स्त्रीशक्तीचा आदर फक्त नऊ दिवस नाही, तिच्या भावनांची कदर आयुष्यभर झाली पाहिजे. ही भावना मालिनीच्या मनात खोलवर रुजलेली आहे. ती एक साधी गृहिणी, जी रोज सकाळी लवकर उठते, घर सांभाळते, मुलांचं संगोपन करते आणि रांधून सर्वांना वाढवते. नवरात्रोत्सवात घरात उत्साह असतो. नऊ दिवस देवीच्या मूर्तीसमोर सजावट, वेगवेगळ्या साड्या, गजरे, फुलांचे हार आणि विविध पदार्थांचा थाट असतो. मालिनी हे सगळं उत्साहाने करते, पण मनात एक प्रश्न घोळतो – हा आदर फक्त नऊ दिवसांचाच का?
तिचा नवरा सुधाकर आणि सासूबाई तिच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करतात. “मालिनी, एवढा आटापिटा का करून घेता? जे आहे त्यात समाधान मान,” सुधाकर म्हणतो. सासूबाई तिला जपमाळ ओढण्याचा सल्ला देते, “मन:शांती मिळेल.” पण मालिनीला हे पुरे नाही. ती थकलेली असते, दिवसभराच्या कामानंतर मानसिक तणाव सहन करावा लागतो. सुधाकर तिच्याकडे अपेक्षेने येतो, पण आता मालिनी नकार देण्याचं धाडस करू लागली आहे. “तू मला सगळं देतोस, पण माझ्या भावना का विसरतोस?” ती विचारते. सासूबाई तिला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण मालिनीची अपेक्षा स्पष्ट आहे – नऊ दिवसांचा आदर आयुष्यभर चालावा.
नवरात्र संपेपर्यंत घरात उत्साह असतो, पण नंतर सर्व सामान्य होतं. मालिनीला साधा पाण्याचा ग्लासही मिळत नाही. तिला वाटतं, स्त्री म्हणजे फक्त रांधा-वाढा, उष्टे खरकटी काढणं आणि मुलं सांभाळणं नव्हे. ती ठाम आहे की तिच्या भावनांचा आदर होणे गरजेचं आहे. एकदा तिने सुधाकराला सांगितलं, “मी देवी नाही, पण माणूस आहे. मला सन्मान हवा.” सुधाकर हसला, पण मालिनीची लढाई सुरू आहे. ती स्वतःसाठी, आणि सर्व स्त्रियांसाठी हा बदल घडवणार आहे. नऊ दिवसांचा थाट संपला तरी तिच्या मनातला संकल्प कायम आहे – स्त्रीशक्तीचा सन्मान आयुष्यभर व्हावा.
शब्द संख्या: २५०
#२९_०९_२०२५_सोमवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

खूप सुंदर कथा
Very good👍
खूप सुंदर कथा
बरोबर
खूप छान कथा
सुरेख