कथालेखन
विषय :- आरशातील जग – आरशातून दुसऱ्या जगात प्रवास.
कथेचे शीर्षक :- आरशा पलीकडचा स्वप्नवेल.
माझ्या खोलीत भिंतीवर एक प्रचंड मोठा जुना,, नक्षीकाम केलेला आरसा टाकलेला होता. त्याची लाकडी फ्रेम कलाकुसरीने भरलेली होती. त्यावर सोन्या- चांदीचे नाजूक नक्षीकामही केले होते. काळाच्या ओघात ते जरा काळवंडले होते. तो आरसा फक्त माझी प्रतिमा दर्शवत नव्हता, तर अनेक वर्षांचे रहस्य आपल्या पोटात दडवून ठेवल्यासारखा भासायचा. माझ्या आजीला तिच्या आजीने तो आरसा भेट म्हणून दिला होता.. त्यामुळेच त्याच्या इतिहासाचा आणि गुढतेचा भार मला नेहमीच जाणवायचा…..
आजही मी नेहमीप्रमाणे आरशासमोर उभा राहिलो. आरशाच्या काळवंडलेल्या नक्षीकामातून एक मंदसा आणि हिरवट रंगाचा प्रकाश बाहेर पडत होता. तो प्रकाश जणू मला काही आरशामध्ये बोलवत होता. एका क्षणासाठी मला भीतीने ग्रासले पण भीती पेक्षाही उत्सुकता अधिकच होती. मी हळूहळू हात पुढे केला आणि तो प्रकाश आरपार सरकला. मी वेगळ्याच जगात असल्याचं जाणवलं. माझ्या डोळ्यांसमोर एक हिरवट धूसर जग पसरलेलं आणि मी आत खेचला गेलो.
ज्या क्षणी मी डोळे उघडले, तेव्हा मी एका पूर्णपणे अनोख्या, अनोळखी जगात उभा होतो. हे जग आपल्या जगासारखंच नव्हतंच, इथलं आकाश फिक्या निळ्या रंगाचं असून त्यात गुलाबी रंगाचे ढग हळुवार तरंगत होते. झाडांची पाने हिरवी नसून चांदीच्या रंगाची पांढरट रंगाची होती आणि त्यातून मंद संगीताचा सूर येत होता.
मी पुढे पावलं टाकली, जमिनीवरचे गवत, हिऱ्यासारखे चमकत होते.. माझ्या पावलांच्या स्पर्शाने ते नाजूक हिरे फुटून त्यातून सुगंधित वाफा बाहेर पडत होत्या जणूकाही जमिनीने माझ्या स्वागतासाठी अत्तरच शिंपडले होते. जवळच एक धबधबा होता पण त्यातून पाण्याचे थेंब नव्हे तर रंगीबेरंगी रसायनांचे थेंब खाली पडत होते पण ते थेंब हवेतच गोठून रंगीत आणि नाजूक फुलांमध्ये रूपांतरित होत होते. अद्भुत दृश्य.
या जगातील माणसं खूपच वेगळी आणि बुटकी होती. त्यांचे कपडे फुलांच्या पाकळ्यांचे बनलेले होते जणू अंगभर नैसर्गिक परफ्युमच! त्यांचे सर्वांचे डोळे निळसर हिरव्या रंगाचे होते त्या डोळ्यात एक शांतपणा आणि निर्मळता होती. ते एकमेकांशी बोलताना शब्दांचा वापर करत नव्हते तर विचारांची देवाणघेवाण करत होते. त्यांच्या जवळ गेल्यावर त्यांनी माझ्या मनातले विचार अचूक ओळखले आणि हसून त्यांच्या जगात माझे आनंदाने स्वागत केले.
मी त्यांच्या गावात गेलो तिथली घर क्रिस्टलची बनलेली होती. त्यांच्या घराच्या भिंतीमधून बाहेर रंगीत प्रकाश पसरला होता. मला घर आतून पाहण्याची उत्सुकता होतीच मी त्या घरात प्रवेश केला. एका अद्भुत वातावरणाचा फील आला. बाहेरच्या हवेपेक्षा घरातली हवा थोडी थंडगार आणि शुद्ध वाटली. आत एक म्हातारा माणूस बसलेला होता. त्याचे केस चांदीसारखे चमकत होते.. त्याच्यासमोर एका दगडावर पाण्याचे थेंब टपकत होते, पण तो थेंब खाली पडत नव्हता तर तो हवेतच तरंगत होता. त्याने मला आपल्या विचारांच्या भाषेत समजावून सांगितले की,” हे आमच्या जगातील काळ थांबलेले क्षण आहेत.. जेव्हा एखादी गोष्ट खूप सुंदर असते तेव्हा आम्ही त्या गोष्टीला कायमस्वरूपी ठेवतो. या थेंबात माझ्या बालपणीचा एक आठवणींचा क्षण आहे”मला तर गंमतच वाटली.
पुढे एका चौकात काही लोक एका झाडाखाली बसले होते. त्या झाडाला वेगवेगळ्या आकाराची आणि रंगांची फळ लागली होती. मी एका फळाकडे आकर्षीला गेलो आणि तोडणार तेवढ्यात, एका मुलीने मला थांबवलं. ती म्हणाली,” ही फळ भुकेसाठी नाहीत, तर ही फळ भावनांसाठी आहेत. लाल रंगाचं फळ खाल्लं तर आनंद मिळतो. निळं खाल्लं तर शांतता आणि हिरवं खाल्लं तर ज्ञान!”..
माझी उत्सुकता अधिकच वाढली. मी हिरव्या रंगाचं फळ खाल्लं त्याच क्षणी माझ्या डोळ्यासमोरून असंख्य ज्ञान प्रकाशमान झालं. मला आरशा पलीकडील जगातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तरच मिळालं. मला कळलं की या जगात काहीच भय नाही. कारण ते फक्त चांगल्या विचारांनी बनलेले आहेत. पण त्याच क्षणी माझ्या मनात एक भीतीची लहर आली, मी इथून बाहेर पडू शकेन का?
त्या क्षणी ही भीती फक्त माझ्या एकट्याच्याच मनात होती. माझ्यासोबत असलेल्या लोकांना त्या भीतीची जाणीवच नव्हती. कारण ती त्यांच्या जगात अस्तित्वातच नव्हती.
मी त्या लोकांना निरोप दिला.. त्यांच्या डोळ्यात प्रेम होतं. त्यांनी मला परत आरशाकडे नेलं आणि एका क्षणात मला माझ्या खोलीत माझ्या आरशासमोर पुन्हा उभं राहिल्याचा भास झाला.
मी डोळे उघडले समोरचा आरसा तसाच होता. माझ्या खोलीतील सर्व वस्तूही तशाच होत्या पण माझं मन आरशा पलीकडच्या जगाच्या आठवणींनी भरून गेलेलं होतं.
ते एक स्वप्न होतं. पण त्या स्वप्नाने मला जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. मला जाणवलं की आपल्या जगात राग,, लोभ, भीती असल्या तरी प्रेमाची, आपुलकीची आणि ज्ञानाचा भाव हीच खरी ऊर्जा आहे. हीच ऊर्जा मला माझ्या जगाचा शोध घेण्यासाठी प्रेरणा
देणारी होती.
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®

Khup mast….
अतिशय सुंदर.
सुरेख
खुप छान
सुंदर कथा