#विकेंडटास्क.
#गोष्ट दुसऱ्या लग्नाची (३१/१/२०२६)
कथेचे शीर्षक :- ” उंबरठा ओलांडताना – एका नव्या जन्माची गोष्ट!”
पुनमने लाल रंगाची खड्डी बनारसी नेसली होती. सगळा साज शृंगार पूर्ण झाला होता. हिरव्यागार रेशमी बांगड्यांनी हाताचा सौंदर्य खुलून दिसत होतं. या बांगड्या हाताळतांना तिचा हात थरथरला, भावना दाटून आल्या होत्या. बरोबर चार वर्षांपूर्वी याच घरात ती सून म्हणून माप ओलांडून आली होती. पण नियतीने असा काही डाव मांडला की अवघ्या सहाच महिन्यात अपघातात तिचा पती पवन गेला. आज पुन्हा तिच्या खोलीत लग्नाची लगबग होती. पण आज ती” सून” म्हणून नाही तर एक” लेक” म्हणून घरातून बाहेर पडणार होती.
दोन वर्षांपूर्वी ची ती रात्र पूनमला आजही आठवते. पवन चा फोटो समोर रडत बसलेल्या पूनमच्या खांद्यावर सुलोचना मावशींनी हात ठेवला होता.” पुनम! असं किती दिवस तू रडत बसणार आहेस? तू फक्त पंचवीस वर्षांचीच आहेस. हे पांढरं कपाळ आणि शून्य आयुष्य मी तुला जगू देणार नाही” सुलोचना मावशी ठामपणे बोलल्या. पुनमला आश्चर्याचा धक्का बसला. मावशी! तुम्ही हे काय बोलताय? समाज काय म्हणेल? आपले नातेवाईक? आणि तुमचं काय? मी गेले तर या घरात तुम्ही अगदी एकट्या पडल हो!”
सुलोचना म्हणाल्या,” समाजाचं मी बघून घेईन. आणि माझ्या एकटेपणाचं म्हणशील तर, खरोखरच मला ही कोणाच्यातरी आधाराची गरज आहेच ग! आपण दोघीही लग्नाच्या उंबरठ्यावर आहोत पुनम. तू तुझ्या भविष्यासाठी आणि मी माझ्या उरलेल्या आयुष्यातील सोबतीसाठी. या एकाच संवादाने कथेचा पाया रचला गेला.
जेव्हा ही बातमी नातेवाईकात पसरली, तेव्हा घरात जणू मोठ्ठं वादळच आलं. सुलोचना मावशींचे दीर आणि नणंद घरी आले.” काय हे वेड सुलोचना? तेही या वयात? सून तरुण आहे तिचं ठीक आहे पण या वयात तुला काय भलत सुचलं? लोकं हसतील आपल्याला. आपल्या घराण्याची इज्जत धुळीला मिळेल.” दीर चांगलेच संतापले.
तेव्हा सुलोचना मावशी शांत होत्या. जराही मानसिक संतुलन न बिघडवता त्या म्हणाल्या,” जेव्हा पवन गेला, मी खूप आजारी पडले तेव्हा ही,” घराण्याची इज्जत” मला औषध द्यायला आली नव्हती.
रात्री – अपरात्री मला भीती घेरते तेव्हा तुमची ही खोटी प्रतिष्ठा माझ्यासोबत नसते. मला शरीर सुख नकोय, मला” सोबत” हवीयं. आणि माझ्या सुनेला तिचा जगण्याचा, आनंदाचा अधिकार हवाय.
जर एखाद्या पुरुषांनी पत्नी गेल्यावर दुसरं लग्न केलं तर तुम्ही त्याला साथ देता. तेच जर स्त्री ने केलं तर ती,” कुलटा”कशी ठरते? आज पासून, या क्षणापासूनच या घरात प्रतिगामी विचारांना थारा नाही! त्यांच्या या परखड उत्तराने, भूमिकेने विरोधकांचं तोंडं बंद झाली.
सुलोचना मावशींनी पूनम साठी प्रकाश ची निवड केली. एका नामांकित कंपनीत तो इंजिनियर होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचारांनी आधुनिक होता. त्यांनी पूनमचा भूतकाळ विसरून तिला आदर देण्याचं वचन दिले.
तर दुसरीकडे पूनमने सासूसाठी सुधाकर रावांना शोधले. ते एक निवृत्त मुख्याध्यापक होते. विधूर होते. त्यांना संगीताची खूप आवड होती. सुधाकर रावांनी सुलोचना बाईंना सांगितले,” आपण दोघे एकमेकांसाठी आधाराची काठी होऊया, ओझं नव्हे!”.
लग्नाचा मांडव सजला. एकाच मांडवात दोन पिढ्यांचे दोन विवाह सोहळे पार पडत होते. एका बाजूला तरुण पिढीची स्वप्ने होती तर दुसऱ्या बाजूला उतार वयातील सुरक्षितता होती. सुलोचना मावशीने पूनमचे कन्यादान केले. तेव्हा उपस्थितांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते. मंत्रांच्या घोषात दोन्ही जोडप्यांनी सप्तपदी पूर्ण केली.
जाताना पूनमने सासूच्या पाया पडण्या ऐवजी त्यांना जादूची झप्पी दिली. सुलोचना मावशी आता सुधाकर रावांच्या नव्या घरात जाणार होत्या. त्या सर्व जमलेल्या आप्तस्वकीयांना म्हणाल्या,” लग्नाची दुसरी गोष्ट म्हणजे केवळ शारीरिक गरज नाही तर तो एक,” मानसिक विमा” आहे. आयुष्याच्या संध्याकाळी कुणाचातरी हात हातात असणं हे पाप नसून पुण्य आहे. प्रत्येकाला सन्मानाने, प्रेमाने जगण्याचा अधिकार आहे! नाही का?
टीका करणं खूप सोप्प असतं. पण एकाकी पण भोगणं कठीण असतं. दुसरे लग्न म्हणजे नेहमीच चारित्र्याचा दोष नसून ती जगण्याची उमेद आहे. समाजाच्या भीतीने जगण्याचा आनंद मारू नका. अशी ही गोष्ट दुसऱ्या लग्नाची…….
” पांढऱ्या कपाळाच्या नशिबात जेव्हा मायेचा गुलाल लागतो,
तेव्हा समाज नाही ,तर देवही स्वर्गातून आशीर्वाद देतो!”
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®
