर्णी काकू म्हणाल्या,” आज खरंच गंमत वाटते आहे. अशा पाट्या कधी लक्षपूर्वक वाचायला वेळच मिळाला नाही. पायी चालण्याने त्यातली गंमत कळते आहे, नाही का?

आणखीन पुढे गेल्यावर एका वाड्याच्या दारावर असलेली पाटी….

” बेल एकदाच वाजवावी. आम्ही बहिरे नाही! दुसऱ्यांदा वाजवल्यास आम्ही घरात असूनही दार उघडणार नाही. क्षमस्व!”

मिसेस देशपांडे म्हणाल्या,” बापरे! किती इगो आहे यांचा?”
मिसेस देशपांडे हा इगो नाही हो! ही तर पुणेरी शिस्तच! त्यातून त्यांना काय सुचवायचं ते कळलं का तुम्हाला? बेल वाजवणाऱ्याने संगीताचा रियाज केल्यासारखं बटन दाबायचं नसतं. असं मला प्रकर्षाने जाणवलं हो! मिस्टर कुलकर्णी म्हणाले.

पुढच्या गल्लीत एक छोटं उपहारगृह लागलं त्याच्या बाहेरची पाटी पहा बर का!

” मोबाईलवर मोठ्याने बोलणाऱ्याला जेवण मिळणार नाही. अन्नाचा मान राखा फोनचा नाही”.

कुलकर्णी काकांना पाटी फारच आवडली,” छान आहे! आज-काल लोक जेवणापेक्षा रील्समध्ये जास्त असतात.”
” हो ना हो ! पण समजा, कोणाचा महत्त्वाचा कॉल आलाच तर? त्याला ताट सोडून बाहेर जाऊन बोलावं लागेल ना? नाहीतर मालक जेवणाचं बिल डबल करेल हो की नाही, हसत हसत पुढे चालू लागतात.
शेवटी मजल दर मजल करीत हास्य जत्रा लग्नाच्या हॉल जवळ एकदाची पोहोचली. अरे परत पाटी! हॉलच्या बाहेरची….

” अक्षता हळूहळू टाकाव्या, डोळ्यात गेल्यास संसार सुरू होण्याआधीच अंधार दिसेल .”

ही पाटी वाचताच दोन्ही कुटुंब पोट धरून हसू लागले. आज जेवणाच्या ताटा ऐवजी पुणेरी पाट्यांचीच मेजवानी झाली की! पुढे देशपांडे काका म्हणतात,’ पुणेरी पाट्या म्हणजे केवळ सूचना नाहीत, तर तो एक जिवंत संवाद आहे. जो तुम्हाला हसवतो, विचारही करायला लावतो आणि थोडं घाबरूनही सोडतो”
हसत हसतच सर्वजण हॉलमध्ये शिरले पण मनात अजूनही पाट्यांच्या गमतीदार आठवणी ताज्याच होत्या.

संदेश:-
या पाट्यांच्याकडे विनोद म्हणून न पाहता त्यातील मर्म समजून घेतलं पाहिजे. या पाट्या म्हणजे पुणेकरांनी शब्दांच्या माध्यमातून जपलेली शिस्तच, स्पष्टवक्तेपणा आणि वेळेचं नियोजनच नाही का?
दुसऱ्याला त्रास होऊ नये आणि आपला स्वाभिमानही जपला जावा. हाच या तिरकस विनोदा मागचा खरा उद्देश असतो. म्हणूनच पुणेरी पाटी ही केवळ कागदावरची अक्षर नसून ती सुसंस्कृत समाजाला आरसा दाखवणारी एक बौद्धिक मिश्किलता आहे.

सौ.स्मिता अनिल बोंद्रे.
©®

error: Content is protected !!